Water on Mars मंगळावर जीवसृष्टी आहे का? असेल, तर ती कशा स्वरूपात आहे? यांसारखे अनेक प्रश्न वारंवार लोकांना पडतात आणि शास्त्रज्ञांद्वारे केले जाणारे नवनवीन संशोधन याविषयीची लोकांची उत्सुकता आणखी वाढवते. आता शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहावर पाणी आढळून आले आहे. प्रत्येकाला ही बाब माहीत आहे की, पाणी हा जीवनाच्या अस्तित्वासाठीचा आवश्यक घटक आहे. त्यामुळे या नवीन संशोधनानंतर पुन्हा एकदा मंगळावरील जीवसृष्टीविषयीच्या लोकांच्या उत्सुकतेत भर पडली आहे. नासाच्या मार्स इनसाइट लँडरच्या (भूकंप मोजणारे उपकरण) डेटावर आधारित विश्लेषणातून हे नवीन निष्कर्ष समोर आले आहेत. २०१८ साली हे लँडर मंगळावर पोहोचले होते. हे लँडर दोन वर्षांपूर्वी बंद पडले; परंतु बंद पडण्यापूर्वी या लँडरने १३०० हून अधिक मार्सक्वेक म्हणजेच कंपांची नोंद केली. मंगळावर होणार्या भूकंपांना 'मार्सक्वेक', असे म्हणतात. आता ग्रहाच्या आतल्या भूकंपांचा अभ्यास केल्यानंतर शस्त्रज्ञांना द्रव स्वरूपातील पाण्याचे संकेत मिळाले आहेत. या संशोधनाचा नेमका अर्थ काय? खरंच मंगळावर जीवसृष्टी असू शकते का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. नासाच्या मार्स इनसाइट लँडरच्या (भूकंप मोजणारे उपकरण) डेटावर आधारित विश्लेषणातून हे नवीन निष्कर्ष समोर आले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स) हेही वाचा : 1971: बांगलादेश मुक्तीसंग्रामातील पाकिस्तानच्या आत्मसमर्पण पुतळ्याची तोडफोड? काय आहे या पुतळ्याचे महत्त्व? मंगळ ग्रहावर पाण्याचा साठा मंगळावर द्रवरूप पाण्याचे पुरावे सापडल्याचा खुलासा शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच केला आहे. पाणी भूगर्भातील खडकांच्या भेगांमध्ये लपलेले आहे. पाणी ग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली आहे. हे पाणी मंगळाच्या मध्यभागात सात मैल ते १२ मैल (११.५ किलोमीटर ते २० किलोमीटर) खाली असल्याचे मानले जाते. संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन दिएगोच्या स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीचे प्रमुख शास्त्रज्ञ वाशन राईट यांच्या मते, कोट्यवधी वर्षांपूर्वी मंगळावर नद्या, तलाव आणि शक्यतो महासागर होते. मंगळाच्या ध्रुवावर अजूनही गोठलेल्या पाण्याव्यतिरिक्त द्रवरूप पाणी असल्याचा हा एक सर्वोत्कृष्ट पुरावा आहे. हे संशोधन 'प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मंगळावर किती पाणी? शास्त्रज्ञांच्या मते, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर महासागर भरण्याइतके पुरेसे पाणी असू शकते. "जर अभ्यास केलेले क्षेत्र प्रातिनिधीक स्थान असेल, तर मंगळाच्या मध्यभागी द्रवरूप पाण्याचे प्रमाण प्राचीन महासागरांपेक्षा जास्त असू शकते," असे अभ्यासात म्हटले आहे. संशोधकांचा अंदाज आहे की, या खडकांमधील भेगांमधून सर्व पाणी बाहेर काढले, तर त्यामुले एक ते दोन किलोमीटर खोल जागतिक महासागर भरू शकेल, असे वृत्त 'यूएसए टुडे'ने दिले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर महासागर भरण्याइतके पुरेसे पाणी असू शकते. (छायाचित्र-रॉयटर्स) रोव्हर्स ग्रहाच्या पृष्ठभागावरून डेटा गोळा करीत असल्याने हे स्पष्ट झाले आहे की, मंगळ ग्रह आजच्यासारखा नव्हता. गेली तीन अब्ज वर्षे तिथे वाळवंट आहे. परंतु, भूप्रदेश, खनिजे व खडकांची संरचना पाहता, असे दिसून येते की, हा ग्रह पाण्याने भरलेला होता; परंतु अचानक असे काय झाले की, या ग्रहाने वाळवंटाचे स्वरूप घेतले? संशोधनात सहभागी असणारे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल मांगा म्हणाले, “या ग्रहाच्या उत्क्रांतीमध्ये पाणी हा सर्वांत महत्त्वाचा रेणू आहे. जेव्हा मंगळाचे वातावरण नष्ट झाले, तेव्हा यातले काही पाणी अवकाशात हरवले." प्रा. मांगा पुढे म्हणाले की, पृथ्वीवरील बहुतेक पाणी हे जमिनीखाली आहे. तसेच ते मंगळावर असण्याचीही शक्यता आहे. मंगळावर जीवसृष्टी असू शकते का? "हे संशोधन महत्त्वाचे आहे. कारण- ग्रहावरील हवामान, पृष्ठभाग आणि आतील भागांची उत्क्रांती समजून घेण्यासाठी मंगळाचे जलचक्र समजून घेणे महत्त्वाचे आहे," असे स्क्रिप्सचे सहायक प्राध्यापक राईट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या शोधामुळे मंगळाच्या इतिहासाविषयीची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. "तेथे द्रवरूप पाण्याचा मोठा साठा आहे हे सिद्ध झाल्याने तेथील हवामान कसे होते किंवा कसे असू शकते, यविषयीचा तपास सोपा होईल," असे प्रा. मांगा यांचे सांगणे आहे. ते पुढे म्हणाले, “मला हे समजत नाही की, तेथील भूगर्भातील पाण्यातील वातावरण हे राहण्यायोग्य का नाही? कारण-पृथ्वीवर खोल भागात आणि महासागराच्या तळाशीही जीवन आहे." ग्रहावर जीवनाचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “आम्हाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. परंतु, आम्ही किमान अशा जागेचा शोध घेतला आहे, जी तत्त्वतः जीवन टिकवून ठेवण्यास सक्षम असू शकेल,” असे प्राध्यापक मांगा यांनी 'फोर्ब्स'ला सांगितले. प्राध्यापक राईट म्हणाले की, मंगळाच्या आत अजूनही पाणी आहे. याचा अर्थ असा नाही की, तिथे जीवन आहे. आमच्या निष्कर्षांचा अर्थ असा आहे की, तिथे असे वातावरण आहे, जे शक्यतो राहण्यायोग्य असू शकते, असे असोसिएटेड प्रेस (एपी) वृत्तात म्हटले आहे. हेही वाचा : भारतातील कोचीन ज्यू समुदाय नामशेष होण्याच्या मार्गावर; कारण काय? जाणून घ्या या समुदायाचा इतिहास हे पाणी वापरता येणे शक्य आहे का? मंगळावर आढळलेले पाणी वापरता येण्याची शक्यता लक्षात घेतली, तर त्याचे उत्तर नाही, असे आहे. पाणी पृष्ठभागाखाली १० ते २० किलोमीटर खोल भागात आहे. मंगळावर १० किलोमीटरचा खड्डा खोदणे इलॉन मस्कसाठीही कठीण आहे, असे प्रा. मांगा विनोदाने म्हणाले. मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध सुरू आहे. त्या दृष्टीने पाण्याच्या शोध अतिशय महत्त्वाचा आहे. कारण- द्रवरूप पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे, असे प्राध्यापक मांगा यांनी सांगितले.