Weight Loss Food हल्ली आहाराच्या पद्धती बदलल्या असल्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाही वाढू लागला आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लठ्ठपणा म्हणजे शरीरातील चरबीचा असामान्य किंवा जास्त साठा, जो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेण्यात आल्यास, त्या साठून राहतात आणि लठ्ठपणाला सुरुवात होते. आजकाल अनेकांची बैठी जीवनशैली असल्यामुळेदेखील ही समस्या वाढत आहे.

वजन कमी करण्यासाठी लोक आजकाल विविध उपाय, उपचार करताना दिसतात. वजन कमी करणे आहार, अति व्यायाम आणि खर्चीक दिनचर्या यांच्याशी जोडले जाते; परंतु आपल्या जीवनशैलीतील अगदी साधे आणि छोटे बदलही मोठा फरक घडवू शकतात. हे स्वतः डॉक्टर्स सांगतात. दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका यकृत (लिव्हर) तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यासंबंधीच्या खुलाशात स्पष्ट केले की, आहारात एका साध्या पदार्थाचा समावेश केल्यामुळे त्यांचे वजन कमी झाले. डॉक्टरांनी नक्की काय सांगितले? कोणत्या पदार्थाचा समावेश केल्याने वजन कमी करण्यात मदत होणार? सविस्तर जाणून घेऊयात…

फोर्टिसच्या डॉक्टरांनी तीन वर्षांत ३८ किलो वजन कसे घटवले?

वसंत कुंज येथील फोर्टिस हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हिपॅटोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्या यांनी तीन वर्षांच्या कालावधीत ३८ किलोग्रॅम वजन कमी केले. त्यांचे केवळ वजनच नव्हे, तर चयापचय, यकृताचे आरोग्य आणि ऊर्जा पातळीही सुधारल्याचे ते सांगतात. एका अलीकडील व्हिडीओमध्ये डॉ. वात्स्या यांनी स्पष्ट केले की, रोज तीन अंडी खाणे हा त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग ठरला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा बदल फार मोठा किंवा कठीण नव्हता. हा केवळ शिस्तबद्ध दिनचर्येचा भाग होता.

Award Banner

ते म्हणाले की, तीन अंडी अंदाजे १८ ग्रॅम उच्च-गुणवत्तेची प्रथिने प्रदान करतात. ही प्रथिने स्नायूंच्या पुनर्प्राप्तीस (मसल रिकव्हरी) मदत करतात आणि चयापचय क्रिया वाढवतात. या दोन्ही गोष्टी चरबी कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यांनी असेही स्पष्ट केले की, प्रथिने शरीराला अधिक कार्यक्षमतेने चरबी जाळण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारात अंड्यांचा समावेश अधिक आवश्यक आहे.

यकृत आणि हृदय आरोग्यासाठी अंडी किती महत्त्वाची?

डॉक्टर वात्स्या यांनी सांगितले की, अंड्यातील पिवळा बलक कोलीन या पोषक तत्त्वाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. हे पोषक तत्व यकृतातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास आणि साठवलेली चरबी कमी करण्यास मदत करते. ते मानतात की, या गुणधर्मामुळे अंडी यकृतासाठी फायदेशीर ठरतात आणि त्यांचे नियमित सेवन केल्यास यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते. डॉक्टर वात्स्या यांनी अंड्यांमुळे हृदयाच्या आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांविषयीही सांगितले. अनेक लोक कोलेस्ट्रॉलबद्दल काळजी करतात; पण त्यांनी स्पष्ट केले की, नियमितपणे अंडी खाल्ल्याने खरं तर एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढते आणि एलडीएल (खराब कोलेस्ट्रॉल)चे रूपांतर सुरक्षित स्वरूपामध्ये होते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका कमी होऊ शकतो. अर्थात, उर्वरित आहार संतुलित असणे आवश्यक आहे.

त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठीही उपयुक्त

प्रथिने आणि कोलीनव्यतिरिक्त, अंड्यांमध्ये ल्युटीन व झिझॅन्थिन ही दोन अँटिऑक्सिडंट्सदेखील आढळतात. ही पोषक तत्त्वे डोळ्यांचे संरक्षण करतात, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि वृद्धत्व मंदावण्यास मदत करतात, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, बहुतेक लोक अंड्याच्या पिवळ्या बलकाचे पौष्टिक मूल्य कमी लेखतात. मात्र, त्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी रोज अंडी खाण्यास सुरुवात केल्यावर त्यांचे जीवन बदलले. या साध्या सवयीने त्यांना उत्साही राहण्यास, आरोग्य सुधारण्यास मदत केली. ते अंड्यांना ‘चमत्कारिक अन्न’ म्हणत नाहीत; परंतु संतुलित आहार आणि नियमित व्यायामाबरोबर दिवसातून तीन अंडी खाणे मोठा परिणाम साधू शकतात, असे त्यांचे मत आहे.

डॉक्टर वात्स्या यांनी लोकांना ही सवय किमान ३० दिवस करून पाहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. हेल्थलाइननुसार, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर रोजच्या आहारात अंडी समाविष्ट करणे एक साधे आणि प्रभावी पाऊल असू शकते. अंड्यांच्या सेवनाने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही अति खाणे टाळता.परिणामी नैसर्गिकरीत्या कॅलरीजचे सेवन कमी होते. अंडी कोलीन आणि व्हिटॅमिन डीसारखी महत्त्वाची पोषक तत्वेदेखील प्रदान करतात. अनेक लोकांमध्ये या पोषक तत्त्वांची कमतरता आढळते.

अचानक वजन वाढण्याची ६ कारणे

अचानक वजन वाढणे त्रासदायक आणि गोंधळात टाकणारे असू शकते. वजन नेहमी जास्त खाण्यामुळे वाढत नाही. कधी कधी याची कारणे तुमच्या हार्मोन्स, जीवनशैली किंवा आरोग्यामध्ये दडलेली असतात.

  • हार्मोन्सचे असंतुलन : थायरॉईड विकार, पीसीओएस (PCOS) आणि रजोनिवृत्ती (Menopause) यांसारख्या स्थिती चयापचय आणि चरबी साठवण्यावर परिणाम करू शकतात. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास वजन वाढू शकते.
  • तणाव आणि कॉर्टिसोल : तणावामुळे कॉर्टिसोल (नावाचे हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे गोड आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे पोटाच्या आसपासची चरबी वाढले आणि अचानक वजन वाढू शकते.
  • झोपेचा अभाव : अपुरी झोप भूक नियंत्रित करणाऱ्या घ्रेलिन आणि लेप्टिन या हार्मोन्समध्ये अडथळा आणते. या असंतुलनामुळे तुम्हाला जास्त भूक लागते आणि वेगाने वजन वाढण्याची शक्यता असते.
  • काही औषधे : काही औषधे, जसे की अँटीडिप्रेसंट्स, स्टिरॉइड्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि ॲलर्जीची औषधे, चयापचय मंदावून किंवा शरीरातील पाणी धरून ठेवून वजन वाढवू शकतात.
  • पाणी साठून राहणे : वजनात अचानक वाढ होणे हे खरं तर पाणी धरून ठेवल्यामुळे असू शकते. जास्त मीठाचा आहार, मासिक पाळीपूर्वीची स्थिती किंवा किडनी/हृदयाच्या समस्यांसारख्या वैद्यकीय कारणांमुळे असे होऊ शकते. यामुळे तुम्हाला रात्रभर जड वाटू शकते.
  • आतड्यांसंबंधी आणि पचनासंबंधी समस्या : बद्धकोष्ठता, पोट फुगणे किंवा आतड्यांमधील जीवाणूंचे असंतुलन यांसारख्या पचनाच्या समस्यांमुळे अचानक वजन कमी किंवा जास्त होऊ शकते. पचनसंस्था नीट कार्य करत नसल्याने शरीरात अतिरिक्त टाकाऊ पदार्थ आणि द्रव पदार्थ साठवून ठेवते.