-अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी कारकीर्द ही ब्रिटनच्या इतिहासात सर्वात अल्पजीवी ठरली आहे. शपथ घेतल्यानंतर अवघ्या ४५ दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र या काळात ब्रिटनने प्रचंड आर्थिक आणि राजकीय उलथापालथ पाहिली. या घटनाच ट्रस यांच्या गच्छंतीला कारणीभूत ठरल्या. मात्र याची सुरुवात त्यांच्या निवडीच्या कारणापासूनच झाली होती.

निवड केवळ करकपातीच्या आश्वासनामुळे?

बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षात झालेल्या निवडणुकीमध्ये आधीच्या सर्व फेऱ्यांमध्ये अर्थमंत्री ऋषी सुनक आघाडीवर होते, तर ट्रस दुसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र अखेरच्या फेरीत ट्रस यांनी सुनक यांना मात दिली. याचे मुख्य कारण अखेरच्या फेरीत पक्षाच्या सर्व सामान्य सभासदांनी मतदान केले. ट्रस यांनी पंतप्रधान झाल्यास मोठ्या करकपातीचे आश्वासन दिले होते, तर अशी करकपात अर्थव्यवस्थेला धोका ठरेल असा इशारा सुनक यांनी दिला होता. मात्र ट्रस यांच्या घोषणेला भुलून त्यांना पक्षाने निवडून दिले. ही हुजूर पक्षाची सर्वात मोठी चूक ठरली.

हेही वाचा – अग्रलेख : आज की उद्या?

आश्वासनाच्या नादात अर्थव्यवस्थेचा बळी?

सत्तेत येताच ट्रस यांनी ‘छोटा अर्थसंकल्प’ सादर केला.अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्या करवीत्यांनी कररचनेत मोठे बदल केले. मात्र याचा उलटा परिणाम झाला. श्रीमंतांना करमाफी द्यायची तर उद्भवणाऱ्या महसूलतुटीचा खड्डा भरण्यासाठी निधी कुठून आणायचा, याचे नेमके उत्तर ट्रस-क्वारतेंग यांच्याकडे नव्हतेच.आधीच करोना आणि युद्धामुळे मंदी असताना या घोषणांमुळे शेअर बाजार गडगडले आणि पौंड ऐतिहासिक रसातळाला गेला.यामुळे ट्रस यांच्यावरील पक्षाचा विश्वास उडाला.

अर्थमंत्र्यांचा बळी देऊन खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न?

अत्यंत अपरिपक्व धोरणामुळे अर्थव्यवस्था गडगडल्यानंतर ट्रस यांनी आपल्या अर्थमंत्र्यांचा बळी दिला.वॉशिंग्टनमध्ये अन्य देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठकीला गेलेल्या क्वारतेंग यांना ट्रस यांनी लंडनला बोलावून घेतले आणि त्यांची हकालपट्टी केली. आपलीच धोरणे राबवणाऱ्या अर्थमंत्र्यांना हाकलणे हे ट्रस यांच्या बाळबोध राजकारणाचे लक्षण मानले गेले. अनेकांना ‘बाळाला पायाखाली घालणाऱ्या माकडीणीची गोष्ट’ आठवली. मात्र त्यानंतरही ट्रस यांचे सरकार तोल सावरू शकले नाही.

हेही वाचा – अग्रलेख : ट्रस ‘ट्रसल्या’!

भारतासोबत व्यापार करारात अपयश आल्याचा फटका?

युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन आणि भारताच्या ‘मुक्त व्यापार करारा’वर वाटाघाटी सुरू आहेत. करार अस्तित्वात येण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त ठरला होता. मात्र ट्रस यांना स्वत:च्या देशाची आर्थिक घडी सुधारणारा हा करार करण्यात अपयश आले. त्यांच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (या स्वत: भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे पितृकूळ गोव्यातील तर मातृकूळ तमिळ आहे) यांनी अनेक भारतीय व्हिसाचे उल्लंघन करून ब्रिटनमध्ये राहात असल्याचे विधान केले. करार रखडण्याचे हे देखील एक कारण मानले गेले.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याने अखेरचा अंक लिहिला?

ब्रेव्हरमन यांनी बुधवारी अत्यंत तांत्रिक कारणाने राजीनामा दिला. आपल्या खासगी ईमेल पत्त्यावरून अधिकृत कागदपत्रे पाठवल्यामुळे त्यांनी नियमांचा भंग केला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या राजीनामापत्रात चुकीची जबाबदारी स्वीकारण्यावरून ट्रस यांना खडेबोल ही सुनावले. मात्र बुडते जहाज सोडण्यासाठी ब्रेव्हरमन यांनी केवळ कारण शोधले का, अशी शंका राजकीय तज्ज्ञांनी बोलून दाखवली. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याच दिवशी जहाज बुडाले.

हेही वाचा – अग्रलेख : ‘ट्रसट्रसती’ जखम!

पक्षाने निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर राजीनामा?

ब्रेव्हरमन यांच्या टीकेनंतरही आपण खुर्ची सोडणार नसल्याचे ट्रस सांगत होत्या. मात्र गुरुवारी एक महत्त्वाची घटना घडली. हुजूर पक्षातील सर्वात ज्येष्ठ पार्लमेंट सदस्य सर ग्रॅहम ब्रेडी यांनी अचानक ट्रस यांची भेट घेतली. ब्रेडी हे पक्षाच्या ‘१९२२ बॅकबेंचर्स कमिटी’चे अध्यक्ष आहेत. या भेटीत सर ब्रेडी यांनी ट्रस यांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे सांगितले जाते. अखेर सर्व मार्ग संपल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रस पायउतार झाल्या.

पक्षाच्या घटनेतील ‘ती’ तरतूद महत्त्वाची ठरली?

सत्ताधारी हुजूर पक्षाच्या घटनेनुसार एकदा पक्षनेतेपदी (आणि पर्यायाने पंतप्रधानपदी) निवडून आल्यानंतर एक वर्ष कुणाला हटवता येत नाही. मात्र ‘१९२२बॅक बेंचर्स कमिटी’ या पार्लमेंट सदस्यांच्या समितीला पक्षाची घटना बदलण्याचा अधिकार आहे. ट्रस्ट यांना हटवायचेच असते, तर सर ब्रेडी यांची ही समिती एक वर्षाची मर्यादा हटवू शकली असती. त्यामुळे आणखी नामुष्की टाळून सरळ राजीनामा देण्याचा मार्ग ट्रस यांनी पत्करला.

हेही वाचा – अन्यथा : या मुलाखती इथे कशा?

ट्रस यांच्यानंतर पंतप्रधानपदी कुणाची वर्णी?

पक्षाच्या घटनेनुसार आता पुन्हा नेतेपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. २८ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे ट्रस यांनी जाहीर केले. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ट्रस यांचे प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांचे नाव आता अर्थातच आघाडीवर आहे. सुनक यांची निवड झाल्यास ते ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान होतील. माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन देखील रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी त्यांना फारसा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय पेन्नी मोरडाऊंट, सुएला ब्रेव्हरमन आणि संरक्षणमंत्री बेन वॉलेस हे देखील पुन्हा स्पर्धेत उतरू शकतात.

एका अजब योगायोग…

ब्रिटनमधील राजकीय घडामोडींमुळे एक विचित्र योगायोग घडला आहे.ट्रस पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले. त्या ब्रिटनच्या सिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेल्या सम्राज्ञी होत्या. तर आता ट्रस यांची सर्वात कमी काळ (४५ दिवस) पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्या म्हणून इतिहासात नोंद झाली आहे. त्यांच्याखालोखाल जॉर्ज कॅनिंग यांची कारकीर्द ११९ दिवसांची होती. ८ ऑगस्ट १८२७ रोजी पंतप्रधान असताना त्यांचे निधन झाले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liz truss resign why her tenure is such short and who will be next uk pm print exp scsg
First published on: 21-10-2022 at 08:06 IST