उतारवयात आल्यावर अनेकांना त्यांनी तरुण वयात केलेल्या चुकांची किंवा घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची जाणीव होते. बरेचदा असेही वाटते की त्या वेळी कुणी योग्य मार्गदर्शन किंवा सल्ला दिला असता तर… किंवा भविष्याचा आरसा समोर धरला असता तर… तर हा आरसा किंवा सल्ला देण्यासाठी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे एक चॅटबॉट तयार केला आहे. चॅटबॉट म्हणजे काय, त्याचा उपयोग कसा होणार त्याविषयी…

‘चॅटबॉट’ नक्की आहे काय? 

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालणारी एक नवीन यंत्रणा तयार केली आहे. ती यंत्रणा म्हणजे चॅटबॉट. भविष्यातील सुज्ञ निर्णय घेण्यासाठी टाइम मशीनऐवजी, एमआयटीचा ‘फ्युचर यू’ प्रकल्पाने हा चॅटबॉट तयार केला आहे. OpenAI च्या GPT3.5 द्वारे त्याचे कार्य चालते. 

‘चॅटबॉट’ निर्मितीमागचा उद्देश काय?

लोकांना त्यांच्या भविष्याचा दूरपर्यंत विचार करण्यास आणि त्यानुसार त्यांच्या वर्तमानकाळातील वर्तनात सकारात्मक बदल करण्यास प्रोत्साहित करणे हे चॅटबॉटच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तसेच त्यातून लोकांना त्यांच्या जीवनातील परिणामांसाठी अनुकूल असलेल्या सद्यस्थितीत अधिक सुज्ञ निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे, हेही उद्दिष्ट आहे. चॅटबॉट वापरकर्त्यांना संभाषणांमध्ये गुंतवून ठेवते. चॅटबॉटचे प्रतिसाद वापरकर्त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित करतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘एमएमआरडीए’ आर्थिक संकटात कशी?

चॅटबॉटशी संवाद साधण्यासाठी काय करायचे? 

चॅटबॉटशी संवाद साधण्यासाठी, वापरकर्त्यांना प्रथम स्वत:बद्दल, त्यांचे मित्र आणि कुटुंब, त्यांना आकार देणारे भूतकाळातील अनुभव आणि भविष्यासाठी त्यांनी केलेल्या आदर्श जीवनाबद्दलच्या कल्पना अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले जाते. त्यानंतर ते त्यांचे सध्याचे छायाचित्र अपलोड करतात. म्हणजेच थोडक्यात चॅटबॉटचा वापर करणारे स्वतःबद्दल आणि त्यांच्या ध्येयांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देऊन बोलण्यास सुरुवात करतात. त्यानंतर ते भविष्यात कसे दिसू शकतात हे पाहण्यासाठी ते सध्याचे छायाचित्र अपलोड करतात. हे चॅटबॉट प्रोग्रामसाठी विश्वासार्ह भविष्य तयार करण्यात मदत करते.

‘चॅटबॉट’चे कार्य कसे चालते? 

तरुण किंवा मध्यमवयीन वापरकर्त्यांना चॅटबॉट सुरकुत्या, पांढरे केस असलेले ज्येष्ठ म्हणून दाखवण्यासाठी त्यांचे भविष्यातले छायाचित्र डिजिटली तयार करून त्यांच्यासमोर सादर करते. तसेच वापर करणाऱ्याच्या आठवणी तसेच त्याने सांगितलेल्या त्याच्या इच्छा यांचा मेळ घालून त्यांच्या यशस्वी जीवनाचे भविष्यातले चित्र  किंवा कल्पना सादर करते. ते करताना जे भविष्य चॉटबॉटच्या माध्यमातून ते पाहता आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्यांना वर्तमानात कोणत्याकोणत्या गोष्टी आज अधिक प्रभावीपणे केल्या पाहिजे त्याचा विचार करण्यास प्रोत्साहित करते. जेव्हा चॅटबॉट प्रश्नांना प्रतिसाद देतो ते तुम्ही त्याला दिलेल्या माहितीतून असते. त्यामुळे तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे स्वत:बद्दल सांगाल तितक्याच परिणामकारक भविष्याचा उलगडा तुम्हाला होईल. जर परस्परसंवाद वरवरचा वाटत असल्यास, त्याची परिणामकारकता मर्यादित असू शकते.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?

चॅटबॉटचा उपयोग कसा होतो?

चॅटबॉटच्या निर्मितीनंतर ३४४ स्वयंसेवकांचा समावेश करून त्यांच्या भविष्याबाबतच्या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, चॅटबॉटबरोबर केलेल्या संवादामुळे लोकांचा तणाव मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यांना भविष्याबद्दल वाटणारी चिंताही कमी झाली. ते त्यांच्या भविष्याशी अधिक जोडले गेले. प्रकल्पावर काम करणारे पॅट पटरनुटापोर्न सांगतात, की चॅटबॉटने त्यांना आठवण करून दिली की ‘भविष्यात त्यांचे पालक जवळ नसतील किंवा त्यांच्याबरोबर नसतील, म्हणून त्यांनी शक्य असेल तेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे.’’ यातून त्यांना पालकांविषयी नवा दृष्टिकोन मिळाला. त्याप्रमाणेच विशिष्ट ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे, नियमितपणे व्यायाम करण्यापासून ते आरोग्यदायी खाणे आणि भविष्यासाठी अधिक विवेकपूर्ण आर्थिक नियोजन असे अनेक सकारात्मक बदल चॅटबॉटशी संवाद साधणाऱ्यांमध्ये भविष्याचा वेध घेतल्यानंतर दिसून येतात.