भारतीय पारपत्र (पासपोर्ट) मिळवून मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्त्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदानही केले होते. आरोपींपैकी एक जण या पारपत्राच्या आधारे परदेशात नोकरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटप कार्ड बनवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या अनेकदा झिजवाव्या लागतात. दाखले बनवण्यासाठी महिनाभर फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्यांना एवढ्या सहज शासकीय कागदपत्र कसे मिळतात, असा प्रश्न उपस्थित होतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण?

एटीएसच्या जुहू कक्षाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेतले. तपासात आरोपींनी भारतीय पारपत्र मिळवल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रियाज हुसेन शेख (३३), सुलतान सिध्दीक शेख (५४), इब्राहिम शफिउल्ला शेख (४६) व फारूख उस्मानगणी शेख (३९) यांना अटक केली. भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असल्याबाबत आरोपींविरोधात मुंबईत गुन्हे दाखल असून गुजरातमधील सूरत येथे वास्तव्याला असताना त्यांनी पारपत्र प्राप्त केले होते. याशिवाय आरोपींप्रमाणे आणखी पाच जणांनी अशा प्रकारे पारपत्र मिळवले असून त्यातील एक जण या पारपत्राच्या साह्याने सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

हेही वाचा >>> मुस्लीम धर्मियांसाठी हज यात्रेचे महत्त्व काय? या यात्रेत मुस्लीम कोणते विधी करतात?

लोकसभेसाठी मतदान केले का?

सामान्य भारतीय नागरिकांकडे जेवढी शासकीय प्रमाणपत्र नाहीत, त्याहून अधिक कागदपत्रे आरोपींनी तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी पारपत्रासह लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केल्याचे उघड झाले आहे. भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी, तसेच भारतीय पारपत्रावर परदेशात नोकऱ्या मिळणे शक्य असल्याने बांगलादेशी नागरिक ते प्राप्त करतात, असे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात दहशतवादी कृत्यांशी आरोपींचा संबंध आहे का याबाबत तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> एनटीएने रद्द केले १,५६३ विद्यार्थ्यांचे वाढीव गुण; कारण काय? आता पुढे काय होणार?

भारताचे नागरिकत्व बांगलादेशी कसे मिळवतात?

पनवेलमधून काही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत त्यांनी सहा ते सात हजार रुपयांमध्ये शिधावाटप पत्रिका मिळवण्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या आधारे पुढे चालक परवाना, ग्रामपंचायतकडून स्थानिक वास्तव्याचा दाखला, तहसीलकडून जन्माचा दाखला, अधिवासाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून देण्यात आला होता. एजंटमार्फत ही सर्व कामे त्यांनी केली होती. बनावट कागदपत्रांद्वारे आरोपींनी हे सर्व सरकारी दाखले मिळवले होते.

भारतात स्थायिक कसे केले जाते?

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अक्रम नूर नवी शेख (२६) नावाच्या बांगलादेशी नागरिकाला अटक केली होती. तो मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी होता. अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात राहत होता. बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. इथे आल्यानंतर आरोपीने त्याचा साथीदार शफीक याच्यासह तेथील नागरिकांना बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आणण्यास सुरू केले. भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश देऊन मुंबईत परिसरात कामधंदा मिळवून देण्याचे काम अक्रम करत होता. त्यासाठी तो प्रति व्यक्ती २० हजार रुपये घेत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. तसेच अक्रम कमिशन घेऊन त्याद्वारे बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम मायदेशात पाठवण्याचेही काम करत होता. अक्रम शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीमार्फत अक्रमशी संपर्क साधण्यात आला. तो शिवडी येथे आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis bangladeshis acquiring indian passport casting vote in india print exp zws