नेदरलँड्सच्या दक्षिण हॉलंड प्रांतात गउडा नावाचे (डच नाव हाउडा) एक शहर आहे. जगभरात प्रसिद्ध असणारे गउडा चीज याच शहरातले. पण आणखी काही वर्षांनी हे ताजे, रसरशीत चीज येथे मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कारण पाणथळीवर वसलेले हे संपूर्ण शहरच त्याखालील पाणी पुढील काही दशकांमध्ये गिळून टाकण्याची चिन्हे आहेत. पर्यावरणाचा समतोल मानवी हस्तक्षेपाने बिघडवला तर त्याचे परिणामही सामोरे येतात, याचे गउडा हे चपखल उदाहरण आहे.

चीजची बाजारपेठ किती मोठी?

गउडा शहरात तसेच आसपासच्या भागात या विशिष्ट चीझचे उत्पादन होते. गउडा ही चीजच्या खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ. आसपासच्या काऊंटीमधून शेतकरी आपले चीज विकण्यासाठी येथे आणतात. गउडाच्या बाजार चौकात चीजच्या लाकडी चक्राकार चकत्या हारीने मांडून ठेवलेल्या असतात. विक्रेत्यांच्या विविध गटांना ओळखण्यासाठी विविध रंगांच्या टोप्या असतात. नेदरलँड्सच्या एकूण चीज उत्पादनाचा ६० टक्के वाटा गउडा शहर उचलते. येथील चीजची वार्षिक निर्यात १.७ अब्ज डॉलर्स आहे. पर्यटकही हा बाजार पाहायला आवर्जून येतात. या चीजचे वैशिष्ट्य म्हणजे हे चीज दूध कच्चेच ठेवून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करत बनवतात. त्यामुळे हे पिवळसर चीज चविष्ट लागते आणि पौष्टिकही असते. या गउडा चीजसाठी दुधातून संपूर्ण पाणी काढून टाकले जाते. पण गउडाच्या शेतकऱ्यांना शहराच्या भूभागाखालच्या पाण्याचे काय करायचे याबाबत काही सुचलेले नाही. हा चीजचा बाजार आणखी ५० ते १०० वर्षांनी असेल का असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी ‘आसाम पॅटर्न’?

नेमकी समस्या काय?

नेदरलँड्स युरोपाच्या पश्चिमेकडे वसलेला एक लहानसा देश आहे. नेदरलँड्स त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे. नेदरलँड्सचा बहुतांश भूभाग शतकांपूर्वी पाणथळीवर तयार झाला आहे. त्यामुळे तो टणक नाही. नदीने वाहून आणलेल्या गाळाच्या जमिनीवर येथे घरे असल्याने ती कायमच धोक्याच्या पातळीवर असतात. गउडा शहर तर सातत्याने खचत आहे. शहराचा मध्यवर्ती आणि प्राचीन भूभाग दरवर्षी ३ ते ६ मिलीमीटर खचत आहे तर हेच प्रमाण नवीनतम भूभागाबाबत दरवर्षी १ ते २ सेंटीमीटर इतके आहे. पाणथळीवर बांधलेले हे शहर बुडण्याची भीती कायम या शहरावर असते आणि तो धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दशकांमध्ये पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे आणि परिणामी समुद्राच्या पातळीतही वाढ  होत आहे. हवामान बदलाचा परिणाम होऊन या भागात पुराचा धोका वाढलेला आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

युट्रेच विद्यापीठाचे प्राध्यापक गिल्स एर्कन्स हे त्रिभुज प्रदेशातील भूभाग खचण्याच्या समस्येवर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या गटात आहेत. नेदरलँड्स गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.

रॉटरडॅमच्या इरास्मस विद्यापीठाचे प्राध्यापक जॅन रोटमन्स यांनीही अशाच पद्धतीचे भाष्य केले आहे. प्रदेशातील वाढत्या समुद्र पातळीविषयी चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की हरित हृदय (ग्रीन हार्ट) म्हणून ओळखला जाणारा गउडा प्रदेश शतकाच्या अखेरीस पाण्याखाली जाईल किंवा तरंगत्या शहरांवर बांधला जाईल. पुढील १०० वर्षांत गउडा चीज मिळण्याची शक्यता धूसर आहे असे मतही रोटमन्स यांनी व्यक्त केले. गउडा शहर पाण्याखाली गेले तर गुरे चरणार कुठे? गाईच नसतील तर चीजही देशाच्या पूर्वेकडून येईल. गउडातून नाही, असे तज्ज्ञांना वाटते.

हेही वाचा >>> बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासमोर असतील ‘ही’ आव्हाने

गउडा शहर किती वेगाने खचत आहे?

शहराचा मध्यवर्ती आणि प्राचीन भूभाग दरवर्षी ३ ते ६ मिलीमीटर खचत आहे तर हेच प्रमाण नवीनतम भूभागाबाबत दरवर्षी १ ते २ सेंटीमीटर इतके आहे, अशी माहिती या समस्येविषयी जागृती करणारे शहराचे अल्डरमन (स्थानिक प्रतिनिधी ) क्लिजमिज वॅन दर लान देतात. गउडा शहराची लोकसंख्या सुमारे ७५ हजार इतकी आहे. पण शहराचा पाणी समस्येवरील उपायांचा खर्च तब्बल २२ दशलक्ष डॉलर्सच्या घरात जातो. याच खर्चात पाणी समस्या, दुरुस्ती, यंत्रणेचे अद्ययावतीकरण आणि पाइपांची डागडुजी हा सर्व खर्च उत्तरोत्तर वाढत आहे. त्याचा बोजा शहरातील नागरिकांवर कररूपाने वाढत चालला आहे.

पाणी पातळीत वाढ झाल्याचे पुरावे

गउडा शहरात सगळीकडे पाणी पातळी वाढल्याचे पुरावे जागोजागी दिसतात. टर्फमार्केटजवळ कालव्याच्या भितींच्या वरच्या भागापर्यंत पाणी वाढते. लिली पॅड्सवर फुललेल्या वॉटर लिली अगदी रस्त्याच्या पातळीपर्यंत दिसतात. जुन्या इमारतींना त्या सखल भागात असल्याने वारंवार पुराचा सामना करावा लागतो. गल्ल्या गटाराच्या पाण्याने तुंबतात. तळघरे नियमितपणे पाण्याखाली जातात. बुरशी भिंतींवर सरकते आणि प्लास्टरला तडे जातात.

काय उपाययोजना केल्या जातात?

डच जल अभियंते त्यांच्या जलव्यवस्थापन कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत कारण त्यांनी धरणे, तलाव आणि कालवे यांची गुंतागुंतीची प्रणाली वापरून संपूर्ण देश दलदलीवर बांधला आहे. पाणथळीवरच्या शहरांच्या व्यवस्थापनाचे नियोजन नियमित केले जाते. अतिरिक्त पाणी पंपांच्या सहाय्याने खेचले जाऊन नद्यांमध्ये सोडले जाते. पंपांची नियमित दुरुस्ती केली जाते. काही जुन्या घरांना भक्कम पायाच नाही. एक हजारांहून अधिक घरे लाकडी पायावर उभी आहेत. पण जमिनीतल्या पाण्यामुळे ओलावा धरून ही लाकडेही सडतात. फ्लोटिंग घरे हे नेदरलँड्सचे आणखी एक वैशिष्ट्य. पाण्याची पातळी वर आल्यास ही घरे अलगद वर उचलले जाण्याची यंत्रणा असते. असे असले तरी २०४० ते २०५० पर्यंत गउडाकडे एक नवी योजना हवी. नव्या उपाययोजना हव्यात, केवळ पंपांच्या सहाय्याने पाणी खेचत राहून उपयोग नाही, कारण हा उपाय खूप खर्चिक आहे, असे शहराचे अल्डरमन (स्थानिक प्रतिनिधी ) क्लिजमिज वॅन दर लान यांना वाटते. पालिकेने शहराची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अलिकडेच एक ‘गउडा फर्म सिटी’ नावाची लघु मुदतीची योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे स्थानिक कालव्याला, टर्फमार्केटला दोन्ही बाजूंनी धरणे बांधून आणि स्थानिक नद्यांमध्ये पाणी उपसून शहराच्या मध्यभागी पाण्याची पातळी नियंत्रित ठेवली जाणार आहे. यामुळे हळूहळू पाण्याची पातळी २५ सेंटीमीटर किंवा सुमारे १० इंच कमी होण्याची अपेक्षा आहे. पण हे तात्कालिक उपाय झाले. ठोस उपाययोजना केली नाही तर नजीकच्या भविष्यात गउडा शहरात मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे.