भारताने के-४ क्षेपणास्त्राची ‘आयएनएस अरिघात’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून केलेली चाचणी यशस्वी झाली. यामुळे जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणांहून अण्वस्त्रे डागण्याची आपली क्षमता आणखी बळकट झाली. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन अशा मोजक्या देशांच्या यादीत भारत यापूर्वीच गेला आहे. अर्थात, आणखी बराच मोठा टप्पा पार करण्याची गरज आहे.

जमिनीवरून, हवेतून, पाण्यातून…

के-४ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीने भारताचे आण्विक त्रिकूट (न्युक्लिअर ट्रायॅड) पूर्ण झाले आहे. जमिनीवरून अग्नी क्षेपणास्त्रासह आंतरखंडीय मारा करणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे; सुखोई, रफाल, मिराज अशा लढाऊ विमानांतून हवेतून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि अरिहंत वर्गातील पाणबुडीच्या माध्यमातून पाण्यातूनही अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आपल्याकडे आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या ‘आयएनएस अरिहंत’मधून के-१५ या क्षेपणास्त्रांनी ७५० किलोमीटरपर्यंत मारा करता येतो. के-४ क्षेपणास्त्रे ही ३५०० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात. यामुळे भारताचे आण्विक त्रिकूट दृढ झाले आहे.

भारताची पाणबुडी शक्ती

भारताकडे अण्वस्त्रे डागू शकतील, अशा ‘आयएनएस अरिहंत’ आणि ‘आयएनएस अरिघात’ या दोन पाणबुड्या (एसएसबीएन) आहेत. याच वर्गातील ‘आयएनसएस अरिधमन’ ही तिसरी पाणबुडी येत्या वर्षात लवकरच नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, चौथीही अत्याधुनिक पाणबुडी पुढील काही वर्षांत दाखल होण्याची शक्यता आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या आणि पारंपरिक शस्त्रे डागू शकणारी पाणबुडीही (एसएसएएन) रशियाकडून पुढील काही वर्षांत येण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय बनावटीच्या दोन ‘एसएसएन’ २०३६-३८ पर्यंत नौदलात दाखल होतील. अमेरिकेकडे १४ ‘एसएसबीएन’ आणि ५३ ‘एसएसएन’ आहेत. तर, चीनकडे ६ ‘एसएसबीएन’ आणि ६ ‘एसएसएन’ आहेत.

प्रहार क्षमता दृढ

भारताकडे जमिनीवरून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे नेऊ शकतात. यात प्रामुख्याने अग्नी क्षेपणास्त्रांचा समावेश होतो. हवेतून जमिनीवर, अर्थात लढाऊ विमानांतूनही ते डागता येते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा यात समावेश होतो. हवेतून क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमताही आपण अधिक आधुनिक करीत आहोत. समुद्रातूनही के-मालिकेतील क्षेपणास्त्रांनी अण्वस्त्रे डागता येतात. के-१५ क्षेपणास्त्रे अरिहंत पाणबुडीतून डागण्यासाठी सज्ज आहेत. परंतु, त्यांची क्षमता ७५० किलोमीटरपर्यंतच होती. के-४ क्षेपणास्त्रे ३५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. के-५ आणि के-६ क्षेपणास्त्रांवरही काम सुरू असून, त्यांची मारा करण्याची क्षमता यापेक्षाही जास्त असेल.

‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’द्वारे नियंत्रित

भारतातील आण्विक त्रिकूट नवी दिल्लीस्थित ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’द्वारे (एसएफसी) नियंत्रित आहे. तिन्ही संरक्षण दलांतील अधिकारी यामध्ये असतात. भारतातील एकत्रिक कमांड रचनेमधील ही कमांड आहे. अंदमान आणि निकोबार या ठिकाणी भारताची एकत्रित कमांड आहे. ‘एसएफसी’ अण्वस्त्रे नियंत्रित करीत असली, तरी या बाबतीतील सर्व निर्णय लोकप्रतिनिधी घेतात. पंतप्रधान, सुरक्षेसाठीची कॅबिनेट समिती या संदर्भातील सर्व निर्णय घेते.

वेग वाढविण्याची गरज

युद्धनौकांच्या आणि सागरी बळाच्या बाबतीत भारत प्रगती करीत असला, तरी यामध्ये वेग वाढविण्याची गरज आहे. देशी बनावटीच्या युद्धनौकानिर्मितीमध्ये जास्तीत जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची असायला हवी. त्याचे प्रमाण १०० टक्क्यांच्या जवळ हवे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा वेग वाढविण्याची नितांत गरज आहे. नौदलात ज्या युद्धनौका दाखल झाल्या आहेत, त्यादेखील अनेक नियोजित वेळेपेक्षा उशिरा दाखल झाल्या आहेत. क्षेपणास्त्रांच्या बाबतीत होणाऱ्या प्रगतीबरोबर क्षेपणास्त्रे डागता येणाऱ्या आयुधांमध्येही तितकीच प्रगती, आत्मनिर्भरता येणे गरजेचे आहे. लढाऊ विमानांच्या बाबतीत भारतासमोरील आव्हान खूप बिकट आहे, सागरी शक्तीमध्येही आधुनिकता आणण्यासाठीचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे.

बड्या देशांमध्ये नोंद; पण..

आण्विक त्रिकुटाच्या क्षमतेने भारताचा समावेश बड्या देशांच्या यादीत झाला आहे. मात्र, या क्षमतेचे रूपांतर पूर्णपणे डिटरन्समध्ये होण्याची गरज आहे. भारताला पाकिस्तान आणि चीनचे आव्हान आहे. भारत-अमेरिका संबंध चांगले असले, तरी पाकिस्तानला चीनबरोबरच अमेरिकेचीही साथ आहे. हे पाहता भारतासमोरील आव्हान अधिकच वाढते. या सामरिक शक्ती शत्रूच्या मनात भीती प्रस्थापित व्हावी, त्यांचे भारताविरोधातील मनसुबे उधळावेत, यासाठी असतात. भारताच्या सुदैवाने क्षेपणास्त्रांच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये अधिकाधिक डिटरन्स प्रस्थापित करून हिंदी महासागर विभागात सुसज्ज राहण्याची गरज आहे.

prasad.kulkarni@expressindia.com