राखी चव्हाण

नागपूर-मुंबई अशा ७०१ कि.मी.च्या ‘समृद्धी महामार्गा’वर नागपूरजवळील कोरडय़ा पानझडीची जंगले, मध्यवर्ती भागात गवताळ प्रदेश आणि शेवटी पश्चिम घाट येथील वन्यजीवांचे संरक्षण करणे सोपे नाही..

समृद्धीवरील वन्यप्राणी अपघात किती?

समृद्धी महामार्गावर सुरू होण्यापूर्वीच वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अधिसूची एकमध्ये असणारे दोन काळवीट या महामार्गावर धावताना आढळले. उद्घाटनाच्या दिवशीच समृद्धीवर भल्या मोठय़ा अजगराने ठाण मांडले. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये एकाच वेळी १४ रानडुकरांचा वाहनाखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. ऑक्टोबर २०२३ मध्ये या महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट मृत्युमुखी पडला. त्यानंतर तीन नीलगायी वेगाने धावत येऊन हा महामार्ग ओलांडताना आढळल्या. या महामार्गाच्या मध्यभागी आणि बाजूला लावलेल्या ‘क्रॅश बॅरियर्स’वर उडय़ा मारून त्या गेल्या. या वेळी त्यांचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला. तर सोलापूरकडे समृद्धीवर १२ काळविटांचा अपघाती मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूची मालिका अजूनही सुरूच आहे.

हे रोखण्यासाठी उपाययोजना काय?

नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटरच्या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी एकूण नऊ हरित उड्डाणपूल आणि १७ भुयारी मार्ग तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी ६४ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. या महामार्गावर उड्डाणपूल व भुयारी मार्गासह ११ प्रकारच्या एकूण एक हजार ७९७ शमन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघात कमी करण्यासाठी आणि प्राण्यांना महामार्गावर प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठीच तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वन्यजीवांना आकर्षित करणाऱ्या १३ प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीवर बंदी घातली आहे.

मग करार कसला केला?

समृद्धी महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठीचे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचा वापर वन्यप्राणी करतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था यांच्यात सप्टेंबर २०१८ मध्येच पाच वर्षांचा करार करण्यात आला. समृद्धी महामार्ग बांधला जात असतानाही महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्था यांनी वन्यप्राण्यांसाठी शमन उपाययोजना सूचवल्या होत्या. वन्यप्राण्यांनी हे मार्ग टाळल्यास त्याची कारणे शोधून वन्यप्राण्यांना हा महामार्ग ओलांडण्यासाठी आणखी चांगल्या शमन उपाययोजना तयार करणे हादेखील या कराराचा उद्देश आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

समृद्धी महामार्गाची रचना पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने करण्यात आली आहे. हा महामार्ग प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर आणि प्रदूषण कमी करणार आहे. तसेच वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या हालचाली करता येतील या पद्धतीने शमन उपाययोजना केल्या आहेत. निरीक्षणाचे प्रारंभिक परिणाम उत्साहवर्धक आहेत. प्राणी-पुलांचा वापर चिंकारा, बिबटय़ा आणि सािळदर या प्रजातींद्वारे केला जात आहे. त्यामुळे या शमन उपायांना वन्यजीवांनी स्वीकारल्याचे प्राथमिक निरीक्षणात तरी दिसून आले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

समृद्धीवर पक्ष्यांचाही अभ्यास?

समृद्धी महामार्गावरील उड्डाणपूल आणि भूयारी मार्गाचा वापर वन्यप्राणी करत आहेत किंवा नाही, यासोबत या महामार्गावरील पक्ष्यांसंदर्भातला अभ्यासदेखील भारतीय वन्यजीव संस्थेचे पथक करत आहे. आतापर्यंत या चमूने समृद्धीवरील ३१० ठिकाणांवरून डाटा संकलित केला. प्रत्येक ५०० मीटरच्या अंतरावर हा चमू आजूबाजूच्या परिसरात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींची गणना करत आहे. नागपूर-मुंबई महामार्गावरील पक्ष्यांच्या वैविध्यतेचे सर्वसमावेशक मूल्यांकन करणे हा उद्देश यामागे आहे. येत्या काही वर्षांत महामार्गावरील प्रकाशाची तीव्रता आणि आवाजावरही हा चमू लक्ष ठेवणार आहे.

वन्यप्राणी कृत्रिम वाटा स्वीकारतात?

वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून जाणाऱ्या रस्त्यांची सवय झालेली असते. अशा वेळी त्यांचा हा नैसर्गिक मार्ग खंडित होत त्यांच्यासाठी कृत्रिम मार्ग तयार करण्यात आला असेल, तर बिबटय़ासारख्या प्रजाती या मार्गाना लवकर स्वीकारतात. मात्र, त्याच वेळी वाघाला हा नवा मार्ग स्वीकारणे अवघड जाते. तृणभक्ष्यी प्राण्यांबाबतही हाच अनुभव असतो. नवा मार्ग स्वीकारणे/ नाकारणे हे वन्यप्राण्यांच्या प्रजातीवर अवलंबून आहे.

शमन उपायांची यशस्विता कशी ठरवणार?

ऋतूनुसार वन्यप्राण्यांच्या हालचालींतही बदल होतात. त्यामुळे हिवाळय़ात वन्यप्राण्यांना शमन उपाययोजनांचा वापर केला असेल, तर तो उन्हाळय़ात व पावसाळय़ातसुद्धा करेलच असे नाही. एकदा रस्ता ओलांडला म्हणजेच प्रत्येकच वेळी त्याच वाटेचा वापर तो करेल, असेही नाही. त्यामुळे तिन्ही ऋतूंत वन्यप्राणी रस्ता ओलांडतात का, पुढची किती वर्षे तो वापरतात हे सर्व पाहूनच शमन उपायांची यशस्विता ठरते. पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या, नागपूरहून जबलपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शमन उपाययोजनांचा वापर पूर्णपणे वन्यप्राणी करत नाहीत. अजूनही या महामार्गावर वाघ, बिबटय़ासह इतरही वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू होतच आहेत.

rakhi.chavhan@expressindia.com