पुण्यात कोणत्याही वेळेस, कोणत्याही वारी, कोणतीही गाडी चालवताना एकही अपशब्द तोंडातून आला नाही, असा प्रसंग आता नियमाला अपवाद म्हणूनही कधीच येत नाही! गेल्या २०-२५ वर्षांत सांस्कृतिक राजधानीचे झालेले स्खलन समजून घेण्यासाठी खरे तर हे एकच वाक्य पुरेसे आहे. पुण्याबद्दल बोलताना एक गोष्ट मान्य करायला हवी, की सायकलींचे, पेन्शनरांचे आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले सुसंस्कृत व सुरक्षित पुणे आता रस्त्यांवर न मावणाऱ्या वाहनांचे, बकालपणाचे आणि कशानेही, कधीही जीव जाऊ शकेल, असे असंस्कृत आणि असुरक्षित शहर होत आहे. का होत आहे असे?

बाबा सिद्दिकी हत्येचे धागेदोरे पुण्यात…

पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचा आमदार सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली, तेव्हा प्रथम तपासात निष्पन्न झाले होते, की ही हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सदस्य पुण्याचे आहेत. त्यातील कुणा संतोष जाधव याला गुजरातमधून, तर त्याला आश्रय देणारे नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश ऊर्फ महाकाल कांबळे यांना पुणे परिसरातून अटक करण्यात आली. संतोष मूळचा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावचा, तर नवनाथ सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे. २०२१ मध्ये संतोषने पूर्ववैमनस्यातून मंचर परिसरात ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. म्हणजे संतोषची गुन्हेगारी पार्श्वभूमी होतीच. या खुनानंतर तो पसार झाला होता आणि कालांतराने बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला, असे सांगितले जाते. सिद्दिकी यांची हत्याही बिष्णोई टोळीने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यामुळे पोलिसांनी पुण्यातही कसून तपास केला. त्यात प्रवीण लोणकर ताब्यात आला, पण त्याचा भाऊ शुभम, ज्याने समाज माध्यमातून सिद्दिकी यांना हत्येची धमकी दिली होती, तो पळून गेला. शुभम समाज माध्यमातूनच बिष्णोई टोळीशी संबंधित होता. त्याला अकोला पोलिसांनी बिष्णोई टोळीला पिस्तूल पुरविल्याबद्दल काही काळापूर्वी अटकही केली होती. बिष्णोई टोळीशी संबंधित काही जणांनी सिद्दिकी यांच्या हत्येनंतर काहीच दिवसांत पुण्यातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाकडे दहा कोटींची खंडणी मागितल्याचे, तसेच शहरातील वर्दळीच्या शंकरशेठ रस्त्यावर एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकावल्याचे उघडकीस आले. त्याचा तपास अजून सुरू असताना, सिद्दिकी यांच्या हत्येचा कट कर्वेनगर या मध्यमवर्गीय वस्तीत रचला गेल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आणि त्यात चार जणांना अटक केली.

indian team poor performance against new zealand
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला अतिआक्रमकतेचा फटका? गंभीरच्या धाडसी निर्णयाचा पुनर्विचार आवश्यक आहे का?
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
German company’s digital condom confuses social media
Digital condom: डिजिटल कंडोमची सोशल मीडियावर चर्चा, काय आहे हा प्रकार?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
laxmi vilas palace gujarat
Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

हेही वाचा >>> न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला अतिआक्रमकतेचा फटका? गंभीरच्या धाडसी निर्णयाचा पुनर्विचार आवश्यक आहे का?

बिष्णोई टोळीचे पुण्यातील हस्तक?

सिद्दिकी हत्याप्रकरणातील प्रवीण लोणकर हा कर्वेनगर भागात डेअरी चालवत असल्याचे समोर आले, तर याच प्रकरणी अटक करण्यात आलेला शिवानंदन उर्फ शिवा हाही काही महिन्यांपूर्वीपर्यंत पुण्यात भंगार मालाच्या खरेदी-विक्री व्यवसायात असल्याचे उघडकीस आले. याशिवाय मुसेवाला हत्येशी संबंधित काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निष्पन्न झाले. बिष्णोई टोळीशी संबंध आलेल्यांचा एक तर त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा समाज माध्यमातून टोळीशी संपर्क झाल्याचे दिसते.

पुण्यात गुन्हेगारी का वाढतेय?

कोणताही नियम, दरबंध न पाळता बेदरकार जगण्याचा मिळत असलेला पर्याय, हे गुन्हेगारी टोळ्यांकडे आकर्षित होण्याचे एक कारण आहे. कोणाची तरी हत्या करून, धमकावून सहज हाती मिळणारा पैसा आणि वर एखाद्या भागात निर्माण होणारी दहशत याचे तरुण पिढीत जबरदस्त आकर्षण आहे. पुण्याची जी आडवीतिडवी अस्ताव्यस्त वाढ झाली आहे, तो मुळात विस्तार ती नसून सूज आहे. गेल्या २५ वर्षांत पुण्याच्या परिघावर म्हाळुंगे, मावळ, चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी ठिकाणी आलेल्या माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांतील बहुराष्ट्रीय कंपन्या यामुळे जो रोजगार निर्माण झाला, तो महागडे उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या वाट्याला अधिक आला. ज्या गावांतील जमिनींवर कंपन्यांचे हे इमले उभे राहिले, तेथील अनेकजण जमीन गेल्याने शेतीपासून आणि कौशल्य शिक्षण नसल्याने रोजगारापासून वंचित राहिले. भूसंपादनाच्या बदल्यात मिळालेला पैसा अनेकांनी गुंतविण्याऐवजी छानछोकीत उडवला. या कफल्लकतेतून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. रोजगाराबाबत भ्रमनिरास झालेली, नव्या शतकाच्या पहिल्या दशकात तरुणाईत पदार्पण केलेली एक अख्खी तरुण पिढी यातून गुन्हेगारीच्या वाटेला गेली. सध्या असलेल्या प्रस्थापित टोळ्यांचे म्होरके यातूनच पुढे आलेले दिसतात.

हेही वाचा >>> लाहोरवर काजळी भारतामुळे? जगातील सर्वात प्रदूषित शहर होत ओढवली नामुष्की

तीव्र वर्गसंघर्षाचे पडसाद?

एकीकडे सेवा क्षेत्र वाढत असताना त्यातील कौशल्य शिक्षण घेतलेल्यांची आर्थिक भरभराट झालेली दिसते. त्याच वेळी भरभराट झालेल्यांएवढीच गुणवत्ता असूनही केवळ पारंपरिक किंवा उपयोजितऐवजी मूलभूत अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची वाट निवडून नोकरी-रोजगाराला लागलेले अनेक जण कमाईच्या स्तरावर त्यांच्यापेक्षा खूप खाली असलेले दिसतात. पण, या खालीही आणखी एक स्तर असून, त्यांच्या या वरच्या दोन स्तरांत जाण्याच्या आकांक्षा जबरदस्त आहेत. अगदी ढोबळ मानाने पाहायचे, तर पुण्यात श्रीमंत, नवश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब अशी एक वर्गीय उतरंड तयार झालेली दिसते. एक श्रीमंत आणि गरीब वर्ग सोडला, तर उरलेले सर्व कधी काळी मध्यमवर्गीय या एकाच गटात होते. कोणत्याही शहराची संस्कृती सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय टिकवून ठेवतो, असे म्हटले जाते. पुण्यात या मध्यमवर्गाची अनेक छोट्या छोट्या गटांत झालेली विभागणी हा वर्ग एकसंध ठेवण्यातील मोठा अडथळा बनली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी वाड्यात एकत्र राहणारे एकाच आर्थिक स्तरातील होते आणि त्यामुळे दैनंदिन व्यवहारांत मोकळेपणा होता. आता एका इमारतीतही सर्व एकाच आर्थिक स्तरातील असतात, अशी स्थिती नाही. त्यातून प्रत्येकाचे विश्व स्वतंत्र झाल्याने संवादही हरवला आहे. एकाच वर्गात निर्माण झालेली ही आर्थिक तफावत अनेक संघर्षांचे कारण असल्याचे जाणवते. त्यात रस्त्यावरच्या भांडणांपासून क्षुल्लक कारणांवरून खून-मारामाऱ्यांपर्यंतचा एक मोठा कॅनव्हास दिसतो. या सगळ्या संघर्षांचे ओटीटीसारख्या माध्यमांतून होणारे चित्रण काही वेळा अत्यंत भडक, तर काही वेळेला दिशाभूल करणारे असले, तरी स्मार्ट फोन या आता गरज बनलेल्या आणि अक्षरश: घरोघरी किमान एक तरी असलेल्या साधनावर ते दिसत राहते. त्यातूनही गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचे दिसत आहे. समाज माध्यमांवर मैत्री होते, तसे शत्रुत्वही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेले दिसते. त्यातून पुन्हा वर्चस्वाचे संघर्ष उभे राहतात, जे वास्तवात अधिक गडद रूप धारण करतात. आपापल्या भागात कोयते नाचवून निर्माण केलेली जाणारी दहशत, त्यात सामील अल्पवयीन मुले हे त्याचेच पर्यवसान आहे. अमली पदार्थांचा विळखा आणि त्यांचे अगदी सहजपणे होऊ शकणारे व्यवहार हेसुद्धा पुण्यातील गुन्हेगारीचे आणखी एक वास्तव आहे.

siddharth.kelkar@expressindia.com

Story img Loader