संदीप कदम
मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दुसऱ्या ऑलिम्पिक प्रयत्नात कांस्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीने भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचे खाते उघडले. मनूची ऑलिम्पिकमधील ही कामगिरी महत्त्वपूर्ण का, यापूर्वी भारताची ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांची कामगिरी कशी राहिली. याचा घेतलेला हा आढावा.
अंतिम फेरीतील कामगिरी कशी?
मनूने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली. मनूने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत २२१.७ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. मनू जेव्हा सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली, तेव्हा ती दक्षिण कोरियाच्या येजी किमपेक्षा केवळ ०.१ गुणांनी मागे होती. अखेर २४१.३ गुणांसह किमने रौप्यपदक मिळवले. तर, ये जिन ओहने २४३.२ गुणांसह ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. लंडन ऑलिम्पिक २०१२ नंतर भारतीय नेमबाजांचे हे पहिले पदक आहे. रियो ऑलिम्पिक २०१६ व टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना पदक जिंकता आले नव्हते. मनू आपल्या अखेरच्या दोन प्रयत्नांपर्यंत दुसऱ्या स्थानी होती. मात्र, किमने १०.५ गुणांची नोंद केल्याने मनू सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.
कांस्यपदक जिंकल्यानंतर मनूची भावना…
टोक्योच्या कामगिरीनंतर मी निराश झाले होते. मला त्यामधून सावरण्यास बराच वेळ लागला. कांस्यपदक जिंकल्याने आनंद आहे. पुढच्या वेळी या पदकाचा रंग बदलण्याचा माझा प्रयत्न राहील, असे मनू पदक मिळवल्यानंतर म्हणाली. अंतिम फेरीत एकवेळ मनू रौप्यपदक मिळवण्याच्या जवळ होती, मात्र तिला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागेल. ती म्हणाली, ‘‘अखेरचा नेम पूर्ण एकाग्रतेने घेतला नाही. कदाचित आगामी स्पर्धेत मी चांगली कामगिरी करू शकेन.’’
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मुंबई महानगर प्रदेशा’त पालघर, अलिबागही…
अन्य नेमबाजांची आतापर्यंत कामगिरी कशी?
लंडन ऑलिम्पिक २०१२ नंतर भारतीय नेमबाजांचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. लंडनमध्ये विजय कुमारने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले. तर, गगन नारंगने याच ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. मात्र, रियो व टोक्यो मध्ये भारतीय नेमबाजांच्या पदरी निराशा आली होती. बीजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण कामगिरी केली. त्यापूर्वी, २००४ अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन सिंह राठोरने डबल ट्रॅप प्रकारात रौप्य कामगिरी केली. ते भारताचे नेमबाजीतील पहिले वैयक्तिक पदक ठरले होते.
मनू टोक्योतील निराशेतून कशी सावरली?
टोक्योमध्ये आपल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल बिघडल्यामुळे नेमबाजीच्या रेंजवरून रडत बाहेर पडलेल्या मनू भाकरने आपल्या संयमी खेळाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ही निराशा पुसून काढली. टोक्यो ऑलिम्पिकच्या निराशाजनक कामगिरीनंतर मनूने जवळपास एक महिने पिस्तूल उचलली नाही. मात्र, यामधूनच प्रेरणा घेत तिने पॅरिसमध्ये छाप पाडली. मनूचे यश हे गुरू जसपाल राणाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केलेले राणा २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मनूचे प्रशिक्षक झाले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनूने वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेत (२०१८ ते २०२१) दहा पदके मिळवली. टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी मार्च २०२१ मध्ये मतभेदांमुळे राणा व मनू वेगळे झाले. यानंतर गेल्या वर्षी मनूने पुन्हा एकदा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित राणांसोबत येण्याचा निर्णय घेतला. खेळाडू म्हणून जसपाल राणा यांनी १९९६ ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल व ५० मीटर एअर पिस्तूल सहभाग नोंदवला होता. मात्र, त्यांना अंतिम फेरी गाठता आला नाही.
हेही वाचा >>> राष्ट्रपतींकडून नऊ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती; राज्यपालांची निवड कशी होते? काय असते प्रक्रिया?
मनूला पदक जिंकण्याची अजून किती संधी?
मनूने कांस्यपदक मिळवले असले तरीही तिला पदक जिंकण्याची आणखी संधी आहे. मनू सरबजोत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सहभाग नोंदवणार आहे. यासह २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये ती सहभागी होणार असल्याने भारताला अजूनही मनूकडून पदकांची अपेक्षा आहे.
मनूची आंतरराष्ट्रीय कामगिरी कशी राहिली?
वडिलांनी केवळ दीड लाख रुपयांच्या केलेल्या गुंतवणुकीवर मनूने नेमबाजीच्या प्रशिक्षणास सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात मनूने आशियाई कुमार अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. पाठोपाठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवताना तिने अनुभवी हिना सिद्धूवर मात केली आणि ती चर्चेत आली. त्यानंतर मनूने नऊ राष्ट्रीय सुवर्णपदके मिळवली. पुढे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती चमकली. आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद अशा एकामागून एका स्पर्धेत मनूने पदकांना गवसणी घातली. वयाच्या १६व्या वर्षी मनूने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आतापर्यंत हाच तिच्या कारकिर्दीचा सर्वोच्च क्षण राहिला. अशी कामगिरी करणारी ती पहिला भारतीय आणि पहिली महिला खेळाडू ठरली होती. आता ती ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिली भारतीय नेमबाज महिला ठरली आहे.
© The Indian Express (P) Ltd