नवतपा सुरू होण्याआधीपासून यावर्षी तापमान वाढू लागले होते. तर नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानाचा हा आलेख आणखी उंचावला. नवतपा वैज्ञानिक की अवैज्ञानिक हा वाद सोडला तर याच नऊ दिवसांच्या कालावधीत सर्वाधिक तापमानाची नोंद होते. मात्र यंदा देशभरातच तापमानाचे नवनवे उच्चांक नोंदवले जात आहेत.

नवतपा म्हणजे काय?

सूर्याचा रोहिणी नक्षत्रामध्ये होणारा प्रवेश आणि या कालावधीतील प्रथम नऊ दिवस म्हणजे नवतपा. या नवतपाच्या काळात सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो. सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर सूर्याचे किरण थेट पृथ्वीवर येतात. त्यामुळे पहिले नऊ दिवस अत्यंत उष्ण असतात, म्हणून याला नवतपा असे म्हणतात. या काळात पृथ्वी आणि सूर्य खूप जवळ येतात. परिणामी या काळात तीव्र उष्णता जाणवते. त्यामुळे भारतात तापमान वाढ आणि उन्हाळा हा ऋतू उत्तम स्थितीत दिसतो. नवतपामधील वातावरण तसेच पाऊस घेऊन येणारे नक्षत्र यांचा स्थानिक परिणाम प्रत्येक गाव, ठिकाण यांच्या केंद्रापासून ५० किलोमीटरच्या परिघात अनुभवता येतो.

नवतपाच्या विरोधातील वाद कोणते ?

नवतपाच्या काळात सूर्य आग ओकत असला तरीही शेतकऱ्यांसाठी ही संकल्पना उपयुक्त मानली जाते. याआधारे ते त्यांच्या खरीप पिकांची पेरणी ठरवतात. मात्र, मान्सूनच्या आगमनाचा आणि नवतपाचा सुतरामही संबंध नाही, असेही काही हवामान अभ्यासक सांगतात. नवतपाच्या विरोधात काही वाददेखील आहेत. केवळ या नऊ दिवसांच्या तापमानातील तफावतीच्या आधारे तीन-चार महिन्यांचा मोसमी पावसाचा अंदाज बरोबर आहे, असे म्हणता येणार नाही. कारण अनेकदा मोसमी पाऊस उशिरा येतो आणि उर्वरित हंगामात चांगला पाऊस पडतो. त्यामुळे नवतपा आणि पावसाचा कोणताही संबंध नाही, असा दावा काही हवामान अभ्यासक करतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात नेमके काय आहे?

ज्योतिषी आणि नवतपाचा संबंध काय?

ज्योतिष्यांच्या मते मोसमी पावसाच्या गर्भावस्थेतील नवतपामध्ये सूर्याची उष्णता वाढते. रोहिणी नवतपाच्या किंवा रोहिणी नक्षत्राच्या किमान नऊ दिवसात पाऊस पडला नाही तर त्या वर्षीच्या चातुर्मासात चांगला पाऊस पडतो. रोहिणीदरम्यान पाऊस पडला तर त्याला ज्योतिषीशास्त्रांच्या भाषेत राेहिणी गालना म्हणतात. म्हणजेच चातुर्मासात पाऊस कमी होण्याचे लक्षण आहे. नवतपाच्यावेळी पृथ्वी जास्त तापली तर मान्सून लवकर येतो, असे ज्योतिष्यांचे म्हणणे आहे. सूर्य १२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये प्रवास करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कुंडलीत ज्या ग्रहांबरोबर बसतो, त्याचा प्रभाव कमी करून देतो. सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो चंद्राचा थंडावा संपवून उष्णता वाढवतो. नवतपाच्या वेळी सूर्याची उपासना केल्याने व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील सर्व ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते, असे ज्योतिषी सांगतात.

विज्ञान नवतपाबाबत काय म्हणते?

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्णता वाढू लागते, हे सूर्याच्या बदलत्या स्थितीमुळे होते. सूर्य मध्य भारतावर फिरतो आणि जूनमध्ये कर्करोगाच्या उष्ण कटिबंधाजवळ पोहोचतो. या वेळी ते ९० अंशांच्या स्थितीत असते, त्यामुळे किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. अधिक उष्णतेमुळे मान्सून चांगला होईल याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तीव्र उष्णतेमुळे, मैदानी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, त्याला उष्णता कमी म्हणतात. त्यामुळे मान्सून सक्रिय होण्यास मदत होते, पण अतिउष्णतेमुळे मान्सूनही चांगला जाईल असे म्हणता येणार नाही. सूर्याची स्थिती बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: या वीकेण्डला मुंबईत तब्बल ९३० उपनगरीय गाड्या रद्द; रेल्वे प्रवाशांनी नेमकी काय काळजी घ्यावी?

नवतपातील यंदाची स्थिती काय?

देशाची राजधानी दिल्लीतील तापमान बुधवारी ५२ अंशापेक्षा अधिक नोंदवले गेले. तर मंगळवारी राजस्थानमधील चुरू येथे देशातील सर्वाधिक ५०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी राजस्थानमधील फलोदी हे सलग तीन दिवस देशातील सर्वात उष्ण शहर ठरले होते. येथे शनिवारी तापमान ५०, रविवारी ५१ आणि सोमवारी ४९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मंगळवारी येथील तापमान ४९ अंश होते. मंगळवारी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्लीसह १२ राज्यांतील ७८ ठिकाणी ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली. सोमवारी देशातील दहा राज्यांतील ७५ ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते. तर महाराष्ट्रात विदर्भात यवतमाळ येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

rakhi.chavhan@expressindia.com