मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने घडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून याबाबतचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पौगंडावस्थेतील दर सहापैकी एका मुलीवर जोडीदाराकडूनच गेल्या वर्षी अत्याचार झाला आहे. नातेसंबंधात असलेल्या पौगंडावस्थेतील मुलींपैकी सुमारे २४ टक्के म्हणजेच १ कोटी ९० लाख जणी शारीरिक अथवा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. विशेष म्हणजे, या मुली २० वर्षांच्या होईपर्यंत त्यांच्या जोडीदाराकडूनच अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा पौगंडावस्थेतील १५ ते १९ वयोगटातील मुलींबाबतचा हा अहवाल लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

समस्या किती गंभीर?

जोडीदाराकडून अत्याचार ही एक सार्वजनिक आरोग्य आणि मानवी हक्कांशी निगडित गंभीर समस्या आहे. जगभरात १५ ते ४९ वर्षे या वयोगटातील २७ टक्के युवतींना व स्त्रियांना आयुष्यात एकदा तरी जोडीदाराकडून शारीरिक अथवा लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी १३ टक्के स्त्रियांवर असे अत्याचार झाले आहेत. त्यातही पौगंडावस्थेतील मुलींवर जोडीदाराकडून अत्याचार झाल्याने त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत आहेत. त्यामुळे ही समस्या संपविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या समस्येमुळे केवळ मुलीच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि पर्यायाने समाजावर परिणाम होत आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : उसाच्या गळीत हंगामासमोरील आव्हाने कोणती?

आयुष्यावर परिणाम काय?

जोडीदाराकडून होणाऱ्या अत्याचारामुळे तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक भवितव्यावर याचा परिणाम होत आहे. त्यातून त्यांचे भविष्यातील नातेसंबंध बिघडून जात आहेत. अत्याचारामुळे मुलींना दुखापत, नैराश्य, मनोविकार, अनियोजित गर्भधारणा, गुप्तरोग यासह इतर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सद्य:स्थिती काय?

पौगंडावस्थेतील मुलींवर अत्याचाराच्या घटना जगभरात सगळीकडे दिसून येत आहेत. ओशनिया खंडामध्ये हे प्रमाण तब्बल ४७ टक्के आणि मध्य आफ्रिकेत हे प्रमाण ४० टक्के आहे. युरोपमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी १० टक्के असून, मध्य आशियात ११ टक्के आहे. काही देशांमध्ये पौगंडावस्थेतील मुलींपैकी ४९ टक्के मुली अत्याचाराच्या शिकार बनत आहेत तर काही देशांमध्ये हे प्रमाण ६ टक्क्यांपर्यंत कमी आहे. जोडीदाराकडून मुलींवर अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण पापुआ न्यू गिनीमध्ये असून, ते ४९ टक्के आहे. भारतात हे प्रमाण २५ ते ३४ टक्के आहे.

हेही वाचा >>> शेख हसीना भारतात किती काळ राहणार? ब्रिटनने आश्रय देण्यास नकार दिला तर काय होईल?

प्रमाण कुठे कमी?

उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जोडीदाराकडून मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण कमी आहे. अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. माध्यमिक शाळांमध्ये मुली जाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या देशांत मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण कमी असून, या देशांमध्ये लिंग समानतेची पातळीही चांगली आहे. वारसा कायदे मुलींना प्राधान्य देणारे असतील, अशा देशांचाही यात समावेश आहे. अत्याचाराचे प्रमाण सर्वांत कमी जॉर्जियामध्ये असून, ते ६ टक्के आहे.

बालविवाहाची समस्या कितपत?

जगभरात बालविवाहाची समस्या मोठी आहे. जगातील दर पाचपैकी एका मुलीचा बालविवाह होतो. बालविवाहामुळे या मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही. याचबरोबर जोडीदाराच्या अत्याचाराला बळी पडण्याचे त्यांचे प्रमाणही अधिक आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत एकाही देशाने २०३० पर्यंत महिलांविरोधातील अत्याचार संपविण्याच्या दिशेने पावले टाकलेली नाहीत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

उपाय काय?

मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्या शिक्षणावर भर देण्याचा प्रमुख मुद्दा अहवालात मांडण्यात आला आहे. मुलींना माध्यमिक शिक्षण, मालमत्तेत समान अधिकार, लिंग समानता आणि बालविवाह रोखणे हे प्रमुख उपाय अहवालात सुचविण्यात आले आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. पास्कल अलॉटी म्हणाले की, जोडीदारांकडून पौगंडावस्थेतील मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. अशा मुलींची संख्या काही कोटींच्या घरात आहे. आयुष्याच्या जडणघडणीच्या टप्प्यावरील महत्त्वाच्या वर्षांमध्ये अशा प्रकारच्या अत्याचारामुळे या मुलींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहायला हवे. या अत्याचाराला प्रतिबंध आणि मुलींना मदत या गोष्टींवर भर द्यायला हवा.

sanjay.jadhav@expressindia.com