प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनी कर्तव्यपथावर संचलनात प्रथमच सादर झालेले स्वदेशी बनावटीचे अर्ध-बॅलिस्टिक प्रलय सामरिक क्षेपणास्त्र भारताच्या नियोजित क्षेपणास्त्र दलात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. रशियाच्या इस्कंदर, चीनच्या डोंगफेंग-१२ क्षेपणास्त्राशी ते समतुल्य मानले जाते. प्रलयमुळे सशस्त्र दलांना युद्धक्षेत्रातील शत्रूच्या ठिकाणांसह महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याची अतिरिक्त क्षमता प्राप्त होणार आहे.
प्रलय क्षेपणास्त्र…
पारंपरिक हल्ल्यांसाठी भारताच्या क्षेपणास्त्र शस्त्रागारातील प्रलय हे पहिले अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (एसआरबीएम) असणार आहे, जे ५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. विविध टोपणे (वॉरहेड्स) वापरून ते वेगवेगळी लक्ष्ये भेदू शकते. गतवर्षी संसदीय स्थायी समितीच्या अहवालात यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (डीआरडीओ) हैदराबादस्थित संशोधन केंद्राने त्याची रचना केली आहे. प्रलयची ५०० ते एक हजार किलोग्राम स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असून त्यामध्ये घन प्रोपेलंट मोटार आहे. मार्गदर्शन प्रणालीत अत्याधुनिक दिशादर्शन आणि एकात्मिक इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीचा अंतर्भाव आहे. प्रलयच्या विकास चाचण्या झाल्यानंतर संरक्षण अधिग्रहण परिषदेने प्रलय सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खरेदीला मान्यता दिली.
घातक का ठरते?
प्रलयचे अर्ध-बॅलिस्टिक स्वरूप त्याला घातक बनवते. अशा क्षेपणास्त्राचा पल्ला कमी असतो. ते मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक असले तरी उड्डाणातही युक्तीने हालचाल करू शकते. ही क्षमता त्याचा प्रभाव वाढवते, त्याला रोखणे कठीण बनवते. बॅलिस्टिकविरोधी इंटरसेप्टर क्षेपणास्त्राला चकवा देण्यासाठी हवेत युक्ती करण्याची त्याची क्षमता आहे. सामरिक क्षेपणास्त्रे ही तात्काळ लढाऊ क्षेत्रात वापरण्यासाठी रचनाबद्ध केलेली कमी पल्ल्याची शस्त्रे आहेत. बहुतेक सामरिक क्षेपणास्त्र वाहनांवर असतात. त्यामुळे ती त्वरित वापरता येतात. नव्या पिढीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त क्षेपणास्त्रामुळे सैन्य दलांना आवश्यक ते बळ मिळेल, असा डीआरडीओला विश्वास वाटतो.
युद्धभूमीवरील गतिशीलता बदलणार?
लष्कराच्या भात्यातील प्रलय हे सर्वात लांब पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असेल. लष्कराकडे सध्या ब्रम्होस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ज्याचा मारक पल्ला २९० किलोमीटर आहे. प्रलयमुळे भारताकडे आता लांब पल्ल्याची दोन पारंपरिक क्षेपणास्त्रे असतील. ब्रम्होस हा क्रूझ तर, प्रलय हा बॅलिस्टिक पर्याय असेल. क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे स्वत:चे वेगळे काही फायदे असतात. क्रूझ क्षेपणास्त्रात चपळता, गुप्तता आणि लपण्याची क्षमता असते. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रात प्रचंड वेगाचा फायदा मिळतो. प्रगत हवाई संरक्षण प्रणालींनाही प्रतिकार करणे आव्हानात्मक बनते, याकडे डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञही लक्ष वेधतात. प्रलयने युद्धभूमीवरील गतिशीलता बदलणार आहे.
क्षेपणास्त्र दलाच्या दिशेने…
चीन, पाकिस्तानच्या सीमेवरील धोक्यांना तोंड देण्यासाठी भारत एक मजबूत, अधिक विश्वासार्ह क्षेपणास्त्र दल स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात प्रलयचे समायोजन महत्त्वाचे आहे. भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल दिवंगत बिपीन रावत यांनी एकात्मिक युद्ध विभागाची पायाभरणी करताना त्यावर भाष्य केले होते. बहुआयामी आणि कमी किंमत यामुळे प्रलय महत्त्वाची भूमिका बजावू शकते. उत्तर आणि पश्चिम सीमेवरील सैन्याच्या गरजा लक्षात घेऊन त्याचा विकास झाला आहे. भारताकडून ज्या क्षेपणास्त्र दलाची योजना आखली जात आहे, त्यात अखेरीस सर्व पारंपरिक शस्त्र एकाच छताखाली आणली जातील. नियोजित क्षेपणास्त्र दल कार्यान्वित झाल्यानंतर केवळ पारंपरिक क्षेपणास्त्रेच त्याच्या कक्षेत येतील. अण्वस्त्रे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नियंत्रणाखाली असतील, असे मानले जाते.
मारक क्षमतेत सुधारणा…
चीनचे आधीपासून स्वतंत्र क्षेपणास्त्र दल कार्यरत आहे. चीनसह पाकिस्तानकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असून ती सामरिक भूमिकांसाठी आहेत. चीनच्या तुलनेत भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पारंपरिक क्षेपणास्त्रांचे मर्यादित पर्याय आहेत. तेही रशियाबरोबर विकसित केलेल्या ब्रम्होस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राभोवती फिरतात. प्रलयमुुळे सुधारित क्षमता प्राप्त होईल. प्रलय हे देशातील एकमेव बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणून वेगळे दिसेल. ते चीनी डोंगफेंग- १२, रशियन इस्कंदर आणि अमेरिकेच्या ‘प्रिसिजन स्ट्राईक’ क्षेपणास्त्रासारखे आहे.