scorecardresearch

विश्लेषण : परकीय चलन गंगाजळीत घट का झाली?

गौरव मुठे भारताने २०२२ या आर्थिक वर्षांत ४० हजार कोटी डॉलर्स (साधारण ३०.५५ लाख कोटी रुपये) इतक्या वस्तुमाल निर्यातीचे उद्दिष्ट गाठल्याचे वृत्त बुधवारी सर्वत्र प्रसृत झाले. त्यामुळे दोन वर्षांतील देशाच्या नीचांकी परकीय चलन गंगाजळी पातळीचे वास्तव काहीसे दुर्लक्षित झाले. ही परकीय चलन गंगाजळी मार्च महिन्यात ९.६४ अब्ज डॉलरनी आटून, ६२२.२७५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सध्या […]

गौरव मुठे

भारताने २०२२ या आर्थिक वर्षांत ४० हजार कोटी डॉलर्स (साधारण ३०.५५ लाख कोटी रुपये) इतक्या वस्तुमाल निर्यातीचे उद्दिष्ट गाठल्याचे वृत्त बुधवारी सर्वत्र प्रसृत झाले. त्यामुळे दोन वर्षांतील देशाच्या नीचांकी परकीय चलन गंगाजळी पातळीचे वास्तव काहीसे दुर्लक्षित झाले. ही परकीय चलन गंगाजळी मार्च महिन्यात ९.६४ अब्ज डॉलरनी आटून, ६२२.२७५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे खनिज तेलाच्या पुरवठय़ात अडचणी निर्माण होण्याच्या भीतीने तेलाच्या किमतीने चालू महिन्यात १४ वर्षांचा उच्चांक मोडत १४० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून चालू कॅलेंडर वर्षांत सुमारे २,२५,६४९ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे. याचबरोबर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास ७७ पर्यंत घसरला आहे. या सर्वाचा एकूण परिणाम ‘गंगाजळी’वर दिसून आला आहे.

परकीय चलन गंगाजळी म्हणजे काय?

प्रत्येक देशाला विविध मार्गानी कमी-अधिक प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असते. त्याच्या संचयाला परकीय चलन गंगाजळी असे संबोधले जाते. त्यात प्रामुख्याने देशाकडून इतर देशांना होणारी निर्यात, अनिवासी भारतीयांकडून आपल्या देशात पाठवले जाणारे परकीय चलन, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, भारतीय कंपन्यांनी परदेशी वित्तीय बाजारातून घेतलेले कर्ज यांचा समावेश होतो.

ती कशा प्रकारे साठवली, गुंतवली जाते?

रिझव्‍‌र्ह बँकेकडे परकीय गंगाजळी मुख्यत: अमेरिकी डॉलर, युरो, पौंड स्वरूपात साठवली जाते. परंतु हा संचय तसाच न ठेवता अमेरिका आणि इतर देशांच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतविला जातो, जेणेकरून त्यावर व्याज स्वरूपात उत्पन्न मिळते. मात्र उत्पन्न मिळविणे हा मुख्य उद्देश नसून परकीय गंगाजळी देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळय़ा परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. उदा. देशाला वस्तू आणि सेवांची आयात करण्यासाठी परदेशी चलनाची उपलब्धता करून देणे. त्याचबरोबर, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास रिझव्‍‌र्ह बँक त्यात हस्तक्षेप करत डॉलरची विक्री करते, जेणेकरून डॉलरचा पुरवठा वाढल्यास डॉलरचे मूल्य कमी होऊन त्या तुलनेत देशाच्या चलनाचे मूल्य वधारते. देशावर असलेल्या कर्जाची परतफेडदेखील या गंगाजळीतून केली जाते. म्हणूनच तिचे देशाच्या विकासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

परकीय गंगाजळीची आवश्यकता का असते?

देशात परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी आयातीसाठी परकीय गंगाजळीची आवश्यक असते. भारत इतर देशांकडून मोठय़ा प्रमाणात विविध वस्तू आणि सेवांची आयात करतो. देशाच्या आयात बिलात मुख्यत: खनिज तेल आणि सोन्याचा अधिक समावेश आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींच्या आयातीवर देशाचा सर्वाधिक खर्च होतो. इतर देशांकडून जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवेची आयात करतो तेव्हा त्यांना वस्तू आणि सेवांचे मूल्य डॉलरमध्ये द्यावे लागते. त्यामुळे जर आपल्याकडे पुरेशा प्रमाणात परकी चलन उपलब्ध असेल, तर कुठलीही वस्तू आणि सेवांची आयात करताना समस्या उद्भवत नाही. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊन महागाईदेखील नियंत्रणात राखता येते. देशाकडे पुरेशा प्रमाणात गंगाजळी उपलब्ध असेल तर परदेशी गुंतवणूकदार आणि निर्यातदार भारताशी आर्थिक व्यवहार करण्यात आश्वस्त होतात.

पण मग यंदा ती घटण्याचे कारण काय?

गेल्या वर्षी भांडवली बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तसेच गेल्या वर्षी करोनामुळे बहुतांश देशांत निर्बंध कायम असल्याने जागतिक पातळीवर खनिज तेलाची मागणी कमी झाली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे घसरलेले दर आणि त्यामुळे झालेली परकीय चलनाची बचत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजाराकडे वळविलेला मोर्चा यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर (२०२१) महिन्यात परकी चलन गंगाजळीने ६४२.४५३ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र सध्याची परिस्थिती अगदी उलट झाली आहे. भांडवली बाजारात नवीन वर्षांत आलेली घसरण, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे परकीय गंगाजळीमध्ये मार्च महिन्यात सुमारे १० अब्ज डॉलरची घट झाली आहे.

गंगाजळी प्रमाणाबाहेर आटल्याने पेच केव्हा ओढवला होता?

आर्थिक उदारीकरणापूर्वी म्हणजेच १९९० मध्ये देशाकडे फक्त ५.८ अब्ज डॉलर्स एवढीच परकीय गंगाजळी शिल्लक होती आणि यातून फक्त चार आठवडे आयात करता येणे शक्य होते. शिवाय त्या वेळी देशावर कर्जाचा डोंगर उभा असल्याने कर्ज परतफेडीसाठी परकीय चलन उपलब्ध नव्हते. म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) ६७ टन सोने गहाण ठेवून परकीय चलन उपलब्ध करण्यात आले होते.

सर्वाधिक परकीय चलनसाठा कोणत्या देशाकडे आहे?

परकीय गंगाजळीच्या बाबतीत चीन, जपान आणि स्वित्र्झलडनंतर भारताचा क्रमांक लागतो. चीनकडे सर्वाधिक परकीय चलनसाठा असून तो देश ३,३९८ अब्ज डॉलरसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ जपानकडे १४०५ अब्ज डॉलरचा चलनसाठा आहे. तर ११०९ अब्ज डॉलर परकी चलनसाठय़ासह स्वित्र्झलड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained india forex reserves fall crude oil russia ukraine war zws 70 print exp 0322

ताज्या बातम्या