अमेरिकेच्या बॉम्ब वर्षावाला इराणकडून प्रत्युत्तरादाखल होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांचा सामना करताना अमेरिकाच नव्हे, तर त्यांच्या अरब मित्रराष्ट्रांच्या नाकीनऊ आले आहेत. या भागातील प्रमुख शहरांमध्ये आकाशात कमी उंचीवरून उडणाऱ्या इराणी ‘शाहेद’ ड्रोनचे विशिष्ट आवाज कानी पडतात. तुलनेत स्वस्त अन् उत्पादनास सुलभ असणारे हे ड्रोन निष्प्रभ करण्यात संबंधितांची महागडी शस्त्रसामग्री खर्ची पडत आहे. काही ड्रोन हल्ले चढविण्यात यशस्वी ठरतात. महाशक्तीला जेरीस आणणाऱ्या इराणच्या शाहेद ड्रोनची अधिक चर्चा होत आहे.

हल्ले, प्रतिहल्ले

सुरुवातीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणचे नौदल तळ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साठवणूक ठिकाणांना लक्ष्य करीत त्याची प्रत्युत्तर देण्याची क्षमता मर्यादित करण्यावर लक्ष केंद्रित केले. हवाई हल्ल्यांनी इराणच्या लष्करी शक्तीचा नि:पात करण्याचे त्यांनी धोरण ठेवले. इराणकडून सभोवतालच्या मित्रराष्ट्रांतील अमेरिकेचे लष्करी तळ, विमानतळ, दूतावास कार्यालय आणि पायाभूत सुविधांवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले जात आहे. संबंधितांचे शक्य तितके आर्थिक आणि राजकीय नुकसान करण्याचा इराणचा मनसुबा असल्याचे लक्षात येते.

ड्रोन हल्ल्यांचा धोका

अमेरिकेसारख्या बलाढ्य लष्करी शक्तीचा सामोरे जाताना इराणने अवलंबलेले मार्ग अनेकांना अचंबित करत आहेत. इराणी मानवरहित विमाने (यूएव्ही) अर्थात ड्रोनचे घोंघावणारे सावट अमेरिकेचे जॉइंट चिफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन हे नाकारू शकले नाही. ‘यूएव्ही’चा धोका कायम आहे. आमच्या प्रणाली त्यांचा सामना करण्यास प्रभावी ठरल्या असून इराणी ड्रोन जमीनदोस्त केले जात असल्याचा दावा त्यांनी नियमित पत्रकार परिषदेत केला. यातून इराणला अपेक्षित घडत असल्याचे लक्षात येते. इराण आणि अमेरिका यांच्या लष्करी शक्तीची तुलना होऊ शकत नाही. इराण स्वस्तातील ड्रोनच्या वापरातून अमेरिका, मित्रराष्ट्रांची काहीअंशी दमछाक करण्यात यशस्वी ठरल्याचा निष्कर्ष निघतो.

शाहेद ड्रोन नेमका काय?

चार दशकांपूर्वी ड्रोन निर्मितीचा विचार करणाऱ्या इराणच्या भात्यात विविध क्षमतेचे ड्रोन असल्याचे मानले जाते. सध्या तो शेकडो ‘शाहेद १३६’ ड्रोनने अमेरिकेचे लष्करी तळ, आखाती देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. या ड्रोनचे वैशिष्ट्ये म्हणजे तो दूर संवेदकामार्फत (रिमोट कंट्रोल) नियंत्रित होत नाही. उपग्रह दिशादर्शन प्रणालीच्या माध्यमातून प्रक्षेपणापूर्वी लक्ष्य निश्चिती केली जाते. २५०० किलोमीटरपर्यंत तो उड्डाण करू शकतो. लक्ष्याकडे मार्गक्रमण करताना फारसा वेग नसला तरी पातळ आकार आणि कमी उंचीवर उडण्याची क्षमता यामुळे शत्रूच्या रडार, हवाई संरक्षण प्रणालींना त्याचा माग काढणे अवघड ठरते. क्षेपणास्त्राच्या तुलनेत शाहेद वा तत्सम ड्रोन किफायतशीर ठरतात. एकतर ते स्वस्तात तयार होतात. आणि मालमोटारीच्या मागील बाजूने प्रक्षेपित करता येतात. क्षेपणास्त्र डागण्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता भासते. ड्रोन बेमालूमपणे एकत्र केले जाऊ शकतात. कुठूनही सोडले जाऊ शकतात. रशिया-युक्रेन युद्धात शाहेद ड्रोनची परिणामकारकता सिद्ध झाली होती. कारण, काही वर्षांपूर्वी रशियाने इराणकडून सहा हजार शाहेद ड्रोन आणि त्यांचे तंत्रज्ञान खरेदी केले होते. रशियन सैन्याने युक्रेनमधील शहरे व पायाभूत सुविधांवर तब्बल ५० हजार ड्रोन सोडल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.

आव्हाने काय?

युद्धात निष्प्रभ केलेल्या इराणी ड्रोनची आकडेवारी अमेरिकेने जाहीर केलेली नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने इराणने आखाती देशात शेकडो ड्रोन सोडले असून त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त ड्रोन रोखल्याचे म्हटले आहे. जीपीएस अडथळे आणणारी उपकरणे व लेसर शस्त्र प्रणालीद्वारे ड्रोन पाडता येतात. परंतु, सध्या त्यांच्यावर जमिनीवरून अथवा लढाऊ विमानातून महागड्या क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. लष्करी तज्ज्ञांच्या मते इराणी ड्रोन रोखण्यासाठी अमेरिका आणि मित्रपक्षांवर मोठा आर्थिक भार पडतो. एका शाहेदची किंमत ३० हजार ते ५० हजार डॉलर्सच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. तर एका इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची किंमत त्यापेक्षा दहापट किंवा अधिक असू शकते. म्हणजे इराणने ड्रोन तयार करण्यासाठी खर्च केलेल्या एका डॉलरसाठी संयुक्त अरब अमिरातीला ते रोखण्यासाठी २० ते २८ डॉलर खर्च येतो, असा दाखला दिला जातो.

युद्ध लांबल्यास काय?

ड्रोनच्या वापरातून इराण अमेरिकेसह त्यांच्या मित्रराष्ट्रांना त्यांचे इंटरसेप्टरचे साठे वापरण्यास भाग पाडत आहे. युक्रेनने अशा हल्ल्यांपासून संरक्षणासाठी बहुआयामी प्रणाली तयार केली. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांना जमीनदोस्त करण्यासाठी महागड्या, उत्पादनास कठीण असलेल्या पद्धतींचा वापर न करण्याचा धडा घेण्यात अमेरिकेला अपयश आल्याचे काही तज्ज्ञ मानतात. युद्धाला तोंड फुटण्याआधी इराणने शाहेद ड्रोनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात यातील किती साठा शाबूत राहिला, हे अस्पष्ट आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरकडून भूमिगत तळातील ड्रोन साठ्याच्या चित्रफिती प्रसारित केल्या जातात. युद्ध लांबल्यास ड्रोन हल्ले रोखण्यासाठी अधिक शाश्वत मार्ग, पर्याय शोधावे लागतील असे अभ्यासक मानतात.