आसिफ बागवान asif.bagwan@expressindia.com
ग्राहकांच्या विश्वासार्हतेला धक्का देऊन भरमसाट नफा वा उत्पन्न देणारी व्यवसाय कल्पना कधी ना कधी उताराला लागू शकते. अशा संकल्पनेला पर्यायी योजना अर्थात ‘बॅकअप प्लान’ असेल तर ठीक. नाहीतर काय होते, याचे ढळढळीत उदाहरण ‘मेटा’. पूर्वाश्रमीच्या फेसबुकचे नामांतर केल्यानंतर चार महिन्यांतच या कंपनीची झालेली आर्थिक पीछेहाट हा नावाचा ‘पायगुण’ नव्हे, तर मूळच्या कंपनीचा ग्राहकांना अंधारात ठेवण्याचा दुर्गुण आहे. गेल्या बुधवारी या कंपनीच्या घटत्या नफ्याचे आणि वापरकर्त्यांचे आकडे समोर येताच गुरुवारी शेअर बाजारात ‘मेटा’चे समभाग २६ टक्क्यांहून अधिक घसरले. कंपनीचे बाजारमूल्य केवळ एका दिवसात तब्बल २३० अब्ज डॉलरने खाली आले. पण त्याहीपेक्षा चिंताजनक म्हणजे, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटच्या वापरकर्त्यांत झालेली घट. ही घट का झाली आणि त्यांचे परिणाम काय होणार, याचा हा आढावा.




‘पहिलीच घसरण’ दिसली कशी?
‘मेटा’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गेल्या बुधवारी २०२१च्या अखेरच्या तिमाहीतील नफा आणि वापरकर्त्यांचे आकडे उघड केले. त्यानुसार या कंपनीच्या मालकीच्या सर्व अॅपच्या (फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेसेंजर इत्यादी) वापरकर्त्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत एक कोटींनी घटली आहे. गूगलपाठोपाठ जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांत घट होण्याची गेल्या १८ वर्षांतील ही पहिलीच वेळ. हे आकडे समोर येताच गुरुवारी अमेरिकी शेअर बाजारात कंपनीचे शेअर धाडकन आपटले.
वापरकर्त्यांत घट कोठे?
फेसबुक या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाच्या माध्यमातून अक्राळविक्राळपणे जगभर पसरलेल्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यासारखे आधीपासून प्रचंड मोठय़ा वापरकर्ता वर्गाशी जोडल्या गेलेल्या अॅपचा ताबा घेतला. त्यामुळे या कंपनीच्या दैनिक वापरकर्त्यांची सरासरी संख्याही (डीएयू) झपाटय़ाने वाढत होती. मात्र, २०२१च्या अखेरच्या तिमाहीत ही संख्या अचानक कमी झाली. त्यातही या कंपनीच्या फेसबुक या मुख्य अॅपच्या वापरकर्त्यांच्या संख्येत सर्वाधिक घट झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत त्यांना सर्वात मोठी झळ बसली आहे.
याचा परिणाम काय?
वापरकर्ते घटल्याचा थेट परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर होतो. वापरकर्त्यांची माहिती गोळा करून ती जाहिरातींसाठी विविध कंपन्यांना विकायची आणि त्यातून पैसा कमवायचा, हे फेसबुकचे व्यवसायसूत्र राहिले आहे. वापरकर्त्यांच्या माहितीचे पृथक्करण करून त्याआधारे ‘लक्ष्यित’ (टार्गेटेड) जाहिराती प्रसारित करण्याच्या उद्योगातूनच कंपनीची भरभराट झाली. आता वापरकर्तेच घटू लागले तर अशा जाहिरातींनाही ओहोटी लागणार, हे स्वाभाविक.
पण हेच एक कारण नाही..
वापरकर्ते घटल्यामुळे फेसबुकची चिंता वाढली असली तरी, त्यांच्यासाठी अधिक चिंताजनक आहे ती वापरकर्त्यांची बदललेली सवय. वापरकर्त्यांना अधिकाधिक अॅपसुविधा देण्याच्या नावाखाली त्यांच्या विविध परवानग्या मिळवायच्या आणि त्यातून त्यांची वैयक्तिक माहिती (विदा) जमा करायची, या तत्त्वाने फेसबुक काम करते. परंतु, गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापराबाबत सामान्य नागरिक सजग होऊ लागला आहे. आपल्या माहितीचा वापर वा गैरवापर होऊ नये, यासाठी तो ती गोपनीय ठेवण्याचे प्रयत्न करत आहे. हीच गोष्ट फेसबुकला अधिक बोचत आहे. ‘अॅपल’वर या कंपनीची नाराजी यातूनच जन्मली आहे.
‘अॅपल’चा काय संबंध?
अॅपलने आपल्या वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित राहावी, यासाठी ‘आयओएस’वर गेल्या वर्षी ‘अॅप ट्रॅकिंग ट्रान्स्परन्सी’ या नावाने एक अपडेट जारी केले. वापरकर्त्यांच्या ऑनलाइन कृती, हालचालींचा माग ठेवण्यापासून कंपन्यांना मज्जाव करणारे हे अपडेट आहे. त्यामुळे आयफोन वापरकर्त्यांना फेसबुकने त्यांच्यावर किती ‘पाळत’ ठेवावी हे ठरवण्याचा अधिकार मिळाला. साहजिकच बहुतांश आयफोन वापरकर्त्यांनी अशी ‘पाळत नको’ हीच भूमिका घेतली. त्यामुळे आयफोन वापरकर्त्यांची फेसबुकला मिळणारी माहितीच आटली. याचा परिणाम त्यांच्या जाहिरातींतून मिळणाऱ्या उत्पन्नावर झाला. ‘अॅपल’च्या या सुविधेमुळे आगामी वर्षांत फेसबुकला १० अब्ज डॉलरचा आणखी फटका बसू शकतो, असा या कंपनीचाच अंदाज आहे.
मग इतरांनाही फटकाच बसला असेल ना?
अॅपलच्या अटीयुक्त सुविधेने फेसबुकचे नुकसान केले असले तरी, ‘गूगल’ या त्यांच्या मोठय़ा प्रतिस्पर्ध्याने मात्र अॅपलच्या ‘आयओएस’वर मागील दाराने प्रवेश करून उत्पन्नाचे आपले मार्ग विस्तारले आहेत. गूगलचे सर्च इंजिन अॅपलच्या सफारी ब्राऊजरवर आल्यामुळे गूगलला आयफोन वापरकर्त्यांच्या ऑनलाइन हालचालींची माहिती आपसूकच मिळत आहे. त्यामुळे या कंपनीकडे येणारा जाहिरातींचा ओघही वाढला आहे.
‘मेटाव्हर्स’ संकल्पनेचे काय झाले?
फेसबुकच्या ‘मेटा’कुटीला येण्यामागे झुकेरबर्गची भविष्यातील इंटरनेट व्यवस्थेबाबतची महत्त्वाकांक्षाही कारणीभूत मानली जात आहे. येत्या काळात ‘व्हर्च्युअल’ अर्थात आभासी जगातील व्यवहार प्रचंड प्रमाणात वाढतील, या विश्वासापोटी झुकेरबर्ग यांनी गेल्या वर्षी ‘मेटाव्हर्स’ या आपल्या संकल्पनेवर दहा अब्ज डॉलर खर्च केले. मात्र, ही संकल्पना अद्याप मूळ धरतानाही दिसत नाही. वर्तमानात बसणारी झळ आणि भविष्याला मिळत असलेले अवाजवी बळ या कात्रीत सध्या फेसबुक आहे.