सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. यंदाची गुजरात निवडणूक काहीशी वेगळी असणार आहे. याचं कारण म्हणजे ही निवडणूक केवळ काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी होणार नसून त्यात आम आदमी पक्षानेही ताकद लावली आहे. त्यामुळेच या तिरंगी लढतीत भाजपा आणि आप एकमेकांच्या आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. अशातच निवडणूक गुजरातची असली तरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेलांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अनेक भाजपा नेत्यांनी मेधा पाटकरांवर निशाणा साधला आहे. यामागील कारणं काय? याचं हे विश्लेषण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रात सलग दोन पंचवार्षिक सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपल्या ‘होम ग्राऊंड’वरील निवडणूक म्हणजेच गुजरात विधानसभा निवडणूक महत्त्वाची असणार आहे. अशातच आपने गुजरातमध्ये दंड थोपटल्याने भाजपा विरुद्ध आप सामना पहायला मिळत आहे. अशातच भाजपाने आपला घेरण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ४ सप्टेंबरला मेधा पाटकरांवर गुजरातविरोधी असल्याचा आरोप केला. तसेच आपने पाटकरांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उभं केलं होतं आणि आता पुन्हा ते त्यांना मागल्या दाराने गुजरातमध्ये आणू पाहत असल्याचाही आरोप केला.

दरम्यान, याआधी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी २८ ऑगस्टला कच्छमध्ये झालेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मेधा पाटकर यांना थेट ‘अर्बन नक्षल’ म्हटलं. ही रॅली भुज मांडवी नर्मदा कॅनलचं कच्छमध्ये उद्घाटन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ३० ऑगस्टला गुजरात भाजपाने अर्बन नक्षल असल्याचं दाखवत एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

नरेंद्र मोदींनी आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतर नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण प्रकल्प ताकदीने पुढे नेला. मात्र भाजपासाठी मेधा पाटकर मोदींच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारी व्यक्ती नाही, तर २००२ च्या गुजरात दंगलीविरोधात आंदोलन करणारी व्यक्तीही आहे.

अरविंद केजरीवालांचं प्रत्युत्तर

अरविंद केजरीवाल यांना एका पत्रकार परिषदेत भाजपाने केलेल्या आरोपाबाबत “मेधा पाटकर यांना मागच्या दाराने मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये आणणार का?” असा विचारण्यात आला. यावर केजरीवाल म्हणाले, “मी ऐकलं आहे की, भाजपा नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधींना उमेदवार बनवणार आहेत. यावर भाजपाला प्रश्न विचारा. ते काय म्हणतात पाहा. मला माहिती आहे की तुम्हाला भीती वाटेल, पण पुढच्या पत्रकार परिषदेत भाजपाला विचारा की केजरीवालांनी मोदींनंतर भाजपा पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधींना उमेदवार बनवणार आहेत. त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे?”

मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर

मेधा पाटकर म्हणाल्या, “गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी माझ्यावर केलेला अर्बन नक्षल असल्याचा आरोप हसावं की रडावं असा आहे. अर्बन नक्षल ही संकल्पनाच अत्यंत खोटी आणि विकृत आहे. नक्षलवादी कधीच शहरी नव्हते आणि शहरातील लोक नक्षलवादी होत नाहीत. जर झाले तर ते शस्त्र हातात घेतात. मात्र, आम्ही शहर सोडून ग्रामीण भागात काम करण्यासाठी आलेले कार्यकर्ते आहोत. आम्ही शहरांमधील गरीब वस्त्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कधीही शस्त्र हातात घेतलेलं नाही. आमचा विश्वास गांधींजींना दिलेल्या सत्य आणि अहिंसा या मुल्यांवर, मार्गावर आहे.”

“आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवतो, कारण ते देशाचं संविधान आहे. याशिवाय पेरियार, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांनी केलेलं मार्गदर्शन आजही मानतो आणि पाळतो. आम्ही नक्षलवादी नाही आणि नक्षलवादीही आम्हाला त्यांचं मानत नाहीत. ज्यांनी कधीच नर्मदा खोऱ्याचं तोंड पाहिलेलं नाही, ज्यांनी आमच्याशी कधीच चर्चा केलेली नाही असे भुपेंद्र पटेलांपासून अमित शाहांपर्यंत नेते असे आरोप करत आहेत,” असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं.

मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, “आम्ही सरदार सरोवर प्रकल्प आणि पर्यावरणीय परिणाम, विस्थापन याबाबत जे काही म्हटलं ते आज खरं ठरलं आहे. आम्ही जे पुनर्वसनात जे काही मिळवलं आहे ते सर्व लढूनच मिळवलं आहे. तेही अहिंसक मार्गाने मिळवलं आहे. अशाही परिस्थितीत यांनी एखाद्या लेखकाला पकडून असे आरोप चालूच ठेवले तर आमचं त्यांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी भर चौकात यावं, कुठेही मंच उभा करावा आणि जनतेसमोर खुला वादविवाद करावा.

हेही वाचा : विश्लेषण : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पेसा कायदा आणि आदिवासींची भूमिका काय?

“गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मतदान होऊ नये म्हणून माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे. मी आपची मुख्यमंत्री पदाची उमेदवार आहे असा अपप्रचार सुरू आहे. मात्र, यावर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे,” असंही मेधा पाटकरांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on allegations on social activist medha patkar amid gujrat election pbs
First published on: 22-09-2022 at 20:11 IST