काँग्रेसने देशव्यापी भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा ७ सप्टेंबरला सुरू होईल आणि दक्षिणेत कन्याकुमारीपासून उत्तरेकडे काश्मीरपर्यंत पाच महिन्यात एकूण ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत एकूण १२ राज्यांचा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. राहुल गांधींच्या दोन दशकांच्या राजकीय कारकीर्दीतील ही सर्वात मोठी पदयात्रा असणार आहे. ही भारत जोडो यात्रा एकूण ५० दिवस चालणार आहे. याचविषयी काही महत्त्वाचे तपशील…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने देशव्यापी भारत जोडो यात्रेची घोषणा करताना प्रत्येकाला यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या यात्रेतून दहशतीच्या राजकारणाला आणि सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, बेरोजगारी, विषमता वाढवणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्याय मिळेल, असंही सांगण्यात आलं आहे.

भारत तोडो यात्रेचा लोगो, वेबसाईटचं लाँचिंग

काँग्रेसने मंगळवारी (२३ ऑगस्ट) भारत जोडो यात्रेचा लोगो, टॅगलाईन, पॅम्पलेट आणि वेबसाईट लाँच केली. यानुसार या पदयात्रेची टॅगलाईन ‘मिले कदम, जुडे वतन’ अशी आहे. तसेच वेबसाईट www.bharatjodoyatra.in अशी आहे. यावेळी काँग्रेसने या यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहनही केलं आहे.

राहुल गांधींनी भारत जोडो पत्रयात्रेबाबत ट्वीट करताना म्हटलं, “तुमचं एक पाऊल आणि एक माझं पाऊल एकत्र आले तर आपला देश जोडला जाईल.” याशिवाय राहुल गांधींनी आपला प्रोफाईल पिक्चर बदलत भारत जोडो यात्रेचा लोगो लावला आहे.

भारत जोडो यात्रेचं वेळापत्रक काय?

या यात्रेची सुरुवात १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली त्या ठिकाणाहून म्हणजेच चेन्नईजवळील श्रीपेरुमबुदूर स्मारकापासून होईल. तसेच या पदयात्रेची सांगता जम्मू आणि काश्मीरमध्ये होईल. ही यात्रा चार दिवस, १० सप्टेंबरपर्यंत तामिळनाडूत सुरू राहील आणि नंतर शेजारच्या केरळ राज्यात जाईल.

पुढे काँग्रेसची ही यात्रा कर्नाटकमध्ये २१ दिवसात एकूण ५११ किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी याबाबत माहिती दिली. यात काही भाग हा वनक्षेत्र देखील असणार आहे. काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांसोबत बोलून याच निश्चिती केली आहे. कर्नाटकमधील २१ दिवसांमध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. काँग्रेसने आपल्या सर्व नेते व कार्यकर्त्यांना या यात्रेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह यांनी या यात्रेचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असे प्रमुख तीन उद्देश असल्याचं सांगितलं. देशात अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जात, धर्म, वेश, अन्न आणि भाषेवरून ध्रुवीकरण होत असल्याचाही मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. जयराम रमेश यांनी राज्यांना कमकुवत केलं जात असल्याचा आणि केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत असल्यानं राजकीय आव्हान निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा : विश्लेषण : ट्विटरनं भारत सरकारच्या एजंटला युजर्सची सर्व माहिती पुरवली? नेमकं घडतंय काय? आपली माहिती खरंच सुरक्षित आहे का?

राहुल गांधींकडून सामाजिक संघटनांनाही सहभागाचं आवाहन

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेपूर्वी देशातील विविध सामाजिक संघटनांची एक बैठक घेतली. यात देशभरातून १५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात गणेश देवी, उल्का महाजन, योगेंद्र यादव, अरुणा रॉय, सय्यद हमीद, शरद बेहर, पी. व्ही. राजगोपाल आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on congress bharat jodo yatra from kanyakumari to kashmir pbs
First published on: 25-08-2022 at 20:21 IST