ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आला, तो दक्षिण आफ्रिकेतून. जगात तोवर या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरूही झाला होता. गेल्या महिनाभरात जगात, भारतात आणि महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांच्या संख्येचा आलेख झपाट्याने वर जात राहिला. भारताने अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांना  विलगीकरण सक्तीचे केले. डिसेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ६५३ एवढी झाली होती. गेल्या दोन दिवसांत त्यात अधिकच भर पडलेली दिसून येते. करोनाचा संसर्गवेग इतका वाढला की ३१ डिसेंबर या एका दिवसात देशात २२ हजार ७७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळेच परदेशातून आलेले नाहीत!

एका आठवड्यात रुग्णसंख्या चौपटीने वाढल्याने सरकारी पातळीवर सामूहिकरित्या एकत्र येण्यावर निर्बंध लादण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आणि त्या खालोखाल पुण्यात आढळून आले. गेल्या काही दिवसात निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे सामूहिक उपक्रमांना होणारी गर्दीही वाढली. त्यामुळे समूहसंसर्ग होण्यास पोषकच वातावरण तयार झाले. पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आला, तरी त्यानंतरच्या काळात त्याची लागण होणाऱ्यांपैकी अनेकजण ना परदेशातून आले, ना ते परदेशी प्रवाशांच्या सहवासात आले. खरी चिंता नेमकी हीच आहे. 

थक्क करणारा संसर्ग वेग

करोनाच्या अन्य उत्परिवर्तित विषाणूंच्या तुलनेत ओमायक्रॉनचा संसर्गवेग पाच पट अधिक आहे. मात्र त्याची मारक क्षमता कमी आहे. गेल्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांच्या संख्येत ११ टक्के वाढ झाली. युरोपमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे ३०४ रुग्णांना करोना झाला, तर अमेरिकेत हेच प्रमाण १४४.४ एवढे. अमेरिकेतील रुग्णवाढ तब्बल ३९ टक्क्यांची. असे असले, तरी जागतिक स्तरावर मृत्यूसंख्येत मात्र चार टक्के घटच झाल्याचे दिसते. 

करोना झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण होण्यास काही काळ लागतो. जानेवारीच्या अखेरपर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या काही लाखांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. 

लक्षणे सौम्य तरी…

या आजाराची लक्षणे सौम्य असली, तरी त्याचा संसर्गवेग अधिक असल्याने सहव्याधीग्रस्तांमध्ये तो विपरीत परिणाम घडवू शकेल, असे तज्ज्ञांना वाटते. करोना प्रतिबंधक लशी घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा होत असल्याने, हा समूहसंसर्ग टाळण्यासाठी पुन्हा एकदा करोना काळातील खबरदारीचे उपाय अधिक काटेकोरपणे अंमलात आणण्याशिवाय पर्याय नाही. ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाल्यानंतर सामान्यत: ताप, खोकला, घशाला कोरड, चव आणि वासाची जाणीव नसणे (मात्र ही लक्षणे आधीच्या लाटांच्या तुलनेत खूपच कमी आढळतात), दमणूक ही करोनाचीच लक्षणे दिसतात.

करोनाची रुग्णसंख्या जगभरात झपाट्याने वाढते आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगात २ लाख २५ हजार ५८१ रुग्णांची नोंद झाली. भारतात ३१ डिसेंबरला १६ हजार ७६४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात चोवीस तासांत ३५ टक्क्यांनी वाढ होऊन ती २२ हजार ७७५  झाली. रुग्णसंख्येत (एक जानेवारीची आकडेवारी) महाराष्ट्राचा क्रमांक पहिला (९१७०) तर  त्याखालोखाल नवी दिल्लीचा क्रमांक (२७१६) आहे. हाच क्रम ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येबाबतही आहे. महाराष्ट्रात ४५४ तर दिल्लीत ३५१ ओमायक्रॉनचे  रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू, गुजरात आणि केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो.

ओमायक्रॉन अधिक डेल्टा

एक महिन्याच्या कालावधीत ओमायक्रॉनचा फैलाव जगातील शंभर देशात झाला आहे. विशेषतः अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्टा उपप्रकाराचा कहर जारी असतानाच ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे घबराट उडणे साहजिक आहे. भारतात समूह संसर्ग आणि लसीकरणामुळे प्रतिपिंडे निर्माण होऊन डेल्टाचा प्रभाव बराचसा कमी झाला आहे.

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४,५१२ करोना रुग्ण आढळल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, उद्यापासून शाळा बंद करणार

आता महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये ओमायक्रॉन हा सर्वांत प्रभावशाली उपप्रकार बनू लागला असला, तरी डेल्टाचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नाही. साथरोग तज्ज्ञ आणि सरकारी यंत्रणांसाठी ही खरी डोकेदुखी ठरते. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on corona new variant omicron and community infection in maharashtra pbs 91 print exp 0122
First published on: 02-01-2022 at 22:27 IST