भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या उर्वरित वादग्रस्त टापूंमध्येही गस्तबिंदूंवरून सर्वमान्य तोडगा निघाल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी २१ ऑक्टोबर रोजी जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही या वृत्तास दुजोरा दिला. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्व लडाख सीमेवरील काही भागांतून चीनने माघार घेतली, पण देप्सांग पठार आणि देम्चोक येथे चीनने बफर क्षेत्रात घुसखोरी केली होती. ताज्या माहितीनुसार, या दोन ठिकाणी भारतीय सैनिकांना मे २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे.
पूर्व लडाख सीमेवर ताजी स्थिती काय?
भारताच्या परराष्ट्र सचिवांनी गस्तकराराविषयी माहिती दिली असली, तरी देप्सांग आणि देम्चोक येथून चिनी तुकड्या माघारी फिरून तेथे भारतीय गस्तपथके जाण्यास दोन ते तीन आठवडे लागू शकतात. लडाखच्या पूर्वेकडे चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उत्तर बाजूला देप्सांग पठार आहे. तर अगदी दक्षिणेकडे म्हणजे हिमाचल प्रदेशच्या नजीक देम्चोक आहे. मे-जून २०२०च्या आसपास चीनने देप्सांग पठार, गोग्रा हॉट स्प्रिंग्ज, गलवान खोरे, पँगाँग सरोवराचे दक्षिण आणि उत्तर काठ, देम्चोक येथे घुसखोरी केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान, विशेषतः गलवान चकमकीनंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वाटाघाटी सुरू झाल्या. त्यांतील काहींना यश आल्यामुळे गोग्रा, गलवान आणि पँगाँग सरोवर येथून चीनने काही प्रमाणात माघार घेतली असली, तरी तिन्ही ठिकाणी दोन सैन्यांदरम्यान बफर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. देम्चोक आणि देप्सांग या दोन ठिकाणी मात्र चिनी सैनिक अजूनही भारतीय गस्तक्षेत्रामध्ये तळ ठोकून होते. आता त्यांची माघारी अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>पाकिस्तानात पुन्हा पोलिओचा फैलाव; कारण काय?
सामरिक महत्त्वाचे देप्सांग…
सीमावर्ती भाग बहुतांश खडतर पर्वतीय स्वरूपाचा आहे. त्यामुळे सैन्याच्या हालचालींवर मर्यादा येतात. यास अपवाद देप्सांग पठार. पूर्व लडाख सीमेवर याच भागात पठारी सपाट भाग आहे. या भागावर नियंत्रण मिळवल्यास दौलत बेग ओल्डी भागातील धावपट्टी आणि दौलत बेग ओल्डी-श्योक-दार्बुक महामार्ग या रहदारीच्या दोन सामरिक महत्त्वाच्या स्रोतांवर नियंत्रण राहते. दौलत बेग ओल्डी येथे भारताचा लष्करी तळही आहे. चीनला आव्हान देण्यासाठी आणि प्रसंगी प्रतिकार करण्यासाठी भारताने या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि सामग्री जमवली आहे. या सैन्य-सामग्रीच्या झटपट हालचालींसाठी रहदारीच्या स्रोतांवर पूर्ण नियंत्रण असणे अत्यावश्यक असते.
देम्चोक, गलवान खोरे…
देम्चोक भागातील एका गावात १९६२ च्या युद्धादरम्यान चीनने घुसखोरी केली होती. येथे भारताकडून कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीस चीनने नेहमीच आक्षेप घेतला. गलवान खोऱ्यातही गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमस्थळी १९६२च्या युद्धात पहिल्यांदा चकमक झाली होती. या खोऱ्यातून दौलत बेग ओल्डी-श्योक-दार्बुक महामार्ग नजरेच्या आणि माऱ्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे जून २०२०मध्ये या भागात घुसखोरी केलेल्या चिनी सैनिकांना भारतीय तुकड्यांनी हटकले, त्यावेळी चीनने थयथयाट केला होता. १९६२च्या युद्धात अक्साई चिनसारखे भाग चीनने बळकावले, पण इतर अनेक भागांवर दावा सांगितला. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाख भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बफर क्षेत्र तयार करण्यात आले. तरीदेखील सीमावाद उकरून काढण्याची चीनची प्रवृत्ती लपून राहिली नाही. या प्रवृत्तीस चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कार्यकालात अधिक राक्षसी वळण मिळाले. तूर्त गलवान खोऱ्यात काही ठिकाणी बफर क्षेत्र निर्माण करून दोन्ही बाजूंकडून वादास तात्पुरता विराम मिळालेला आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : अमेरिकेत मतदानासाठी केवळ ‘नोव्हेंबरचा पहिला मंगळवार’ हाच दिवस का? कारण व्यावहारिक की धार्मिक?
पँगाँग सरोवर, गोग्रा हॉट स्प्रिंग्ज…
पँगाँग सरोवराचा ५० टक्के भाग हा चीन-नियंत्रित तिबेटमध्ये आहे. ४० टक्के भाग लडाखमध्ये आहे आणि १० टक्के वादग्रस्त आहे. या वादग्रस्त भागाच्या नियंत्रणासाठीच चकमकी होत असतात. सरोवरातील पर्वतशिखरांच्या स्थानावरून दोन्ही देशांमध्ये परस्पर सीमांविषयी भिन्न मते आहेत. या भागातही मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि सामग्रीची जुळणी दोन्ही बाजूंकडून झालेली आहे. चीनने तर या सरोवरात बोटींच्या सुलभ दळणवळणासाठी दोन धक्केही बांधले. गोग्रा हॉटस्प्रिंग्ज ही जागा भारताच्या दृष्टीने मोक्याची आहे. कारण येथून चीनच्या ताब्यातील अक्साई चिन सीमाभागातील हालचालींवर नजर ठेवता येते. गलवान खोरे आणि गोग्रा हॉट स्प्रिंग्ज भागातही तात्पुरती बफर क्षेत्रे उभारून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.
‘गलवान’ का घडले?
दौलत बेग ओल्डी ते देम्चोक या पट्ट्यात ६५ गस्तबिंदूंपर्यंत भारतीय सैनिकांना गस्त घालता येत होती. जून २०२०नंतर ही संख्या २५वर आली यावरून चीनच्या रेट्याची कल्पना येते. दोन देशांमध्ये सीमावाद असतो, त्यावेळी एक किंवा अनेक बफर क्षेत्रे निर्माण केली जातात. ही क्षेत्रे निर्मनुष्य आणि निर्लष्करी असणे अपेक्षित असते. या ठिकाणी शत्रूकडून लष्करी छावण्या किंवा मानवी वस्त्या उभारल्या जात नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी गस्त (पेट्रोलिंग) घातली जाते. ही गस्त कोणत्या देशाचे सैनिक कुठपर्यंत घालू शकतात, याची सीमा निर्धारित केली जाते. या निर्धारित सीमेवर प्रत्येक देशाचे गस्तबिंदू (पेट्रोलिंग पॉइंट – पीपी) ठरवले जातात. चीनने या निर्धारित गस्तबिंदूंचे पावित्र्य धुडकावून बफर क्षेत्रात घुसखोरी केली आणि गस्तबिंदूंची फेरआखणी करण्यास भारताला भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण विरोध केल्यामुळेच गलवान घडले.
पुढे काय?
चीनने खऱ्या अर्थाने देप्सांग, देम्चोक या दोनच ठिकाणी भारताला २०२० पूर्वस्थितीनुसार गस्तीची संमती दिली आहे. इतर तीन-चार ठिकाणी तात्पुरती बफर क्षेत्रे आहेत. त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोवर चीनविषयी संशय कमी होणार नाही. तसेच जवळपास ५० ते ६० हजारांची खडी फौज आणि प्रचंड सामग्री चीनने सीमा भागात आणून ठेवली आहे. तिच्या माघारीची गरज आहे. सैन्यमाघारी आणि निर्लष्करीकरण झाल्याशिवाय चीनचा हेतू शुद्ध आहे, असे मानता येणार नाही. आणि इतक्या मोठ्या माघारीस चीन खरोखरच तयार होईल हे संभवत नाही. त्यामुळे गस्तकरार हे भारत-चीन संबंध सुरळीत होण्याच्या दिशेने एक केवळ छोटे पाऊल मानता येईल. प्रत्यक्षात अजून बरीच मजल मारायची आहे.