scorecardresearch

विश्लेषण : टोमॅटो फ्लूचे संकट किती गंभीर? लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?

करोना महासाथीमधून आपण काहीसे सावरतोय असे वाटत असतानाच आता टोमॅटो फ्लू नामक नवीन आजार भारतातील काही राज्यांमध्ये आढळून येत आहे.

विश्लेषण : टोमॅटो फ्लूचे संकट किती गंभीर? लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?
प्रतिकात्मक छायाचित्र

– भक्ती बिसुरे

करोना महासाथीमधून आपण काहीसे सावरतोय असे वाटत असतानाच आता टोमॅटो फ्लू नामक नवीन आजार भारतातील काही राज्यांमध्ये आढळून येत आहे. केरळ, तमिळनाडू, हरियाणा आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये काही लहान मुलांना टोमॅटो फ्लूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे याबाबत माहिती देणारे हे विश्लेषण.

टोमॅटो फ्लू म्हणजे काय?

‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार, मुलांमध्ये आढळणाऱ्या ‘हँड, फूट ॲण्ड माऊथ’ या आजाराचेच टोमॅटो फ्लू हे एक स्वरूप आहे. आतड्यांमधून संक्रमित होणाऱ्या काही विषाणूंमुळे (इंटेरोव्हायरसेस) या आजाराचा प्रसार होतो. या आजारात मुलांना ताप, सांधेदुखी आणि अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे ही लक्षणे दिसतात. त्याबरोबरच सहसा ताप आल्यानंतर दिसणारी उलट्या, थकवा, अतिसार म्हणजेच डिहायड्रेशन ही लक्षणेही दिसून येतात. केरळमध्ये लहान मुलांना ही लक्षणे दिसल्यानंतर डेंग्यू किंवा स्वाइन फ्लूमुळेच हे होत असल्याचे मानण्यात आले, मात्र प्रत्यक्षात हा फ्लू ए-६ आणि ए-१६ या प्रकारच्या इंटेरोव्हायरसेसमुळे होत असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात येत आहे.

लॅन्सेटचा शोधनिबंध काय सांगतो?

लॅन्सेट नियतकालिकाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार हँड, फूट, माऊथ या आजाराचा हा बदललेला प्रकार आहे. मुलांमध्ये साध्या विषाणू संसर्गाऐवजी चिकनगुनिया किंवा डेंग्यू तापानंतर दिसणारे हे परिणाम असल्याची शक्यताही लॅन्सेटकडून वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पाच वर्षांखालील वयातील मुलांना आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या इतर वयातील रुग्णांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे लॅन्सेटने स्पष्ट केले आहे.

संक्रमण आताच का?

करोना काळात लहान मुलांमधील सर्व प्रकारच्या संसर्गांचे प्रमाण कमी राहिले, कारण मुलांचे घराबाहेर पडणे, लोकांमध्ये मिसळणेही कमी झाले. आता सर्व प्रकारचे निर्बंध संपल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मुलांच्या शाळा व पाळणाघरेही (डे केअर) सुरू झाली आहेत. त्यामुळे संसर्गाचा प्रसार होण्यास पूरक वातावरण निर्माण झाले आहे. हँड, फूट, माऊथ आणि टोमॅटो फ्लू या आजारांची लक्षणेही बरीचशी एकसारखी आहेत. त्यामुळे टोमॅटो फ्लूबद्दल सतर्कता वाढत असल्याचे निरीक्षणही तज्ज्ञ डॉक्टर नोंदवतात. सर्वसाधारण लक्षणे आणि विशेषतः अंगावर दिसणारे लाल रंगाचे पुरळ बघून टोमॅटो फ्लूचे सहज निदान करणे शक्य असल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात.

टोमॅटो फ्लू कशामुळे?

सध्या हँड, फूट, माऊथच्या रुग्णांमध्ये संसर्ग निर्माण करण्यास कॉक्सॅकीव्हायरस ए-६ आणि ए-१६ कारणीभूत असल्याचे संशोधकांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. इंटेरोव्हायरस ए-७१ हा हँड, फूट, माऊथ अधिक गंभीर करण्याची क्षमता असलेला विषाणू सध्या सक्रिय नसल्याची माहिती शास्त्रज्ञ देतात. त्यामुळे या आजारामध्ये एन्सेफलायटीस म्हणजेच गंभीर मेंदूदाह होण्याची शक्यता अत्यल्प झाली आहे. ९९ टक्के हँड, फूट, माऊथ रुग्णांमध्ये हा आजार सौम्यच राहतो, एखाद्या टक्के रुग्णांमध्ये त्याचे पर्यावसान एन्सेफलायटीसमध्ये होऊन मज्जासंस्थेला इजा निर्माण होण्याची शक्यता असते.

लाल पुरळामुळे संभ्रमाची शक्यता?

टोमॅटोच्या रंगाशी साधर्म्य असलेला पुरळ हे या आजाराचे वैशिष्ट्य आहे. मात्र पुरळ दिसल्यास त्यावरून मंकीपॉक्सची शंका येणेही साहजिक आहे. सहसा या आजारातील पुरळ जीभ, हिरड्या आणि गालांच्या आतील भागात तसेच तळव्यांवर दिसतो. टोमॅटो फ्लूमध्ये दिसणारा पुरळ त्वचेवर वरवर दिसतो. मात्र, मंकीपॉक्सचा पुरळ काहीसा खोलवर असतो. त्यामुळे टोमॅटो फ्लू आणि मंकीपॉक्स यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टर स्पष्ट करतात.

उपचार काय?

या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. विषाणू संसर्गाच्या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जातात. ताप असल्यास पॅरासिटेमॉल दिले जाते. भरपूर पाणी पिणे आणि संपूर्ण विश्रांती घेणे असा सल्लाही डॉक्टर देतात.

प्रतिबंधात्मक उपाय?

टोमॅटो फ्लू सध्या प्रामुख्याने मुलांमध्ये आढळून येत असल्याने आजाराची लक्षणे असल्यास पाच ते सात दिवस मुलांना शाळेत पाठवू नये असे डॉक्टर सांगतात. अंगावर लाल पुरळ, चट्टे असल्यास इतर लहान मुलांना मिठी मारणे, स्पर्श करणे किंवा नजीक सहवास टाळणे योग्य असल्याचे डॉक्टर सुचवतात. मुलांना हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता याबाबत प्रशिक्षित करणे, रुमाल वापरण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

हेही वाचा : विश्लेषण : १५० दिवसात ३५७० किमी प्रवास, काय आहे काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा?

अंथरुण, पांघरुण स्वतंत्र ठेवणे, लक्षणे ओसरल्यानंतर ते धुवून वाळवल्यानंतरच पुन्हा वापरात घेणे योग्य असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मुलांना भरपूर पाणी पिण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच त्यांचे अंग कोमट पाण्याने पुसणे यामुळेही संसर्गाची तीव्रता तसेच प्रसार रोखणे शक्य असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained on risk of tomato flu symptoms treatment print exp pbs

ताज्या बातम्या