सचिन रोहेकर

अमेरिका, ब्रिटनसह, युरोपीय महासंघ आणि सहयोगी देशांनी जागतिक स्तरावर हजारो वित्तीय संस्थांद्वारे वापरल्या जाणार्‍या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियातील बँकांना वगळण्याला मान्यता दिली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियावर लादल्या गेलेल्या आर्थिक निर्बंधांना कठोरतम टोक देणारे हे पाऊल आहे. रशियाचा जगाच्या अन्य भागाशी सुरू असलेला व्यापार आणि पैशाच्या सुरळीत व्यवहारालाच प्रतिबंधित करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतूनच रशियाची हकालपट्टी करू पाहणारे हे पाऊल अण्वस्त्राप्रमाणे त्या देशासाठी संहारक ठरेल, असे बोलले जात आहे. कसे ते पाहू या.

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

स्विफ्ट म्हणजे काय?

स्विफ्ट हे ‘सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन’ याचे संक्षिप्त रूप आहे. जगभरातील बँका आणि वित्तीय संस्था तिच्या सदस्य असून, सुरक्षितपणे पैशाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि वित्तीय संदेशवहनासाठी त्यांनी सहकारी तत्त्वावर स्थापलेले ते व्यापक जाळेच म्हणता येईल. खरे तर, ‘स्विफ्ट’ला आजच्या घडीला जागतिक स्तरावर सुरू असणाऱ्या पैशांच्या देवघेवीच्या व्यवहाराची मुख्य धमनीदेखील म्हणता येईल. देशोदेशीच्या सीमा ओलांडून पैशाचे सुरळीत आणि जलद हस्तांतर करण्यास ती अनुमती देते. वर्ष १९७३ मध्ये स्थापित आणि बेल्जियमस्थित, स्विफ्ट २०० हून अधिक देशांमधील ११,००० बँका आणि वित्तीय संस्थांना जोडते.

स्विफ्टची मालकी आणि नियंत्रण कुणाकडे आहे?

स्विफ्टची निर्मिती अमेरिकी आणि युरोपातील बँकांनी त्यांच्या गरजेतून केली होती. कोणाही एका देशाच्या अथवा एका संस्थेने स्वतःची प्रणाली विकसित करावी आणि या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करू नये म्हणून हा एकत्रित पुढाकार घेतला गेला. त्यामुळे हे युरोप-अमेरिकेतील २००० हून बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्त मालकी असलेले सहकारी व्यासपीठ आहे, असे म्हणता येईल. अमेरिका आणि ब्रिटन यांच्या मध्यवर्ती बँका, अनुक्रमे फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंडसह – जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या भागीदारीत, नॅशनल बँक ऑफ बेल्जियमद्वारे ‘स्विफ्ट’ची देखरेख व नियमन केले जाते.

रशियन बँकांची ‘स्विफ्ट’मधून हकालपट्टीमागे उद्देश काय आहे?

रशियन बँकांच्या ‘स्विफ्ट’ व्यासपीठावरून निष्कासनातून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल अशी अपेक्षा आहे. अमेरिकेने व्यक्त केलेल्या शब्दांतच सांगायचे तर, यामुळे सीमेपल्याड पैशाचे व्यवहार करण्यासाठी ‘टेलिफोन किंवा फॅक्स मशीन’सारख्या साधनांवर रशिया अवलंबून राहील. स्विफ्टमधून कोणत्या रशियन बँकांना वगळले गेले आहे, हे पुरते स्पष्ट झालेले नाही. येत्या काही दिवसांत हे स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

तथापि, रशियाच्या मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष सर्गेई अलेक्साशेन्को यांच्या मते, ‘सोमवारी रशियन चलन बाजारात यातून महासंकट येणार आहे.’ रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या पत मालमत्तेला यातून लकवा जडू शकेल. रशियाला तिच्या परकीय चलन गंगाजळीचाही अशा संकटप्रसंगी वापर करता येऊ शकणार नाही.

‘स्विफ्ट’मधून हकालपट्टीच्या कठोर पावलांबाबत निर्णय विलंबाने का घेतला गेला?

निवडक रशियन बँकांवरील ‘स्विफ्ट’ बंदीच्या अंमलबजावणीस थोडा वेळ लागू शकतो, पण महत्त्वाचे म्हणजे त्यातून पाश्चात्य राष्ट्रांच्या दृढ संकल्पाला काहीसे उशिराने का होईना प्रदर्शित केले गेले आहे. युरोपिय महासंघातील राष्ट्रांची सुमारे ४० टक्के इंधन गरज ही रशियाकडून होणाऱ्या निर्यातीतून भागविली जाते आणि युरोपीय कंपन्यांकडून त्याचा मोबदला हा स्विफ्ट प्रणालीच्या माध्यमातूनच चुकता केला जातो. म्हणूनच रशियावर पूर्णत्वाने ‘स्विफ्ट’बंदीने तेथून होणाऱ्या नैसर्गिक वायू, तेल निर्यातीला बाधा आणली जाणार ज्यातून आधीच महागाई तडाखे सोसत असलेल्या युरोपीय राष्ट्रावर इंधन टंचाई आणि पर्यायाने दरवाढीच्या आणखी मोठ्या संकटात लोटणारे ठरू शकेल.

तथापि या बंदीचा रशियाला जास्तीत जास्त आर्थिक दणके बसतील, याची खात्री करताना त्यायोगे केवळ काही रशियन बँकांना लक्ष्य केले जाईल, अशी कसरतही केली गेलेली दिसते. यातून रशियन बँकांशी व्यवहार करणार्‍या युरोपातील कंपन्यांवर त्यांच्या नैसर्गिक वायूच्या आयातीच्या बदल्यात होणाऱ्या देयक व्यवहारांवर होऊ शकणारा परिणाम सौम्य राखला जाईल. शिवाय, रशियाच्या मध्यवर्ती बँकेवरील निर्बंधांचा अर्थ, जगातून आर्थिकदृष्ट्या बहिष्कृत केले गेल्याचे अर्थव्यवस्थेवरील घाव मर्यादित राखण्यासाठी तिला तिच्या विदेशी चलन गंगाजळीचा वापर करण्यावरही प्रतिबंध येतील, असा प्रयत्न आहे.

पण हा निर्णय रशियासाठी जरब निर्माण करणारा ठरेल काय?

रशियाचे माजी अर्थमंत्री अलेक्सेई कुदरीन यांच्या मते, आंशिक स्विफ्ट बंदीने रशियाच्या अर्थव्यवस्था पाच टक्क्यांच्या घरात बाधित होऊ शकते. यापूर्वी २०१४ मध्ये क्रिमियावर हल्ल्याच्या प्रसंगी रशियाला अशा प्रतिबंधांचा सामना करावा लागला आहे. त्यातून धडे घेत, रशियाने परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ करून ठेवली आहे.

हेही वाचा : उद्ध्वस्त युक्रेनला आता थेट एलोन मस्कची साथ, रशियाचे जोरदार हल्ले सुरू असताना केली ‘ही’ मदत

जानेवारी २०२२ मध्ये त्या देशाचा परकीय चलनाचा साठा ६३० अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. शिवाय गेल्या सात वर्षांमध्ये, रशियाच्या मध्यवर्ती बँकेनेदेखील स्विफ्टला समांतर आर्थिक संदेशांच्या हस्तांतराची स्वदेशी प्रणाली ‘एसपीएफएस’ विकसित केली आहे. स्विफ्टला संभाव्य आव्हान ठरू शकणार्‍या या उपक्रमात रशियाला चीनकडून सहयोग मिळत असल्याचे सकृतदर्शनी दिसते. तथापि या पर्यायी व्यासपीठाचा वापर रशियाकडून केला जाईल आणि आंशिक ‘स्विफ्ट’’बंदीला निष्प्रभ ठरविले जाईल काय अथवा आंशिक बंदीची व्याप्ती वाढत जाऊन ती पूर्ण बंदीत परिवर्तित होईल, हे पाहावे लागेल.