जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत मनुस्मृती या धार्मिक ग्रंथाविषयी बोलताना त्यातील लिंगाधारीत दुटप्पीपणावर ताशेरे ओढले. तसेच मनुस्मृतीप्रमाणे सर्व स्त्रिया शुद्र असल्याचं नमूद करत हे मत अत्यंत प्रतिगामी असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून उच्चवर्णीय शिक्षकाने त्याला केलेली मारहाण आणि त्यात विद्यार्थ्याचा मृत्यू याचंही उदाहरण दिलं. यानंतर देशभरात मनुस्मृती काय आहे? मनुस्मृतीत खरंच अशी विधानं करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आले. या निमित्ताने मनुस्मृतीविषयीचं हे विश्लेषण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांतीश्री धुलीपुडी पंडित काय म्हणाल्या होत्या?

शांतीश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या होत्या, ”मनुस्मृतीने सर्व महिलांना शूद्र म्हणून वर्गीकृत केले आहे, ‘मनुस्मृती’ नुसार सर्व स्त्रिया शूद्र आहेत. त्यामुळे कोणतीही स्त्री ती ब्राह्मण किंवा इतर कोणत्या जातीची असल्याचा दावा करू शकत नाही. मानववंशशास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं, तर हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही.”

“बरेचसे देव क्षत्रिय आहेत. भगवान शिव हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावे, असा माझा अंदाज आहे. कारण ते एका स्मशानभूमीत सापासह बसले आहेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील, असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की मानववंशशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीतून आलेले नाहीत. मग आपण हा भेदभाव करतो. हे अत्यंत अमानवीय आहे”, असंही पंडित यांनी म्हटलं होतं.

मनुस्मृती काय आहे?

मनुस्मृती हा संस्कृतमधील हिंदू धर्मातील पुरातन धर्मग्रंथ आहे. त्याला मानवधर्म या नावानेही ओळखलं जातं. या ग्रंथाची रचना इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन तिसरे शतक या कालखंडात झाल्याचा अंदाज आहे. हा ग्रंथ पुराणांमधील मनु नावाच्या ऋषींनी लिहिल्याचं मानलं जातं. मात्र, संशोधकांमध्ये यावरून मतभिन्नता आहे. अनेक तज्ज्ञांनुसार, हा ग्रंथ कुणा एका व्यक्तीने लिहिलेला नसून मोठ्या कालखंडात विविध ब्राह्मण ऋषींनी लिहिलेला असावा. दुसरीकडे इंडोलॉजिस्ट पॅट्रिक ऑलिव्हेल यांच्यामते, “मनुस्मृतीतील साचेबद्ध रचना पाहून हा ग्रंथ कुण्या एका व्यक्तीने किंवा सामर्थ्यवान व्यक्तीच्या नेतृत्वातील गटाने लिहिला असावा.”

मनुस्मृतीत नेमकं काय आहे?

मनुस्मृती ग्रंथात जाती, लिंग व वयानुसार समाजातील विविध घटकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांची निश्चिती करण्यात आली होती. विविध जातींमध्ये कोणत्या प्रकारचे सामाजिक व्यवहार होतील, स्त्री व पुरुषामधील संबंध जातीनुसार कसे असतील, कर रचना कशी असेल, विवाहाचे नियम आणि दैनंदिन जीवनातील वादाचे निवाडे कसे केले जातील याबाबत मनुस्मृतीत मांडणी करण्यात आली होती. म्हणजेच मनुस्मृती त्या काळच्या नियम, कायद्याचं संकलन होतं. या ग्रंथात एकूण १२ अध्याय आहेत.

मनुस्मृतीबाबत वाद काय?

मनुस्मृती ग्रंथाचे चार प्रमुख भाग आहेत. १. विश्वनिर्मिती २. धर्माचा उगम ३. चार सामाजिक वर्णांचा धर्म ४. कर्म, पुनर्जन्म आणि स्वर्गाचे नियम. यातील तिसरा भाग सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यात चार वर्णांची म्हणजेच चातुर्वण्य व्यवस्थेची मांडणी करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक जातीने कोणते नियम पाळायचे हे ठरवून दिलं आहे. यानुसार ब्राह्मण मानवी प्रजातीतील सर्वोत्कृष्ट वर्ण मानला गेला आहे. याशिवाय चौथ्या वर्णातील शुद्रांना केवळ उच्चवर्णीयांची सेवा करण्याचं काम दिलं आहे.

मनुस्मृतीमधील काही वादग्रस्त मांडणी

अध्याय आठ, श्लोक २१ – राजाला केवळ ब्राह्मणच उपदेश करू शकतो. शूद्र कधीही राजाचा धर्मप्रवक्ता होऊ शकत नाही. ज्या राजाला शूद्र मनुष्य धर्मोपदेश करतो त्याचं राष्ट्र त्याच्या डोळ्यांदेखत चिखलात रुतणाऱ्या गायीप्रमाणे नष्ट होते.

अध्याय दोन, श्लोक १३ – ” शृंगाराने मोहित करून पुरूषांना दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. त्यामुळे ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधीही बेसावध राहात नाहीत.”

अध्याय आठ, श्लोक १२९ – अगदी सामर्थ्यवान शुद्राने देखील संपत्ती बाळगू नये. शुद्राकडे संपत्ती आली, तर तो ब्राह्मणाचं शोषण करेल.

अध्याय आठ, श्लोक ३७१ – जेव्हा स्त्री तिच्या पतीसोबत एकनिष्ठ राहणार नाही तेव्हा राजाने अशा महिलेला भर चौकात श्वानांच्या मुखी द्यावं.

अध्याय पाच, श्लोक १४८ – महिलेने बालपणी वडिलांच्या नियंत्रणात राहावं, तरुणपणी नवऱ्याच्या आणि पतीचा मृत्यू झाल्यास तिच्या मुलाच्या अधिपत्याखाली राहावं. तिने स्वतंत्र कधीही राहू नये.

अध्याय २, श्लोक १३ – ” शृंगाराने मोहित करून पुरूषांना दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. त्यामुळे ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधीही बेसावध राहात नाहीत.”

हेही वाचा : “मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूंचा कुठलाही देव ब्राह्मण नाही”; जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांचं वक्तव्य

विशेष म्हणजे मनुस्मृतीमधील याच विषमतावादी गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ जात आणि लिंगाच्या आधारे होणाऱ्या शोषणाचं मूळ असल्याचं सांगितलं आणि २५ डिसेंबर १९२७ रोजी हा ग्रंथ सार्वजनिकरित्या जाळला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on what is the manusmriti and controversial sloka pbs
First published on: 26-08-2022 at 19:27 IST