scorecardresearch

विश्लेषण : तुम्ही क्रेडिट-डेबिट कार्ड वापरता आहात? मग टोकनीकरण केले का?

ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड व्यवहार आणि विदा यासंबंधी सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर स्थापित करण्यासाठी चिन्हांकनाची (टोकनायझेशन) नवीन पद्धतीची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.

विश्लेषण : तुम्ही क्रेडिट-डेबिट कार्ड वापरता आहात? मग टोकनीकरण केले का?
डेबिट आणि क्रेडिट कार्ड

– गौरव मुठे

ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड व्यवहार आणि विदा यासंबंधी सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर स्थापित करण्यासाठी चिन्हांकनाची (टोकनायझेशन) नवीन पद्धतीची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा लहान व्यापारी आणि व्यावसायिकांना महसुली फटका बसण्याची शक्यता सतावत असल्याने त्यांनी पुन्हा मुदत वाढीची मागणी केली होती. हे टोकनीकरण नेमके काय आहे, ते कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे का आहे, याचा आढावा…

टोकनीकरण काय?

सध्या, ऑनलाइन धाटणीच्या कार्ड व्यवहारांमध्ये, व्यापाऱ्यांसह अनेक संस्थांकडून ग्राहकांच्या कार्डाचा तपशील अर्थात कार्ड क्रमांक, समाप्तीची तारीख वगैरे ‘कार्ड-ऑन-फाइल’ तपशील जतन करून ठेवला जातो. जेणेकरून भविष्यात व्यवहार करताना कार्डधारकांना हा तपशील पुन्हा नमूद करावा न लागता, सोयीस्करपणे व अल्पवेळेत व्यवहार मार्गी लावणे शक्य बनते. परंतु अनेक व्यापारी संस्थांकडे अशा तऱ्हेने कार्डाचा तपशील असल्यामुळे तो चोरला जाण्याची अथवा त्याचा दुरुपयोग होण्याचा धोकाही वाढतो. शिवाय व्यापाऱ्यांकडूनच साठविलेल्या अशा तपशिलाबाबत हयगय आणि गैरवापर झाल्याची आणि कार्डधारकांना त्यातून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कार्ड वितरण जाळे आणि कार्ड जारीकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेस कार्डाचा तपशील जतन करता येणार नाही, असे निर्देश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. तसेच व्यापारी व देयक व्यवहार मंचांना कार्डाचे सर्व तपशील हटवून, ग्राहकांच्या संमतीने ते ‘टोकन’रूपात बदलून घ्यावे लागणार आहेत.

टोकनीकरणाचे फायदे काय?

ग्राहकांकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार केला जातो. अशा वेळी ग्राहकाला त्याच्या बँकेचा आणि संबंधित कार्डाचा तपशील व्यापाऱ्याला द्यावा लागतो. मात्र व्यापाऱ्याकडून बँकेशी संबंधित गोपनीय माहिती गहाळ होऊ शकते आणि त्या माहितीच्या आधारे सायबर भामटे खात्यातील पैसे काढून घेऊ शकतात. यासाठी कार्डाशी संबंधित सर्व माहिती सुरक्षित राहावी यासाठी ती सांकेतिक पद्धतीने (टोकन) साठवली जाते. थोडक्यात टोकनीकरण म्हणजे कार्डाच्या मूळ तपशिलाला टोकनने बदलणे होय. रिझर्व्ह बँकेच्या मते, टोकनीकरण कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित असतात. डिजिटल व्यवहार प्रक्रियेदरम्यान मूळ कार्ड तपशील व्यापाऱ्याला अवगत केला जात नाही.

टोकनीकरण न केल्यास ग्राहकाचे नुकसान काय?

नवीन नियम लागू झाल्यानंतर कार्डधारक पॉईंट ऑफ सेल मशीन, ऑनलाइन किंवा एखाद्या अॅपच्या माध्यमातून क्रेडिट अथवा डेबिट कार्डाच्या माध्यमातून देणी (बीजक) देताना त्याच्या कार्डाचा तपशील चिन्हांकित स्वरूपात साठवला जाईल. त्यामुळे समजा ग्राहकांनी म्हणजेच कार्ड धारकांनी टोकनीकरण न केल्यास विविध ऑनलाईन मंच आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर साठवलेला तुमच्या कार्डचा तपशील नाहीसा होणार आहे.

मध्यवर्ती बँकेकडून विलंब का?

व्यापारी व देयक व्यवहार मंचांना कार्डाचे सर्व तपशील हटवून, ग्राहकांच्या संमतीने ते टोकन रूपात बदलून घ्यावे लागण्याच्या या प्रक्रियेला आतापर्यंत तीनदा मुदत वाढ देण्यात आली होती. टोकन वापरून प्रक्रिया केलेल्या व्यवहारांची संख्या व्यापाऱ्यांच्या सर्व श्रेणींकडून प्राप्त झालेली नाही, असे उद्योग क्षेत्राकडून सूचित केले गेले आहे. या समस्यांची दखल घेऊन त्यासंबंधी सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून त्यांचे निराकरण केले जात असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने टोकनीकरण प्रकियेच्या अंमलबजावणीला मुदत वाढ दिली. या विस्तारित कालावधीचा उपयोग व्यापारी संस्था व देयक उद्योगाद्वारे, टोकनीकृत व्यवहार हाताळण्यासाठी सर्व भागीदारांची सज्जता करण्यासाठी, टोकन-आधारित व्यवहारावर प्रक्रिया आखण्यासाठी, तसेच कार्डधारकांमध्ये जनजागृतीसाठी करण्यात आला. मात्र १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू झाली असली तरी अजूनही लहान व्यापाऱ्यांकडून कार्डाचे चिन्हांकन करण्यासाठी आणखी मुदत मिळावी अशी मध्यवर्ती बँकेकडे विनंती करण्यात आली आहे.

टोकनीकरणाचा कसे केले जाते?

टोकनीकरण झालेल्या कार्डामार्फत व्यवहार अधिक सुरक्षित समजले जातात. कारण, व्यवहार-प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष कार्डावरील तपशील व्यापाऱ्याला दिला जात नाही. बँकेकडून म्हणजेच टोकन देणाऱ्या संस्थेकडून (टोकन रिक्वेस्टर) उपलब्ध करण्यात आलेल्या अॅपवर, एक विनंती टाकून कार्डधारक, ते कार्ड टोकनीकृत करून घेऊ शकतो. टोकन रिक्वेस्टर ती विनंती कार्ड नेटवर्ककडे पाठवेल व हे नेटवर्क, कार्ड देणाराच्या सहमतीने, कार्ड, टोकन रिक्वेस्टर व डिव्हाईस या तिघांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक टोकन देईल. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क असते.

आतापर्यंत किती कार्डधारकांनी टोकनीकरण केले?

देशात आतापर्यंत ३५ कोटी कार्ड टोकनीकरण केले गेले आहेत. सरलेल्या महिन्यातील म्हणजेच सप्टेंबरमधील एकूण व्यवहारांपैकी सुमारे ४० टक्के व्यवहार टोकनवर आधारित होते आणि या व्यवहाराचे मूल्य ६३ कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ऑगस्ट अखेरपर्यंत देशामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डची एकूण संख्या १०१ कोटींहून अधिक आहे. केंद्र सरकारचे जन धन बँक खाते यांसारख्या योजनांमुळे तळागाळापर्यंत बँकिंग सेवा पोहोचली असून बहुतांश लोकांकडे डेबिट कार्ड आहे.

टोकनीकरण केल्यानंतर ग्राहकाच्या कार्डावरील तपशील सुरक्षित असतो का?

प्राधिकृत कार्ड नेटवर्ककडून, प्रत्यक्ष कार्डावरील माहिती (डेटा), टोकन व संबंधित इतर तपशील सुरक्षित रितीने साठविली जात असते. टोकन रिक्वेस्टर, कार्डावरील क्रमांक किंवा कार्डाचा अन्य कोणताही तपशील साठवू शकत नाही. जागतिक पातळीवरील सर्वमान्य पद्धत अनुसरून कार्डाच्या सुरक्षेसाठी टोकन रिक्वेस्टर प्रमाणित करून घेणे कार्ड नेटर्वक्ससाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

टोकन कसे मिळवाल?

बँकेच्या संकेतस्थळावर किंवा अॅपवर टोकन देण्याची मागणी करून कार्ड टोकन मिळवता येते. ग्राहकाने मागणी नोंदवल्यानंतर रिक्वेस्टर थेट क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेला विनंती पाठवेल (व्हिसा / मास्टरकार्ड / डिनर/ रुपे). टोकन रिक्वेस्टरकडून टोकन रिक्वेस्टर प्राप्त करणारी संस्था एक टोकन तयार करेल. जे टोकन रिक्वेस्टर आणि मर्चंटची संबंधित असेल.

हेही वाचा : Bank Holidays in October 2022 : येत्या महिन्यात कोणत्या दिवशी बँक राहणार बंद? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

ग्राहकांच्या संमतीविना कार्ड वितरण केल्यास?

ग्राहकांच्या सुस्पष्ट संमतीविना त्यांना परस्पर क्रेडिट कार्ड दिले जाऊ नये तसेच विद्यमान कार्डवर अधिक लाभ देण्याच्या नावाखाली बँकांना किंवा कार्ड जारीकर्त्यांना सुधारित कार्ड न देण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेकडून देण्यात आले आहेत. मध्यवर्ती बँकेने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून देयकाच्या दुप्पट रक्कम दंड वसुली केली जाण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या