scorecardresearch

विश्लेषण : गँगस्टर मन्या सुर्वेचा एन्काऊंटर ते राष्ट्रपती पदकाने सन्मान, फडणवीसांनी आरोप केलेले इसाक बागवान कोण आहेत?

इसाक बागवान कोण आहेत आणि ते पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांच्यावरील आरोप याबाबतचं हे विश्लेषण.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचे आणि कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले. यानंतर आरोप झालेले माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान कोण आहेत आणि त्यांची नेमकी कारकीर्द काय याविषयी चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर इसाक बागवान कोण आहेत आणि ते पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांच्यावरील आरोप याबाबतचं हे विश्लेषण.

इसाक बागवान कोण आहेत?

इसाक इब्राहिम बागवान मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. ते सहाय्यक पोलीस आयुक्त असताना २००९ मध्ये पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांनी जवळपास ३५ वर्षे मुंबई पोलीस दलात काम केलं. विशेष म्हणजे त्यांचा प्रतिष्ठित राष्ट्रपती पदकाने तीनवेळा सन्मान झालेला आहे.

इसाक बागवान १९८२ मध्ये माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरिक्षक असलेल्या इसाक बागवान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कुख्यात गँगस्टर मन्या सुर्वेचा वडाळा येथे एन्काऊंटर केला होता. हा मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील पहिला अधिकृत एन्काऊंटर मानला जातो.

१९८३ मध्ये इसाक बागवान पुन्हा चर्चेत आले. त्यावेळी गँगस्टर अमीरजादा खानची काला घोडा येथील मुंबई सेशन कोर्ट परिसरात हत्या झाली. या हत्येमागे दाऊद इब्राहिम कासकर असल्याचं बोललं गेलं. अमीरजादाची हत्या करून आरोपी डेविड परदेशी फरार होण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी त्याच्या पायावर गोळी झाडत त्याला पकडलं.

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यावेळी देखील इसाक बागवान यांनी नरिमन हाऊसची कमान सांभाळत दहशतवाद्यांना रोखलं आणि लोकांची मदत केली. या कामासाठी त्यांचं भरपूर कौतुकही झालं. २०१३ मध्ये सुर्वे एन्काऊंटरवर आधारित एक हिंदी चित्रपटही आला. त्यात अभिनेता अनिल कपूरने बागवान यांची भूमिका केली. मात्र, चित्रपटातील काही दृश्यांवरून बागवान यांनी नाराजी व्यक्त केली.

यानंतर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी बागवान यांनी ‘इसाक बागवान’ नावाचं पुस्तक लिहिलं. २०१५ मध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं. २०१८ मध्ये त्यांनी ‘मी अगेंन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड’ हे आणखी एक पुस्तक लिहिलं.

नेमकं प्रकरण काय?

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना अजून एक ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ सरकारवर टाकला. याआधी फडणवीसांनी तब्बल १२५ तासांचं व्हिडीओ फूटेज असल्याचा दावा करत ते पेनड्राईव्ह तपास यंत्रणांकडे सोपवले होते. यापाठोपाठ गुरुवारी त्यांनी अजून एक पेनड्राईव्ह राज्याच्या गृहमंत्र्यांना देणार असल्याचं सांगत त्यामध्ये मुंबईचे सेवानिवृत्त एसीपी आणि एनकाऊंटर स्पेशालिस्ट इसाक बागवान यांच्याविषयीचं स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप फडणवीसांनी सभागृहात केला.

इसाक बागवान यांच्या भावाचंच स्टिंग!

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना पेनड्राईव्हमध्ये इसाक बागवान यांचे बंधू नसीर बागवान यांचं स्टिंग असल्याचं सांगितलं. मात्र, अजून आपण या पेनड्राईव्हचं फॉरेन्सिक ऑडिट केलेलं नसल्यामुळे तो सभागृहाच्या पटलावर न ठेवता फक्त गृहमंत्र्यांना देणार असल्याचं ते म्हणाले.

इसाक बागवान यांचं बारामती कनेक्शन!

यावेळी बोलताना फडणवीसांनी इसाक बागवान यांचं बारामती कनेक्शन असल्याचं म्हटलं. “मुंबई पोलीस दलातले सेवानिवृत्त एसीपी एसाक बागवान एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांचं बारामती कनेक्शन देखील आहे. हे सेवेत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली. बारामतीतली ४२ एकर एनए जमीन त्यांच्याकडे आहे. अजित पवारांचीही एवढी नसेल. मुंबईत देखील त्यांची मालमत्ता आहे”, असं फडणवीस म्हणाले.

नातेवाईकांच्या नावे जमीन खरेदी

“इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम बागवान आणि चुलत भावजय बिल्किस बागवान यांच्यानावे नोकरीत असताना या जमिनी त्यांनी खरेदी केल्या. पण निवृत्तीनंतर त्यांनी फक्त साधा अर्ज देऊन या सगळ्या मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्या. बिल्किस बागवान, सोहेल बागवान यांनीही साधा अर्ज देऊन मालमत्ता हस्तांतरीत केली. इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या एका व्यक्तीला एक जमीन विकली आणि पुन्हा दोन महिन्यात तीच जमीन परत देखील विकत घेतली”, असा दावा फडणवीसांनी केला.

हेही वाचा : फडणवीसांचा अजून एक ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’; निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप!

“या व्यवहारांमध्ये काही जमिनी फरीद मोहम्मद अली वेल्डरच्या नावाने घेतल्या होत्या. २०१७मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली होती, तेव्हा त्याने सांगितलं होतं की या वेल्डरला मी १० लाख रुपये दिले आहेत. त्याचा अकम्प्लीस म्हणून या वेल्डरचं नाव आलं आहे. त्याची चौकशी झाल्यानंतर ७ दिवसांत त्याचा मृत्यू झाला. ४१ लाख रुपयाला त्याने हीच मालमत्ता बागवान यांच्याकडून विकत घेतली होती. १० वर्ष नावावर ठेवली आणि नंतर ३०-१२-२०२१ ला वेल्डरच्या मुलाने ही संपत्ती पुन्हा इसाक बागवान यांना बक्षीसपत्र करून दिली”, असं फडणवीस सभागृहात म्हणाले.

मुंबईच्या राजकीय नेत्याची मध्यस्थी?

दरम्यान, वेल्डरसोबतच्या बागवान यांच्या व्यवहारांमध्ये मुंबईच्या एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याचं फडणवीस म्हणाले. “या सगळ्यामध्ये एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली. नसीर बागवानचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. त्यात तो मुंबईचा राजकीय नेता कसा बारामतीला गेला आणि मध्यस्थी केली हे सांगितलं. हाजी मस्ताननं तेव्हा व्यावसायिक आर के शाह याचं अपहरण केलं होतं. त्यानंतर इसाकने हाजी मस्तानसोबत मध्यस्थी करून त्या व्यावसायिकाला सोडलं होतं. त्याबदल्यात त्याला भावाच्या नावाने मुंबई सेंट्रलला एक फ्लॅट मिळाला होता, असं सगळं बोलल्याचं त्या पेनड्राईव्हमध्ये आहे”, असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained on who is ex encounter specialist mumbai police officer isaque bagwan pbs

ताज्या बातम्या