नीट-पीजी’च्या पात्रतागुणांत घट कशामुळे?

देशातील शासकीय आणि खासगी वैद्याकीय महाविद्यालयांत मिळून पदव्युत्तर वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या सुमारे ५० हजार जागा उपलब्ध आहेत. ‘राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा – पदव्युत्तर पदवी’ (नीट-पीजी) या प्रवेश परीक्षेनंतर सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा दुसऱ्या फेरीअंतीही सुमारे १८ हजार जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले. या जागा भरण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्र सरकारकडे पात्रता गुण (कट ऑफ) कमी करण्याची मागणी केली. ‘पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा गंभीर परिणाम होतो. सरकारी रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांची कमतरता, शिक्षकांवर अतिरिक्त ताण, रुग्णांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होतो. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणे हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही,’ असे ‘आयएमए’ने निवेदनात नमूद केले. त्यानंतर ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस’ने (एनबीईएमएस) सर्वसाधारण प्रवर्गासाठी कट ऑफ दोन फेऱ्यांनंतर सात पर्सेंटाइलपर्यंत खाली आणला. सर्वसाधारण गटातील अपंग आणि आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गांसाठी तो पाच पर्सेंटाइल, तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी तो शून्य पर्सेंटाइल इतका खाली आणला गेला. त्यामुळे नीट-पीजी परीक्षेत ८०० पैकी उणे ४० इतके गुण मिळवणारे अनेक विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र ठरले. यापूर्वी करोनानंतरच्या काळात ‘नीट-पीजी’च्या पात्रता गुणांमध्ये घट करण्यात आली होती.

पण आयएमएने मान का तुकवली?

‘पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे उमेदवार हे मुळात डॉक्टरच आहेत. पर्सेंटाइल कमी न केल्यास ‘नॉन क्लिनिकल’च्या जागा रिक्त राहतात. शस्त्रक्रियेसारख्या शाखांना प्रवेश होतात. वैद्याकीय महाविद्यालयात शिकविण्यासाठी शिक्षक लागतात. ‘नॉन क्लिनिकल’ला विद्यार्थ्यांनी प्रवेशच न घेतल्यास शिक्षकच मिळणार नाहीत. त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच पर्सेंटाइल कमी करण्यास ‘आयएमए’ने पाठिंबा दिला. यात गुणवत्ता, दर्जा घसरण्याचा मुद्दा येत नाही. ही प्रामुख्याने तांत्रिक प्रक्रिया आहे’, असे ‘आयएमए’च्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. ‘अॅनॉटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री अशा विषयांसाठी शिक्षकच मिळत नाहीत. आमच्या वैद्याकीय महाविद्यालयात या विषयांसाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे गरजेचे आहे; त्याने अंतिमत: गुणवत्ता सुधारेलच. त्यामुळे ‘क्लिनिकल’ नव्हे, पण ‘नॉन क्लिनिकल’साठी पर्सेंटाइल कमी करणे ही गरज आहे,’ असे सिम्बायोसिस विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी स्पष्ट केले.

मग आताचा वाद कसला?

‘वैद्याकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ झाल्याने, त्या विशेषत: खासगी वैद्याकीय महाविद्यालयांतील जागा भरण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. या महाविद्यालयांचे शुल्क कोटींच्या घरात जाते. त्यामुळे वैद्याकीय शिक्षणाच्या ‘व्यवसाय वृद्धीसाठी’ हे होते का, असा प्रश्न पडतो’, असा आक्षेप फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे सहसंस्थापक डॉ. रोहन कृष्णन यांनी नोंदवला आहे. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण खासगी महाविद्यालयांत अधिक आहेच, पण विशेषत: शहरांच्या परिघावर असणारी सरकारी महाविद्यालये किंवा जिल्हा रुग्णालयांशी निगडित जागा रिक्त राहत आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?

‘देशभरात पदव्युत्तर वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या १८ हजार जागा रिक्त आहेत. पैकी १२ हजार खासगी महाविद्यालयांत आहेत. त्यामुळे या मागे मोठे अर्थकारण आहे. पर्सेंटाइल कमी करणे ही गुणवत्तेशी तडजोड आहे. अभ्यासक्रमांमध्ये बदल, अभ्यासक्रमांत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे’, याकडे ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक डॉ. श्रीराम गीत यांनी लक्ष वेधले. ‘जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या शिफारशींच्या मानाने भारतात डॉक्टरांची संख्या कमी आहे. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्रता गुण कमी करणे, तसेच अनिर्बंध पद्धतीने पैसाकेंद्रित खासगी वैद्याकीय महाविद्यालये सुरू करणे, हा उपाय नाही. कारण, या वैद्याकीय महाविद्यालयांत शिकणारे नंतर ग्रामीण भागात जातच नाहीत. ‘नीट’चे नियम बदलणे वा खासगी वैद्याकीय महाविद्यालये सुरू करणे यावर बंदीच घातली पाहिजे’, असे मत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, कार्यकर्ते डॉ. अनंत फडके यांनी मांडले. आता तर ‘कट ऑफ’ कमी करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे.