फ्रान्समध्ये लहान मुले असलेल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास १ जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर किंवा बस स्थानकावर सिगारेट पेटवल्यास मोठा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्समधील हा धूम्रपान बंदी कायदा आहे काय, याविषयी जाणून घेऊयात.

फ्रान्समधील धूम्रपान बंदीमागील कारण काय? 

फ्रान्सच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्री कॅथरीन वॉट्रिन यांनी प्रादेशिक ओएस्ट फ्रान्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, मुलांचा वावर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनाचा वापर बंद झाला पाहिजे. धूम्रपान बंदीचा हा निर्णय सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे, विशेषतः मुलांसाठी. मुलांना स्वच्छ हवा घेण्याचा अधिकार आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हे निर्बंध १ जुलैपासून लागू होतील. फ्रान्सच्या धूम्रपानविरोधी राष्ट्रीय समितीने म्हटले आहे की दरवर्षी ७५,००० हून अधिक धूम्रपान करणारे तंबाखूशी संबंधित आजारांमुळे मरतात. हे प्रमाण एकूण मृत्यूंपैकी १३ टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि खुल्या, सार्वजनिक ठिकाणी मुले धुराच्या संपर्कात येऊ नयेत याची खात्री करण्यासाठी सरकार अधिक मजबूत पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धूम्रपानावर कुठे बंदी असेल? 

मुले उपस्थित राहू शकतात अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असेल. यात सार्वजनिक उद्याने, समुद्रकिनारे, शाळेचा परिसर, मैदाने, बस आणि ट्राम थांबे, मुले आणि कुटुंबे जिथे एकत्र येतात त्या सर्व ठिकाणी तंबाखूमुक्त क्षेत्र निर्माण करणे हे या धूम्रपान बंदीचे उद्दिष्ट आहे. कॅथरीन वॉट्रिन यांनी सांगितले की, पोलीस ही बंदी लागू करतील, परंतु माझा ‘स्व-नियमन’ यावर विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धूम्रपान बंदी तोडल्यास काय शिक्षा असेल? 

प्रतिबंधित बाह्यक्षेत्रात धूम्रपान केल्यास १३५ युरो म्हणजे जवळपास १३ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. फ्रेंच अधिकारी नवीन नियमांची सक्रियपणे अंमलबजावणी करण्याची योजना आखत आहेत, ज्यामध्ये फलक आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जाणार आहेत.  

धूम्रपान बंदीला अपवाद आहे का?

धूम्रपान बंदीमध्ये दोन अपवाद आहेत. कॅफेच्या बाहेर कॉफी पिताना तुम्ही धूम्रपान करू शकता. तसेच या बंदीमध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट किंवा व्हेप) समाविष्ट नाहीत. इलेक्ट्रॉनिक सिगारेटला सूट असली तरी त्यात असलेल्या निकोटीनच्या प्रमाणावर मर्यादा आणण्यासाठी काम करत असल्याचे फ्रान्सच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्री कॅथरीन वॉट्रिन म्हणाल्या.

फ्रान्समधील धूम्रपानाचे सध्याचे प्रमाण किती? 

फ्रेंच ऑब्झर्व्हेटरी ऑफ ड्रग्ज अँड ॲडिक्टिव्ह बिहेवियर्स या एका संस्थेच्या अहवालानुसार फ्रान्समध्ये धूम्रपान कमी होत आहे. एकूण लोकसंख्येपैकी २३.१ टक्के लोक दररोज धूम्रपान करतात. ही आतापर्यंतची सर्वात कमी टक्केवारी असून २०१४ पासून यात पाच अंकांनी घट झाली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये, २०११ पासून १७ वर्षांच्या मुलांमध्ये दररोज धूम्रपान करण्याचे प्रमाण जवळजवळ १६ टक्क्यांनी कमी झाले आहे. तथापि, व्हेपिंग अधिक सामान्य होत आहे. १७ वर्षांच्या मुलांपैकी ५६.९ टक्के मुलांनी किमान एकदा तरी व्हेपिंगचा प्रयत्न केला आहे. २००८ पासून फ्रान्समध्ये रेस्टॉरंट्स आणि नाइट क्लबसारख्या आस्थापनांमध्ये धूम्रपान करण्यास बंदी आहे. समुद्रकिनारे, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्यासाठी व्यापक उपाययोजना २०२४ मध्ये लागू होणार होत्या, परंतु त्यासाठी आवश्यक असलेली मान्यता कधीही स्वीकारली गेली नाही. तथापि, १,५०० हून अधिक नगरपालिकांनी आधीच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर स्वेच्छेने बंदी घातली आहे आणि फ्रान्समधील शेकडो समुद्रकिनारे अनेक वर्षांपासून धूम्रपानमुक्त आहेत. फ्रान्स कॅन्सर असोसिएशन ‘ला लिग कॉन्ट्रे ले कॅन्सर’च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की, जवळजवळ ८० टक्के नागरिक जंगल, समुद्रकिनारे, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालण्याच्या बाजूने आहेत .

इतर देशांचाही पुढाकार

तंबाखू नियंत्रण उपाययोजना वाढवणाऱ्या देशांच्या यादीत फ्रान्स सहभागी होत आहेच. तसेच स्पेनने अलीकडेच टेरेस, विद्यापीठ परिसर आणि ओपन-एअर नाइट क्लबमध्ये धूम्रपान बंदी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यूके अर्थात ब्रिटनमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल व्हेपवर बंदी घालण्याचा निर्णय घेत आहे आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर आणखी निर्बंध घालण्यावर चर्चा सुरू आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dharmesh.shinde@expressindia.com