ईव्ही अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहनांमधील बॅटरीना आग लागण्याच्या घटना घडत असताना दक्षिण कोरिया सरकारने देशातील कारनिर्मिती कंपन्यांना वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी उत्पादकांची माहिती ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. ईव्हींमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांबाबत ग्राहकांमध्ये असलेली भीती दूर करण्याचा सरकारी यंत्रणांचा प्रयत्न सुरू आहे. दक्षिण कोरियातील भूमिगत वाहनतळावर उभ्या वाहनांना आग लागली. ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल आठ तास अथक प्रयत्न करावे लागले. तज्ज्ञांच्या मते, सरकारने केलेल्या आवाहनानंतर बरेच काही करण्यात येऊ शकते. किंबहुना, ईव्ही बॅटरी उत्पादकांची यादी तयार केल्यास त्यातून कोणाची निवड करायची, हे निश्चित करणे ग्राहकांना अधिक सोयीचे होईल. कारण बॅटरी उत्पादन करणाऱ्या कोणत्या ब्रँडचे उत्पादन अग्निप्रवण आहे, हे शोधणे सोपे होईल. ईव्ही अग्निसुरक्षाविषयक काय काळजी घ्यावी, याविषयीचा हा तपशील.
दक्षिण कोरियात ईव्ही आगीच्या घटना का?
दक्षिण कोरियातील इंटन शहरात एका भूमिगत वाहनतळावर उभ्या असलेल्या मर्सिडिज बेंझ कंपनीच्या ईव्ही कारला अचानक आग लागल्याची घटना १ ऑगस्ट २०२४ रोजी घडली. ईव्ही कारमध्ये फरासिस एनर्जीने तयार केलेल्या बॅटरीचा वापर करण्यात आला होता. मर्सिडिज कारने पेट घेतल्यानंतर काही मिनिटांत आगीचे लोळ वाहनतळावरील इतर १४० वाहनांच्या दिशेने पसरले. यात काही वाहनांचे अंशतः नुकसान झाले. तर काही वाहने जळून खाक झाली. आगीचे उग्र रूप लक्षात घेऊन इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करून तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्या अग्निकल्लोळात काही वाहनांचे केवळ लोखंडी सांगाडे शिल्लक राहिल्याचे दिसत होते. इमारतीतील स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा तातडीने सुरू होऊ न शकल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा घटना टाळण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या.
हेही वाचा >>>Raksha Bandhan 2024:राखीच्या परंपरेमागची ऐतिहासिक कथा; किती सत्य, किती असत्य?
ईव्ही आगीविषयीची माहिती काय दर्शवते?
माध्यमांमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेल्या आगीच्या घटनांचा उल्लेख झाला असला तरी ईव्ही कारला गेल्या काही महिन्यांत आगी लागल्याच्या घटना आढळून आल्या नाहीत. ऑटोइन्शुरन्सईझी या विमा कंपनीने केलेल्या अभ्यासानंतर २०२३ मध्ये प्रसिद्ध अहवालानुसार, अमेरिकेत, विकल्या गेलेल्या १ लाख ईव्ही कारमधील २५ कारच्या बॅटरी या अग्निप्रवण होत्या. पूर्ण इंधनावर धावणाऱ्या १,५३० वाहनांना आग लागली, तर ३,४७५ हायब्रीड (इंधन-बॅटरी) वाहनांनी पेट घेतला. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या विदेचा वापर करण्यात आला. राष्ट्रीय अग्निसुरक्षा संस्थेच्या मते, दक्षिण कोरियात गेल्या वर्षभरात (२०२३) ७२ ईव्ही कारना आग लागली. २०२१ मध्ये ही संख्या २४ इतकी होती. म्हणजे त्यात २०० टक्क्यांनी वाढ झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये उत्पादित दहा हजार ईव्ही कारपैकी एका ईव्ही कारला आग लागली. इंधनावरील कारमध्ये हेच प्रमाण दोनच्या आसपास होते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मते, २०२३मध्ये विक्री झालेल्या पाच कारपैकी एक कार ही विजेवरील अर्थात ईव्ही होती. यात चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये विक्री झालेल्या कारची संख्या १४ दशलक्ष इतकी होती. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या ईव्ही कारचा एकूण आकडा ४० दशलक्ष इतका झाला.
आग नियंत्रणात आणणे कठीण का?
तज्ज्ञांच्या मते, इंधनावर धावणाऱ्या कारमध्ये लागलेली आग आणि ईव्ही कारमध्ये लागलेल्या आगीचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. इंधनावरील कारमध्ये लागलेली आग दीर्घकाळ असते. ती नियंत्रणात आणण्याचे वारंवार प्रयत्न करूनही ती आटोक्यात येत नाही. ईव्ही कारमधील बॅटरी लिथियम-आयन द्वारे कार्यान्वित होतात. या बॅटरीत प्रचंड प्रमाणावर ऊर्जा संचयित होते. एखाद्या वेळी बॅटरी फुटल्यास वा तिच्या रचनेत काही दोष राहिल्यास वा अंतर्गत विजेचा दाब कमी-जास्त झाल्यास आग लागू शकते. ही आग भडकण्याचे मूळ कारण बॅटरीत असणारी प्रचंड उष्णता सामावली न जाऊन ती तीव्र वेगाने बाहेर पडते. बॅटरीतील सेल ही उष्णता सोसू शकत नाहीत. त्यात ज्वलनशील रसायने जसजशी जळत जातील तसा त्यातून ऑक्सीजन बाहेर पडतो. त्यामुळे आग अधिकच भडकते. ही आग काही तास भडकत राहते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा >>>भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली होती? यंदा या विषाणूचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?
कोणते उपाय शोधावे लागतील?
दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. पाच कोटी लोकसंख्येच्या ६० टक्क्यांहून अधिक लोक अपार्टमेंटमध्ये राहतात. यात बहुमजली इमारतींचा समावेश असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. या इमारतींच्या भूमिगत वाहनतळांमध्ये ईव्ही वाहने उभी करून त्यांना चार्जिंग केंद्रातून वीज पुरवली जाते. दक्षिण कोरियातील परिस्थिती इतर देशांहून काहीशी वेगळी आहे. बहुसंख्य ईव्ही कार एकाच वेळी खूप कमी जागेत उभ्या करून त्यांना चार्जिंग पुरवले जाते. त्यामुळे आगीच्या घटनांतून त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे खूपच कठीण होऊन जाते, असे कियांजिल विद्यापीठाच्या अग्निसुरक्षा विभागाचे प्राध्यापक जेगल यांगसून स्पष्ट केले.
जोखीम कशी कमी करता येईल?
अलिकडेच ह्युंदाई मोटार, किया, मर्सिडिज बेंझ आणि फोक्सवॅगन सारख्या कारनिर्मिती कंपन्यांनी बॅटरी पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली आहे. शिवाय बॅटरी निर्मितीच्या वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्तमोत्तम व्यवस्थापन, संभाव्य धोक्याविषयी सतर्क करणारी यंत्रणा आणि वाहनतळावर सुरक्षाविषयक कठोर नियमावली अमलात आणण्यासाठी नियोजन आखण्यात आल्याचे ओसान विद्यापीठातील यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मून हाक हून यांनी सांगितले. ईव्ही बॅटरीची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि कठोर तपासणीनंतर बॅटरींसाठी प्रमाणपत्र देणारी संस्था स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.