इलेक्ट्रिक वाहन कमी वेगाने धावत असताना त्याचा आवाज अतिशय कमी होत असल्याने रस्ता सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून आता देशातील इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना कृत्रिम आवाज मिळणार आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना ॲकोस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टीम (एव्हीएएस) १ ऑक्टोबरपासून बंधनकारक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आगामी काळात इलेक्ट्रिक तीनचाकी आणि दुचाकी वाहनांना ही यंत्रणा बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले जाईल.

नेमकी गरज का?

पेट्रोल आणि डिझेल इंजिन वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज अतिशय कमी असतो. इलेक्ट्रिक वाहनांचा वेग प्रतितास २० किलोमीटरपेक्षा कमी असताना त्यांचा आवाज येत नाही. वेग कमी असल्याने त्यांच्या चाकांचाही फारसा आवाज होत नाही. त्यामुळे रस्त्याने जाणारे पादचारी, सायकलस्वार आणि इतर वाहनचालकांना हे वाहन येत असल्याची पूर्वसूचना मिळत नाही. त्यातून अपघात घडण्याचा धोका निर्माण होतो. याचबरोबर वाहन मागे घेत असतानाही आवाज होत नसल्यानेही अपघाताचा धोका असतो. इलेक्ट्रिक वाहनांना आवाज निर्माण करणारी यंत्रणा बसविण्याची गरज या सर्व बाबीतून निर्माण झाली. विशेषत: शहरी भागात वाहनांची संख्या जास्त असते तिथे त्यांच्यातील अंतर कमी असते. त्यातून मोटारीची पूर्वसूचना न मिळाल्यास अपघाताचा धोका अधिक असतो. या यंत्रणेमुळे हा धोका टळणार आहे. ही यंत्रणा अमेरिका, जपानसह युरोपमधील देशांमध्ये सध्या वापरली जाते. भारतातही जागतिक सुरक्षा नियमांनुसार पावले उचलून ही यंत्रणा बंधनकारक करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवीन नियम काय?

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत गेल्या वर्षी मसुदा जाहीर केला होता. त्यानुसार, नवीन इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना यंदा १ ऑक्टोबरपासून एव्हीएएस यंत्रणा बंधनकारक होणार आहे. त्यामुळे वाहन निर्मिती कंपन्यांना नवीन इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी ही यंत्रणा बसवावी लागेल. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना ही यंत्रणा बसविण्यासाठी १ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत असेल. त्यात प्रवासी मोटारी, बस आणि मालमोटारी यांचा समावेश आहे. काही वाहन निर्मिती कंपन्यांनी या नियमांचे मुदतीआधीच पालन सुरू केले असून, त्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींमध्ये ही यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे.

एव्हीएएस म्हणजे काय?

ॲकोस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टीम (एव्हीएएस) ही यंत्रणा इलेक्ट्रिक आणि हायब्रिड चारचाकी वाहनांसाठी विकसित करण्यात आलेली आहे. या वाहनांचा वेग कमी असताना त्यांचा आवाज येत नाही. त्यामुळे चारचाकी वाहनाचा वेग प्रतितास २० किलोमीटरपेक्षा कमी असताना ही यंत्रणा विशिष्ट आवाज निर्माण करते. त्यातून रस्त्यावरील पादचाऱ्यांसह इतर वाहनांना या वाहनाची पूर्वसूचना मिळते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बसविलेली ही यंत्रणा पेट्रोल आणि डिझेल इंजिन वाहनांप्रमाणे आवाज निर्माण करते. वाहनाच्या वेगानुसार या यंत्रणेतील आवाज कमी आणि जास्त होतो. युरोपमध्ये वाहनाचा वेग प्रतितास २० किलोमीटर असताना या यंत्रणेचा आवाज किमान ५६ डेसिबल ते कमाल ७५ डेसिबल असावा, अशी मर्यादा आहे. त्यातून हा आवाज सहजपणे ऐकू येणारा असला तरी तो गोंगाट निर्माण करणारा नसावा, अशी काळजी घेण्यात आली आहे. याच वेळी काही एव्हीएएस कंपन्यांकडून वेगवेगळे आवाज वापरले जातात. हे आवाज गोंधळ निर्माण करणारे असतात. त्यामुळे एकसमान आवाजाचा नियम लागू करण्यात आला आहे. काही वाहनांमध्ये एव्हीएएस यंत्रणा तात्पुरती बंद करण्यासाठी बटण देण्याचे प्रकार घडले होते. त्यावरही आता बंदी आणण्यात आली आहे.

एआरएआयची भूमिका काय?

इलेक्ट्रिक वाहनांना एव्हीएएस बंधनकारक करण्यामागील भूमिका ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी मांडली. ते म्हणाले की, आता इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांमध्ये अतिरिक्त आवाज करणारी प्रणाली बसविली जाईल. हे वाहन प्रतितास २० किलोमीटरपेक्षा कमी वेगाने जात असेल त्यावेळी ही प्रणाली विशिष्ट आवाज करेल. त्यामुळे पादचाऱ्यांसह आजूबाजूच्या वाहनांना या इलेक्ट्रिक वाहनाची पूर्वसूचना मिळेल. इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांमध्येही ही यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्याबाबत चर्चा सुरू आहे. या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी निर्माण होणारा कृत्रिम आवाज रस्त्यांवरील आवाजापेक्षा वेगळा आणि वैशिष्टपूर्ण असावा, असा प्रयत्न आहे.

sanjay.jadhav@expressindia.com