लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय तरुणीचा पुण्यातील एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुग्धा देशमुख असे या तरुणीचे नाव असून, तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुग्धाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला आणि ती पालकांना कोणतीही माहिती न देता लंडनहून भारतात का परतली, या दोन्ही बाबींचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, मुग्धाचा शोध घेण्यासाठी एका फूड डिलिव्हरी अ‍ॅपची पोलिसांना कशी मदत झाली? जाणून घेऊया…

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा मूळची छत्रपती संभाजीनगरची रहिवासी होती. जुलै २०२५ मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी ती लंडनला गेली होती. तिथे शिक्षण घेत असतानाच ती अर्धवेळ नोकरीही करत होती. लंडनमध्ये असताना मुग्धा नियमितपणे फोनवरून आई-वडिलांच्या संपर्कात होती. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस तिने अचानक फोनला प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.

मुग्धाचे वडील अविनाश देशमुख (वय ६०) हे महापालिकेतील निवृत्त अभियंता आहेत. त्यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी मुग्धाचे आईशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी नोकरीच्या मुलाखतीला जायचे असल्याने आपल्याला घाई असल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यानंतर २४ ऑक्टोबरपासून कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर मुग्धाच्या नातेवाइकांनी लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या निकिता नावाच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. मुग्धाचा २२ ऑक्टोबर रोजी शेवटचा संदेश मिळाल्याचे निकिताने त्यांना सांगितले.

मुग्धा देशमुख भारतात परतल्याचे कुटुंबीयांना कसे समजले?

लंडनमधून बेपत्ता झालेली मुग्धा नेमकी कुठे आहे, याबाबतचे गूढ अधिकच वाढले होते. तिची मैत्रीण निकिता हिने लंडन पोलिसांशी संपर्क साधला. २६ ऑक्टोबर रोजी मुग्धाने ऑगस्ट महिन्यातच ब्रिटन सोडल्याची माहिती पोलिसांनी तिला दिली. ही माहिती मुग्धाच्या कुटुंबीयांसाठी धक्कादायक होती. कारण मुग्धा भारतात परतल्याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती. त्यानंतर कुटुंबीयांनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, मुग्धा नेमकी कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी तिच्या बँक खात्यातील व्यवहार तपासले.

या व्यवहारांवरून ८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान तिने भारतातील विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पेमेंट केल्याचे समोर आले. त्यामध्ये स्विगी आणि झोमॅटो या फूड डिलिव्हरी सेवा, ब्लिंकिट हे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म, बुकमायशो ही तिकीट बुकिंग सेवा आणि मेकमायट्रिप या प्रवासविषयक सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा समावेश होता. या व्यवहारांवरून मुग्धा या कालावधीत भारतात असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर वडिलांनी दाखल केलेल्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

london-returned-girl-found-dead-in-pune-zomato-app-investigation
छत्रपती संभाजीनगर येथील ३४ वर्षीय मुग्धा देशमुखचा पुण्यातील एका फ्लॅटमध्ये संशयास्पद मृतदेह आढळला

झोमॅटोच्या ऑर्डरवरून पोलिसांना मुग्धाचा फ्लॅट कसा सापडला?

मुग्धाच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या नोंदी तपासल्यानंतर पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाचा धागा मिळाला. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण बोराडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, मुग्धाच्या झोमॅटोवरील ऑर्डरच्या नोंदींच्या आधारे ती राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांना मिळाला. मुग्धाने केलेल्या ऑनलाइन पेमेंटच्या अनुषंगाने आम्ही झोमॅटोवरील ऑर्डरची नोंद तपासली. त्यातून पुण्यातील गहुंजे परिसरातील लोढा बेलमोंडो सोसायटीचा पत्ता मिळाला. मुग्धाने याच ठिकाणी खाद्यपदार्थ मागवले होते. बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक किरण बोराडे आणि पोलीस शिपाई विलास कराळे लोढा बेलमोंडो सोसायटीत पोहोचले. गहुंजे परिसरातील ही निवासी सोसायटी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हद्दीत येते.

मुग्धाने एप्रिल २०२६ च्या सुमारास या सोसायटीत एक फ्लॅट भाड्याने घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मात्र, ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अधिकारी संबंधित फ्लॅटपर्यंत पोहोचले. त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. पर्यायी चावीच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर मुग्धाचा मृतदेह आत आढळला. बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मुग्धा गेल्या काही महिन्यांपासून या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समोर आले. पुण्यात वास्तव्यास असताना ती एमबीएच्या विद्यार्थ्यांना काही विषयांचे ऑनलाइन शिकवणी वर्गही घेत होती. मुग्धा प्रामुख्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कुटुंबीयांशी संपर्क साधत होती. या प्रकरणातील तथ्यांची पडताळणी करण्यासाठी तपास सुरू आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुग्धाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, असे बोराडे यांनी सांगितले.

मुग्धा देशमुखच्या मृत्यूचे कारण काय? वैद्यकीय अहवालांची प्रतीक्षा

मुग्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात मुग्धाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. मुग्धाचा अंतर्गत अवयव तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, वैद्यकीय अहवालांची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मुग्धाच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी पोलिसांना वैद्यकीय अहवालांची प्रतीक्षा आहे. यामध्ये राखून ठेवलेल्या तिच्या अंतर्गत अवयवांच्या नमुन्यांच्या तपासणीचाही समावेश आहे. मुग्धा ऑगस्टमध्ये कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता ब्रिटनमधून भारतात का परतली, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. भारतात परतल्यानंतरही ती कुटुंबीयांच्या संपर्कात होती. त्यामुळे तिने भारतात परतण्याचा निर्णय का घेतला, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहेत.