Lord Ganesha 108 names linguistic significance: व्यास महाभारत सांगत होते. त्यांच्या श्लोकपठणाचा वेग इतका प्रचंड होता की, कोणताही लेखनिक त्यांच्या बरोबरीने श्लोक टिपूच शकणार नव्हता. अखेर ते गणपतीकडे गेले. ‘गणांचा अधिपती’ असलेला हा ‘विघ्नहर्ता’ही व्यासांच्या मदतीला तत्परतेने तयार झाला. व्यासांनी ‘कविशा’समोर आपली समस्या मांडली. व्यास म्हणाले, “माझ्या डोक्यात संपूर्ण कथन तयार आहे; पण ते तंतोतंत अर्थासह कागदावर मांडण्याजोगा लेखनिक सापडत नाही.” ‘सिद्धिविनायका’ने व्यासांची महाभारताचे लेखनिक होण्याची विनंती मान्य केली; मात्र, या ‘एकाक्षरा’ने व्यासांपुढे एक अट ठेवली.
‘भालचंद्र’ म्हणाले, “श्लोकांचे पठण सुरू ठेवायचे; त्यामध्ये कोणताही अडथळा येता कामा नये.” मात्र, हा ‘हेरंब’ केवळ लेखनिक नव्हता; त्याला ‘बुद्धिनाथ’ मानले जाते. या ‘बुद्धिविधात्या’ने लगेच पुढची अट सांगितली; म्हणाला, “प्रत्येक ओळ आधी समजून घेईन आणि मगच ती शब्दांत मांडेन.” मात्र, व्यास मुनी माघार घेणाऱ्यातले नव्हते. त्यांनी महाभारताचे कथन करीत असताना त्यातील श्लोक अधिक क्लिष्ट आणि कोड्यात टाकणाऱ्या शैलीत मांडले, जेणेकरून ‘गणराया’ला श्लोक समजून लिहिण्यासाठी वेळ लागेल आणि तेवढा अवधी पुढच्या श्लोकांची रचना करण्यासाठी मिळेल. पण कसलं काय, व्यासांची ही क्लिष्ट भाषिक कोडी कशी लवकर सोडवायची याची या ‘गौरीसुता’ला काडीमात्रही चिंता वाटली नाही; उलट त्याने प्रत्येक अवघड श्लोकाचा अर्थ क्षणात उलगडून, तो लीलया कागदावर उतरवला. महाभारताचे लेखन करीत असताना एक प्रसंग असाही आला जेव्हा ‘ओंकारा’ची लेखणी लिहिता लिहिता तुटली, तेव्हा ‘एकदंता’ने स्वतःचा दात तोडून, त्याचा लेखणी म्हणून वापर केला. हे धाडस, ही बुद्धी, कर्तव्यनिष्ठा अन् त्वरेने निर्णय घेण्याची क्षमता आणि हे सामर्थ्य बघून, त्याला ‘विनायक’ म्हणजेच सर्वश्रेष्ठ नेता असंही संबोधलं गेलं.
तुम्हाला या संपूर्ण कथनातून एक गोष्ट लक्षात आली का? आपल्या लाडक्या गजाननाची असंख्य नावं आहेत. तुम्हाला माहीत आहे का अशी एकूण १०८ नावं गणपतीला लाभली असून, या नावांना अष्टोत्तरशतनामावली, असं म्हणतात. पण, मग एकाच देवाला इतकी नावं का मिळाली असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, मंगलमूर्तीचे स्मरण करीत बाप्पाच्या १०८ नावांचं रहस्य भाषाविज्ञानाच्या चष्म्यातून उलगडून पाहूया…
समानार्थी शब्द खरंच समान अर्थाचे असतात?
आपल्याला शाळेच्या परीक्षेत एक प्रश्न हमखास यायचा – ‘पुढील दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहून वाक्यात उपयोग करा.’ हा प्रश्न परीक्षेत गुण मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी प्रत्यक्षात दोन शब्द तंतोतंत एकाच अर्थाचे असणं भाषेच्या नियमात बसत नाही; ते एकमेकांना केवळ ‘पर्यायी’ शब्द असू शकतात. हे कोडं सोडविताना आपण एक साधं उदाहरण घेऊयात – “आज खूप जोरात पाऊस पडतोय” आणि “आज पाऊस कोसळतोय.” दोन्ही वाक्यं पावसाबद्दलच आहेत; पण ‘कोसळणं’ या शब्दात एक जोर, एक तीव्रता आहे, जी नुसत्या ‘जोरात पडणं’मध्ये जाणवत नाही. आपण कोसळणं हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला फक्त पाऊस जोरात पडतो आहे एवढाच अर्थ मांडायचा नसतो, तर तो जणू आभाळ फाटल्यासारखा पडतोय, हे स्पष्ट करायचं असतं. म्हणजे दोन्ही शब्द पावसाबद्दलच लिहिले गेले असले तरी त्यामधून व्यक्त होणाऱ्या भावनेची तीव्रता भिन्न असते.
असंच आणखी एक उदाहरण घेऊ – “तो रागावला”, “तो चिडला” व “तो संतापला.” तिन्ही वाक्यं एकाच भावनेबद्दलची आहेत; पण त्यांची तीव्रता वेगवेगळी आहे. “रागावणं” सौम्य वाटतं, “चिडणं” यातून थोडी जास्त तीव्रता व्यक्त होते आणि “संतापणं” ऐकताच समोरच्याचा राग किती टोकाला गेलाय हे जाणवतं. आपण योग्य शब्द निवडून नेमकी तीव्रता, नेमकी भावना व्यक्त करतो आणि तीच निवड आपल्याला एकच शब्द वारंवार वापरण्यापासून वाचवते.
आपल्याला पर्यायी शब्द हवेच असतात. कारण – एकच शब्द वारंवार वापरला, तर आपल्या भाषेला एकसुरीपणा येतो. भाषिक छटा दाखविण्यासाठी वेगवेगळे शब्द लागतात. मराठीत तर हे प्रकर्षानं जाणवतं; नुसत्या ‘चालणं’ या क्रियेलाच बघा – ‘रेंगाळणं’, ‘भटकणं’, ‘फिरणं’, ‘वणवण करणं’ प्रत्येक शब्द चालण्याचंच वर्णन करतो; पण प्रत्येकात एक वेगळी भावना, एक वेगळा वेग, एक वेगळं कारण दडलेलं आहे. मराठी भाषा अशा बारीकसारीक भावना टिपण्यात फार समृद्ध आहे आणि गणेशाच्या १०८ नावांकडे बघितलं, तर तिथेही नेमकं हेच घडलेलं दिसतं. आपण या १०८ नावांपैकी काही नावांचा अभ्यास करूया.
एकाच देवाची १०८ नावं कशाला?
गणपतीची १०८ नावं ही त्याची १०८ रूपं दर्शवतात. जर आपण या नावांचं बारकाईनं निरीक्षण केलं, तर ती काही ठरावीक गटांत विभागली जातात. त्यामुळे प्रत्येक गट गणरायाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दाखवतो.
शरीराचं वर्णन करणारी नावं :
- गजानन – ज्याचं आनन (तोंड) गजासारखे (हत्तीसारखे) आहे, असा तो.
- लंबोदर – ज्याचं उदर (पोट) मोठं (लंब) आहे, असा तो.
- एकदंत – ज्याला एक दंत आहे, असा तो
- वक्रतुंड – ज्याचं तुंड (मुख/सोंड) वक्र (वाकडे) आहे, असा तो.
- गजकर्ण – ज्याला गजासारखे (हत्तीसारखे) कर्ण (कान) आहेत, असा तो.
- लंबकर्ण – ज्याचे कर्ण (कान) लंब (लांब/मोठे) आहेत, असा तो.
ही नावं तो कसा दिसतो ते त्याच्या वर्णनातून स्पष्ट करतात. गंमत म्हणजे यातही फरक आहे ‘गजानन’ चेहऱ्याबद्दल बोलतो, ‘गजकर्ण’ फक्त कानांबद्दल, ‘वक्रतुंड’ फक्त सोंडेबद्दल. प्रत्येक नाव शरीराच्या एका विशिष्ट भागाची महती स्पष्ट करून सांगतं.
शक्ती आणि अधिकार दाखवणारी नावं :
- गणपती – गणांचा स्वामी
- विघ्नेश आणि विघ्नहर्ता – विघ्नं दूर करणारा
- महागणपती – सर्वश्रेष्ठ स्वामी
- भुवनपती – संपूर्ण विश्वाचा स्वामी
- सर्वात्मन – सर्वांच्या अंतर्यामी वसणारा
- भूपती – पृथ्वीचा स्वामी
ही नावं तो काय करतो, त्याचा अधिकार किती मोठा आहे, हे विदित करतात. ‘विघ्नेश’ आणि ‘विघ्नहर्ता’ जवळपास सारखेच वाटतात; पण ‘विघ्नेश’ म्हणजे विघ्नांवर अधिपत्य असलेला स्वामी; तर ‘विघ्नहर्ता’ म्हणजे भक्तांच्या मार्गातील विघ्न दूर करणारा, असं मानलं जातं.
बुद्धी आणि ज्ञानाशी संबंधित नावं :
- बुद्धिनाथ – ज्ञानाचा पालनकर्ता
- बुद्धिप्रिय – ज्ञानदाता
- बुद्धिविधाता – ज्ञानाचा देव
- विद्यावारिधी – ज्ञानाचा सागर
- कवीश – कवींचा स्वामी
ही नावं त्याची बुद्धी, त्याचं ज्ञान याबद्दलचं त्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगतात. ज्याच्याकडे व्यासांचे कठीण श्लोकही क्षणार्धात समजून घेण्याची क्षमता आहे अशा त्याला म्हणूनच ज्ञानाचा देव मानलं जातं.
नाती आणि जन्माशी संबंधित नावं :
- गौरीसुत आणि उमापुत्र – पार्वतीचा मुलगा.
- ईशानपुत्र आणि नंदन – भगवान शिवाचा मुलगा.
- स्कंदपूर्वज – कार्तिकेयाचा मोठा भाऊ.
ही नावं तो कुणाचा कोण आहे, त्याची कुटुंबीयांशी नाती काय आहेत, हे उलगडून आपल्याला सांगतात. त्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबातल्या स्थानावरूनही संबोधलं जातं.
गुणांबद्दल बोलणारी नावं :
- मंगलमूर्ती – सर्व शुभ करणारा.
- कृपालु – दयाळू.
- क्षिप्र – लवकर प्रसन्न होणारा.
- सिद्धिदाता – यश देणारा.
- मुक्तिदाता वा मुक्तिदायक – मोक्ष देणारा.
- सिद्धिविनायक – कार्याला यश किंवा सिद्धी मिळवून देणारा श्रेष्ठ नायक
ही नावं त्याच्यामधल्या गुणांविषयी बोलतात. त्याचा स्वभाव, त्याचं भक्तांशी असलेलं नातं यांवर या शब्दांचा भर आहे.
रंग आणि रूपाशी संबंधित नावं :
- धूम्रवर्ण – धुरासारखा (राखाडी/ काळपट) रंग असलेला.
- हरिद्रा – सोनेरी रंगाचा
- कपिल – पिवळसर-तपकिरी रंगाचा.
- रक्त – लाल रंगाचा.
- श्वेत – शुभ्र, पांढऱ्या रंगाचा.
- पीतांबर -पिवळी वस्त्रं परिधान करणारा.
ही नावं वेगवेगळ्या पूजाविधींत, वेगवेगळ्या रूपांत गणेशाची कल्पना कशी केली गेली, हे दर्शवितात. एकाच देवाला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा रंग दिला गेला आणि प्रत्येक रंगाला स्वतःचं एक नाव मिळालं.
हे सहा गट पाहिले, की एक गोष्ट स्पष्ट होते – प्रत्येक नाव एका विशिष्ट कोनातून गणेशाकडे बघतं आणि तो कोन बदलला की, शब्दही बदलतो. आपण जसं मराठीत ‘बघणं’ या क्रियेलाही ‘निरखणं’, ‘टक लावून बघणं’, ‘डोकावणं’, असे वेगवेगळे शब्द देतो, कारण – प्रत्येक शब्द बघण्याची वेगळी पद्धत, वेगळा हेतू सांगतो. त्याचप्रमाणे गणेशाच्या नावांच्या बाबतीतही घडलेलं दिसतं. हे अभ्यासताना लक्षात येतं की, ‘गणपती’ व ‘बुद्धिनाथ’ ही दोन्ही नावं एकाच देवाची असली तरी ती एकमेकांना बदलून वापरता येत नाहीत. जिथे त्याच्या सत्तेबद्दल बोलायचंय, तिथे ‘गणपती’ योग्य आहे. जिथे त्याच्या ज्ञानाबद्दल बोलायचंय, तिथे ‘बुद्धिनाथ’ योग्य आहे. जिथे तो कसा दिसतो हे सांगायचंय, तिथे ‘गजानन’ योग्य आहे.
म्हणूनच गणेशाला ‘एकच नाव’ नाही आणि ती कमतरता नसून, तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. भाषेनं त्याच्याकडे १०० हून अधिक शब्दांद्वारे पाहिलं, प्रत्येक वेळी एक वेगळी बाजू टिपली – कधी त्याचं शरीर, कधी त्याची सत्ता, कधी त्याची बुद्धी, कधी त्याची नाती, कधी त्याचा स्वभाव. जशी मराठी भाषा एका साध्या चालण्याच्या कृतीला किंवा रागावण्याच्या भावनेलाही अनेक शब्दांतून मांडते, तसंच तिनं गणेशालाही अनेक शब्दांतून चितारलं आहे. म्हणूनच व्यासांच्या गोष्टीत गणेश एकाच वेळी गणपती, बुद्धिनाथ, एकदंत व विनायक अशा वेगवेगळ्या नावांतून दिसू शकतो. कारण – ही चार नावं म्हणजे केवळ चार वेगळे शब्द नाहीत, तर ती एकाच ईश्वरी चैतन्याची चार भिन्न नामरूपं आहेत.
आपली मराठी भाषा अशीच शब्दांशी खेळत असते. एकच गोष्ट ती अनेक शब्द अन् अनेक छटा दाखवून सांगत असते. त्यामुळे पुढच्या वेळी गणेशाचं एखादं वेगळं नाव कानावर पडलं, तर ते नुसतं दुसरं नाव आहे, असं समजू नका, तर तो गणेशाकडे बघण्याचा एक नवा कोन आहे, असं समजा!
