Lothal- Harappan Site Accident: गुजरातमधील लोथल या प्रसिद्ध हडप्पाकालीन पुरातत्त्व स्थळावर नुकत्याच घडलेल्या अपघाताने फील्डवर संशोधन करण्यासाठी जाताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. IIT दिल्लीतील २३ वर्षीय संशोधिका सुरभी वर्मा यांचा मातीचे नमुने गोळा करण्यासाठी गेलेल्या खंदकाचा भाग कोसळल्याने २७ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्या सिंधु संस्कृतीवर हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करत होत्या आणि त्यासाठीच मातीचे नमुने गोळा करत होत्या. शिवाय त्यांच्या बरोबर असलेल्या पेलिओक्लायमेट तज्ज्ञ आणि वर्मा यांच्या पर्यवेक्षक डॉ. यामा दीक्षित यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने लोथल या पुरातत्त्व स्थळाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. आजही प्राचीन व्यापार आणि शहरी नियोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोथलचे समृद्ध ऐतिहासिक महत्त्व संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय आहे.

लोथल: एक महत्त्वपूर्ण हडप्पाकालीन पुरातत्त्व स्थळ

दक्षिण आशियातील पहिली नागरी संस्कृती असलेल्या हडप्पा संस्कृतीत लोथल हे साबरमती आणि भोगावो नद्यांदरम्यानच्या गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील महत्त्वाची वसाहत होती. हे स्थळ नैसर्गिक भूभागावर आहे. या शहराला प्राचीन कालखंडापासून वारंवार चिखल आणि विटांच्या मदतीने उंच प्लॅटफॉर्म बांधून पूरापासून संरक्षण दिले गेले. लोथल नावाचे मूळ गुजराती शब्द ‘लोथ’ (मृत) आणि ‘थल’ (टेकडी) यांमध्ये असल्याचे मानले जाते, ज्याचा अर्थ ‘मृतांची टेकडी’ असा होतो. पुरातत्त्वज्ञ सर मॉर्टिमर व्हीलर यांनी त्यांच्या ‘The Indus Civilisation’ या पुस्तकात लिहिले आहे की, “हडप्पा वसाहतीत सरळ रस्ते, शिस्तबद्ध इमारती, स्नानगृह, सविस्तर नाल्यांची व्यवस्था आणि मॅनहोल्स आढळतात, जी सिंधु संस्कृतीची वैशिष्ट्य आहेत.” २०१४ साली लोथलचे नाव युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी प्रस्तावित करण्यात आले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Lothal
लोथल (Wikipedia)

अधिक वाचा: Indus Valley Civilization: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!

लोथलमधील प्रारंभिक उत्खनने

हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (ASI) केलेली प्रारंभिक उत्खनने फारशी चर्चेत आली नव्हती. १९२४ साली ASI चे महासंचालक जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध अधिकृतपणे जाहीर केला. भारतीय स्वातंत्र्यानंतर पुरातत्त्वज्ञ एस. आर. राव यांनी सौराष्ट्र प्रदेशातील हडप्पा शहरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून लोथलचा शोध लागला. १३ फेब्रुवारी १९५५ ते १९ मे १९६० दरम्यान ASI ने येथे उत्खनने केली. सौराष्ट्र आणि सिंधला जोडणाऱ्या प्रमुख व्यापारी मार्गावरील प्राचीन शहर उघडकीस आणले. या स्थळावर भारताच्या पुरातत्त्व इतिहासातील एक मोठा प्राचीन वस्तूसंग्रह सापडला.

जगातील सर्वात जुना गोदी प्रकल्प

लोथलमध्ये अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असलेली जगातील सर्वात जुनी गोदी सापडली. या शोधामुळे तत्कालीन जल- लॉकिंग यंत्रणेबद्दल माहिती मिळते. या स्थळावर मिळालेल्या पुरावस्तूंमध्ये अॅमेथिस्टपासून तयार केलेल्या माळा, तांबे किंवा कांस्यापासून तयार केलेल्या कुऱ्हाडी आणि माशांच्या हाडांपासून तयार केलेली हत्यारे यांसारख्या वस्तूंचा समावेश होतो. लोथलच्या मेसोपोटेमिया, इजिप्त, आणि पर्शियासारख्या प्राचीन संस्कृतींबरोबर सागरी व्यापाराचे संकेत मिळतात. शहराची रचना प्रगत शहरी नियोजनाचे दर्शन घडवते. ज्यात ग्रीड पद्धतीने आखलेले रस्ते, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था, आणि गोदी म्हणून काम करणारे आयताकृती जलाशय इत्यादींचा समावेश होता.

Lothal
लोथल (Wikipedia)

हवामान बदलाचा परिणाम

आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मायनुथच्या संशोधनानुसार ४,५०० वर्षांपूर्वी सिंधु खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे गुजरातसह दक्षिण भागांतील नागरी केंद्रांचे पतन झाले.

अधिक वाचा: Indus Valley Civilization: हडप्पाकालीन लोथल बंदराच्या अस्तित्त्वाचे नवे पुरावे सापडले; काय सांगते नवीन संशोधन?

राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाचा प्रकल्प

केंद्र सरकारने अलीकडेच लोथलमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (National Maritime Heritage Complex) विकसित करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प भारताच्या ४,५०० वर्षे जुन्या सागरी वारशाचा गौरव साजरा करण्यासाठी आहे. या संकुलात एक दीपगृह संग्रहालय, थिएटर, आणि इंटरअॅक्टिव्ह प्रदर्शनांचा समावेश असेल. पूर्ण झाल्यावर हे जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल असेल.

लोथलचे उत्खनन हे केवळ ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत नाही तर भारताच्या प्राचीन नागरी संस्कृतीचा वारसा जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रेरणा देते. म्हणूनच ते नेहमीच अभ्यासकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेले आहे.

Story img Loader