उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या सीमेवरील काही शहरांमध्ये मोठमोठ्या फुग्यांना बांधून कचरा पाठविला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. या कृतीला उत्तर म्हणून दक्षिण कोरियानेही आता एक शक्कल लढवली आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील तंटा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

उत्तर कोरियाने पाठविले होते विष्ठेने भरलेले फुगे

काही आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या दिशेने विष्ठा आणि कचरा भरलेले हजारभर फुगे सोडले होते. या कृतीनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. उत्तर कोरियाच्या याच कृतीला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या सीमेवर लाऊडस्पीकर्स लावून बदला घेतला आहे. या दोन्ही शेजारी देशांमध्ये सध्या एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू झाले आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्याने सोमवारी म्हटले की, उत्तर कोरिया सीमेजवळ स्वतःचे लाऊडस्पीकर लावत असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्याला समजली. लाऊडस्पीकरवरून प्योंगयांगविरोधी प्रचार केल्यानंतर ११ वर्षांमध्ये प्रथमच अशी घटना पुन्हा एकदा घडताना दिसते आहे. दोन्हीही देश आपापले संदेश पाठविण्यासाठी आणि एकमेकांना त्रास देण्यासाठी लाऊडस्पीकर्सचा वापर करीत असल्याने वातावरण चिघळले आहे. दोन्ही बाजूंकडून कधीही लष्करी कारवाईस सुरुवात होण्याची शक्यता असल्याने लोकांना याबाबत अधिक काळजी वाटत आहे.

हेही वाचा : केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या अधिकार आणि कर्तव्यात काय फरक असतो?

लाऊडस्पीकर्सद्वारे लढाई

दक्षिण कोरियाने रविवारी (९ जून) उत्तर कोरियाच्या सीमेवर उत्तर कोरियाविरोधी प्रचार करणारे संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केल्यानंतर या प्रकरणास सुरुवात झाली. लाऊडस्पीकर्सवरून उत्तर कोरिया सरकारविरोधातील बातम्या, टीका आणि तत्सम गोष्टींचा भडिमार केला जात आहे. सोबतच दक्षिण कोरियातील पॉप म्युझिकही लावले जात आहे. थोडक्यात उत्तर कोरियाला डिवचणे आणि त्यांच्या ‘फुगे प्रकरणा’ला जशास तसे उत्तर देणे हे दक्षिण कोरियाचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. दक्षिण कोरियाने आपल्या अपमानाचा अशा प्रकारे वचपा काढल्यानंतर उत्तर कोरिया शांत बसण्याची शक्यता नव्हतीच. काही तासांनंतर उत्तर कोरियानेही या सगळ्या प्रकरणावर प्रत्युत्तर दिले. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाला कडक निर्वाणीचा इशारा दिला. दक्षिण कोरियाची ही कृती अत्यंत धोकादायक अशी परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकते, असे तिने इशारा देताना म्हटले आहे. लाऊडस्पीकर्सद्वारे उत्तर कोरियाविरोधातील प्रसारण असेच सुरू राहिले, तर ‘नव्या’ पद्धतीने प्रत्युत्तर देऊन बदला घेतला जाईल; तसेच दक्षिण कोरियाने आपल्या देशातील नागरिकांना उत्तर कोरियाविरोधातील प्रचार पत्रके सीमेपलीकडील हवेमध्ये उडविण्यापासून रोखावे, असे आवाहन तिने केले आहे. किम यो जोंग यांनी उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांद्वारे हा निर्वाणीचा इशारा देताना म्हटले, “दक्षिण कोरियाने दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण होईल अशा धोकादायक कृती करणे टाळावे, असा निर्वाणीचा इशारा मी देते आहे.”

पार्क संग-हॅक नावाच्या उत्तर कोरियाच्या तावडीतून सुटून आलेल्या एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियातील एका गटाने गेल्या आठवड्यात सीमेपलीकडे १० फुगे पाठविले आहेत. या फुग्यांमध्ये उत्तर कोरियाविरुद्धची प्रचार पत्रके, के-पॉप संगीत आणि कोरियन नाटकांसह पेन ड्राइव्ह व तत्सम साहित्य होते. दक्षिण कोरियातील माध्यमांनी सांगितले की देशातील काही सक्रिय नागरिकांच्या गटाने शुक्रवारी उत्तर कोरियाच्या दिशेने दोन लाख प्रचार पत्रके असलेले फुगे सोडले आहेत. उत्तर कोरियाने दिलेल्या इशाऱ्यावर दक्षिण कोरियातील लष्कराचे प्रवक्ते ली सुंग जून यांनी उत्तर कोरियाकडून अशा प्रकारची शाब्दिक धमकी प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, काही घडल्यास आपणही प्रत्युत्तर देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. हल्ला झाल्यास सैनिकांना पुरेसे संरक्षण मिळेल, अशाच ठिकाणी उत्तर कोरियाविरोधी प्रचार लाऊडस्पीकर्सवरून केला जात आहे. “ते आम्हाला इतक्या सहजासहजी चिथावू शकतील, असे आम्हाला वाटत नाही”, असेही ली यांनी सोमवारी (१० जून) म्हटले. किम यो जोंग यांनी असा दावा केला की उत्तर कोरियाने गेल्या आठवड्याच्या शेवटी ७.५ टन कचरा दक्षिण कोरियाच्या दिशेने पाठविण्यासाठी १,४०० फुगे पाठविले होते. त्यानंतर असे फुगे पाठविणे बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार होता. इतक्यात, दक्षिण कोरियाने लाऊडस्पीकरवरून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता आम्ही आणखी फुगे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : लोकसभा अध्यक्षांचे अधिकार काय असतात? भाजपा आणि मित्रपक्षांसाठी हे पद इतके महत्त्वाचे का आहे?

कुरापतींचा जुना इतिहास

दोन्ही कोरियन देशांमध्ये अशा प्रकारचा तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्ये याआधीही एकमेकांना डिवचण्यासाठी फुगे पाठविणे वा लाऊडस्पीकर लावणे यांसारख्या कृती केल्या गेल्या होत्या. १९५० च्या दशकात कोरियाचे विभाजन होऊन उत्तर आणि दक्षिण कोरिया, असे दोन तुकडे पडले; तेव्हाही दोन्ही देशांमध्ये फुगे पाठविण्याचा प्रकार घडला होता. तेव्हा एकमेकांच्या देशात फुग्याद्वारे प्रचार साहित्य पाठविले जात होते. मात्र, यावेळी उत्तर कोरियाकडून कचऱ्याचे ढीग पाठविले जात आहेत. उत्तर कोरियाचे उपसंरक्षणमंत्री किम कांग इल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, आम्ही दक्षिण कोरियाच्या सीमेत इतका कचरा टाकू की, तो स्वच्छ करताना त्यांना नाकीनऊ येतील. मगच त्यांना चांगली अद्दल घडेल.