scorecardresearch

Premium

विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

Hitler’s pencil मृत्यूपूर्वी ४० तास आधी छोट्या घरघुती सोहळ्यात हिटलरने इवाशी लग्नगाठ बांधली. अंतिम क्षणी हिटलरने इवाला बर्लिनला न येण्याचा सल्ला दिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत हिटलर सोबत तिने राहण्याचा निर्णय घेतला होता.

History is hidden in Hitler's pencil ! Who was the lover of this dictator?
हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुशाहाची प्रेयसी? | (प्रतिमा आभार : अमेय येलमकर, लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

ब्लूमफिल्ड ऑक्शन्स हाऊसमार्फत अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या एका पेन्सिलचा लिलाव ६ जून रोजी म्हणजेच आज करण्यात येणार आहे. ही पेन्सिल पांढऱ्या रंगाच्या धातूत असून ८.५ सेमी इतकी लांब आहे, तसेच या पेन्सिलवर चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. या पेन्सिलच्या विद्यमान मालकाने २००२ साली एका लिलावात या पेन्सिलची खरेदी केली होती आणि तेव्हापासून ही पेन्सिल त्याच्याच कुटुंबात होती. आज होणाऱ्या लिलावामध्ये या पेन्सिलसाठी ८०,००० GBP इतकी किंमत अपेक्षित आहे. या पेन्सिल सोबत कटलरी साहित्य व काही फ़ोटोंचाही या लिलावात समावेश करण्यात येणार आहे.

हिटलरच्या वस्तू व वाद

हिटलरची प्रतिमा ही जगप्रसिद्ध आहे. अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या हिटलरवर ज्यूंचा विशेष राग आहे. जर्मनीतील हजारो ज्यूंच्या निर्घृण हत्येसाठी व स्थलांतरणासाठी हिटलर कारणीभूत होता. त्यामुळे आजही त्याच्याशी संबंधित, त्याच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या साहित्याचा, प्रसंगाचा ज्यूंकडून निषेध करण्यात येतो. असेच काहीसे त्याच्या वस्तूंच्या लिलावासंदर्भात आढळून येते. अमेरिकेतील अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन्स हाऊसने गेल्या वर्षी हिटलरच्या अनेक वस्तू लिलावात विकल्या, ज्यात त्याच्या ‘अँड्रियास ह्युबर रिव्हर्सिबल’ घड्याळाचा समावेश होता. हे घड्याळ १.१ दशलक्ष इतक्या मोठ्या किमतीला विकले गेले. एका खुल्या पत्रात युरोपियन ज्यू असोसिएशनने ही विक्री रद्द करण्याची मागणी केली होती. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे हा लिलाव कळत नकळत हिटलरच्या विचारांना प्राधान्य देणाऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर पेन्सिलच्या होणाऱ्या या लिलावाकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

आणखी वाचा: विश्लेषण: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ?

ही पेन्सिल महत्त्वाची का?

हिटलरने स्वतःचे वैयक्तिक आयुष्य जगासमोर कधीच स्वतःहून आणले नाही. त्याच्या आयुष्यातील जोडीदारांविषयी त्याने नेहमीच गुप्तता पाळली. त्यामुळेच अनेकांनी तो समलिंगी असल्याचाही आरोप केला आहे. परंतु बहुसंख्य इतिहासकारांनी तो ‘हेट्रोसेक्शुअल’ असल्याचेच मान्य केले आहे. त्याच्या या नात्यातील गुप्ततेमुळे दुसरे महायुद्ध संपुष्टात येईपर्यंत त्याच्या आयुष्यात जवळचे कोणी होते या विषयी खुद्द जर्मन मंडळीही अनभिज्ञ होते. त्याने आपले संपूर्ण आयुष्य जर्मनीच्या राष्ट्रवादासाठी वाहिल्याचीच समजूत सर्वसामान्यांमध्ये किंबहुना त्याच्या शत्रूंमध्येही रूढ होती. परंतु त्याच्या मृत्यूच्या अखेरच्या क्षणाने संपूर्ण जगाला त्याच्या जवळच्या व्यक्तीची ओळख करून दिली. ही व्यक्ती ‘इवा ब्रॉन’होती. म्हणूनच तिचे आणि हिटलरचे नाते नेमके कसे होते, हे सांगणारा पुरावा म्हणून या पेन्सिलकडे पहिले जात आहे. अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या ५२ व्या वाढदिवसाला म्हणजेच २० एप्रिल १९४१ रोजी ‘इवा ब्रॉन’या त्याच्या त्यावेळच्या मैत्रिणीकडून व मृत्युसमयीच्या पत्नीकडून ही पेन्सिल भेटवस्तू म्हणून देण्यात आली होती. ही या पेन्सिलच्या एका बाजूला “इवा” तर वरच्या बाजूला “AH” ही आद्याक्षरे कोरलेली होती. AH म्हणजे Adolf Hitler. ब्लूमफिल्ड ऑक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल बेनेट यांनी वृत्तपत्रांशी संवाद साधताना सांगितले, ”हिटलरच्या नावाची आद्याक्षरे कोरलेल्या या पेन्सिलमुळे इतिहासाच्या एका अनभिज्ञ पैलूविषयी जाणण्यास मदत होते. या पेन्सिलच्या माध्यमातून हिटलरच्या वैयक्तिक नातेसंबंधांची माहिती मिळते. यातून लोकांपासून लपवून ठेवलेल्या हिटलरचा इतिहास कळतो. त्यांनीच नमूद केल्याप्रमाणे हिटलर याचे रूप जर्मनीचा हुकूमशहा असेच आहे. किंबहुना त्याच प्रतिमेसाठी त्याने वैयक्तिक नातीही लांब ठेवली होती. परंतु त्याच्या ५२ व्या वर्षी इवा यांनी दिलेल्या पेन्सिलच्या स्वरूपात त्याच्या या हळव्या बाजूविषयी समजण्यास मदत होते.”

कोण होती इवा ब्रॉन?

इवा ही एक जर्मन छायाचित्रकार होती. तिची व हिटलरची ओळख म्युनिकमध्ये १९२९ साली झाली. हिटलर व इवा या दोघांमध्ये तब्बल २३ वर्षांचे नंतर होते. इवा ही हिटलरचा वैयक्तिक छायाचित्रकार आणि नाझी राजकारणी हेनरिक हॉफमन याची सहाय्यक म्हणून वयाच्या १७ व्या वर्षांपासून काम करत होती. हिटलर व इवा या दोघांना फारच कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी पाहिले गेले होते. १९३६ सालच्या हिवाळी ऑलिंम्पिकमध्ये त्यांच्या सोबतचा एकमात्र प्रकाशित फोटो होता. हिटलरच्या आयुष्यात इवा हिच्यापूर्वी ‘गेली रौबल’ होती, त्यांचे नाते नेमके काय होते, याविषयी इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही. १९३१ साली ‘गेली’ हिने हिटलरच्याच बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर हिटलरची जवळीक इवाशी वाढली. हिटलरचे इवाशी १४ वर्ष संबंध होते. सामाजिक स्तरावर हिटलर व इवा यांचे संबंध उघड नसले तरी खाजगी वर्तुळात हिटलर इवा बद्दल उघड बोलत असे, असे इतिहासकार नमूद करतात.

इवा आणि हिटलरचे संबंध

इवाच्या डायरीच्या मदतीने इवाचे व हिटलरचे संबंध कशा प्रकारचे होते, हे समजण्यास काही प्रमाणात मदत होते. तिने केलेल्या नोंदीनुसार तिने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अभ्यासकांच्या मते हे आत्महत्येचे प्रयत्न गंभीर नसून फक्त हिटलरचे लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात आले होते. इवाने १९३२ साली आपल्याच वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर तिचे व हिटलरचे संबंध अधिक दृढ झाल्याचे इतिहासकार मानतात. दुसरा प्रयत्न हिटलर वेळ देत नव्हता म्हणून १९३५ साली औषधांचे अतिरिक्त प्रमाण घेवून तिने केला होता. यानंतर हिटलरने तिच्यासाठी विकत घेतलेल्या, बांधलेल्या घरांच्या नोंदी उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या निवासस्थानी त्याच्या खोलीच्या शेजारीच तिची खोली असे. इवाचा प्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप हिटलरच्या कामात नव्हता. ती नाझी पक्षाच्या कामात सक्रिय नव्हती. हिटलरच्या कामाच्या अनेक सल्ला मसलती त्याच्या खोलीत घडत असत. म्हणूनच त्याची व तिची खोली वेगळी होती. तरीदेखील इवाने काही काळासाठी हिटलरच्या सेक्रेटरीचे काम केले होते, हे केवळ त्याच्या जवळ राहता यावे यासाठी केलेली तडजोड मानली जाते. या खेरीज इवा हिच्यावर Görtemaker, Heike यांनी लिहिलेल्या Eva Braun: Life with Hitler या पुस्तकात इवा व हिटलर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे. या संदर्भानुसार हिटलर इवा हिच्यासोबत सायंकाळी वेळ घालवत असे. सायंकाळाचा चहा हा नेहमी तिच्या सोबत घेत असे. कधी तिला तिच्या खेळाच्या ठिकाणाहून चहासाठी येण्यास उशीर झाल्यास तो तिच्याविषयी काळजी व्यक्त करत असे. झोपण्यापूर्वी त्याच्या अभ्यासाच्या खोलीत ते एकत्र वाचनात व चर्चेत वेळ घालवत असत. यावरूनच त्यांच्यात जोडीदारांसारखे संबंध होते हे कळते.

आणखी वाचा: विश्लेषण: लुटारू ब्रिटिश(?): राजघराण्यानेच घातला होता दरोडा !

हिटलर आणि इवा यांचे लग्न

ऐतिहासिक संदर्भानुसार शेवटच्या क्षणी हिटलर व इवा यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी ४० तास आधी छोट्या घरघुती सोहळ्यात हिटलरने इवाशी लग्नगाठ बांधली. पश्चिमी मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर कूच केल्यावर, अंतिम क्षणी हिटलरने इवाला बर्लिनला न येण्याचा सल्ला दिला होता. किंबहुना त्याच्या मृत्यूपत्रात तिच्या नावावर संपत्ती ठेवण्यात आली होती. परंतु इवाने म्युनिक ते बर्लिन असा प्रवास करून बर्लिनमधील फ्युहररबंकर येथे हिटलरची भेट घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत हिटलर सोबत तिने राहण्याचा निर्णय घेतला होता. याच तिच्या परतीनंतर त्याने तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नसोहळ्याचे साक्षीदार जोसेफ गोबेल्स आणि मार्टिन बोरमन होते. त्यांच्या लग्नाच्या कागदपत्रावर इवाने ‘इवा हिटलर अशी सही केली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी इवा हिटलरने विष प्राशन करून जीवन संपवले; आणि तिच्या पतीने स्वतःवर गोळ्या झाडून तिच्या शेजारी देह ठेवला. त्यानंतर त्यांचे मृतदेह ठरल्याप्रमाणे जाळण्यात आले. त्यांच्यातील नातेसंबंधांना या पेन्सिलने नवा उजाळा दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 10:30 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×