LPG Consumption Data In India Explained: मध्य पूर्वेतील संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिका- इस्रायलच्या इराणविरोधातील युद्धाला आता १७ दिवस झाले असून, या संघर्षाचा इंधन तुटवड्याच्या रुपाने मोठा फटका जगाला बसत आहे. होर्मुझ सामुद्रधानी जवळपास बंद असल्याने गॅस आणि इंधनाची टंचाई भारतासह इतर देशांना भेडसावत आहे. द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (LPG) वापराच्या आकडेवारीतून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ (PMUY) अंतर्गत सर्वाधिक लाभार्थी ज्या राज्यांमध्ये आहेत (जे मुख्यत्वे ग्रामीण भागातील आहेत), त्या राज्यांमध्ये एलपीजीचा एकूण वापर सर्वाधिक आहे. मात्र, शहरी लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांच्या तुलनेत अशा राज्यांमधील प्रत्येक कुटुंबाचा महिन्याचा सरासरी वापर मात्र कमी असल्याचे दिसून येते.

तीन दशकांत एलपीजी वापरात सहा पटीने वाढ

‘पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल’ (PPAC) च्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन दशकांत भारतातील एकूण एलपीजी वापरामध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. १९९८-९९ मध्ये ४४६ टीएमटी (हजार मेट्रिक टन) असलेला वापर २०२५-२६ मध्ये २,७५४ टीएमटीपर्यंत पोहोचला आहे.

२००० आणि २०१० च्या दशकात एलपीजी वापराचा दर सर्वाधिक (वार्षिक ८ ते ११ टक्के) होता. २०१६-१७ मध्ये, गरीब आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना मोफत गॅस जोडणी आणि अनुदानित सिलिंडर देणाऱ्या उज्ज्वला योजना सुरु झाल्यानंतर, एलपीजी वापरामध्ये १०.१ टक्के एवढी मोठी वाढ झाली. मात्र, २०२० पासून एलपीजी जोडण्यांचे प्रमाण मंदावले.

ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी पारंपरिक इंधनाचा वापर

ग्रामीण भागात यापूर्वी स्वयंपाकासाठी लाकूड आणि शेणकुटासारख्या पारंपरिक इंधनाचा वापर केला जात होता. पण, उज्ज्वला योजनेनंतर ग्रामीण भागात एलपीजीचा वापर वाढला. लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरानुसार, “२०२४ अखेरपर्यंत उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी ८० टक्के लाभार्थी ग्रामीण भागातील होते.”

सध्याच्या घडीला, भारतात एकूण ३३.३७ कोटी एलपीजी ग्राहक असून त्यापैकी १०.५६ कोटी उज्ज्वला योजनेचे ग्राहक आहेत. डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, मुख्यत्वे ग्रामीण आणि गरीब राज्यांमध्ये एलपीजी ग्राहकांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. एकट्या उत्तर प्रदेशात ४.८७ कोटी एलपीजी ग्राहक असून त्यापैकी १.८८ कोटी उज्ज्वला लाभार्थी आहेत, हे प्रमाण भारतातील १५ टक्के एवढे आहे.

कोणत्या राज्यात किती एलपीजी ग्राहक

राज्यएलपीजी ग्राहक संख्या
उत्तर प्रदेश४.८७ कोटी
महाराष्ट्र३.२ कोटी
पश्चिम बंगाल२.७२ कोटी
तामिळनाडू२.४ कोटी
बिहार२.३३ कोटी
कर्नाटक१.९ कोटी

उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यानुसार ग्राहकांची संख्या

राज्यउज्ज्वला योजनेचे ग्राहक
उत्तर प्रदेश१.८८ कोटी
पश्चिम बंगाल१.२४ कोटी
बिहार१.१८ कोटी
मध्य प्रदेश८९ लाख
राजस्थान७४.३ लाख

या सर्व राज्यांमध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण लक्षणीय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारताची ६९.८ टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे. पण, बिहारमध्ये ८८.७ टक्के आणि उत्तर प्रदेशात ७७.७ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.

शहरी भागात सिलिंडरचा वापर अधिक

महिन्यासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या सरासरी गॅस वापराचे विश्लेषण केल्यास शहरात ग्रामीण ग्राहकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात गॅसचा वापर केला जातो, असे दिसून येते. उदाहरणार्थ, दिल्लीसारख्या शहरी भागात महिन्याचा सरासरी वापर ११.४ किलो आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तो अनुक्रमे ६.७ किलो आणि ७.७ किलो ( म्हणजेच अर्ध्या सिलिंडरपेक्षा कमी) इतकाच असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातील कुटुंबांकडे गॅस जोडण्या असल्या तरी, ते एका सिलिंडरचा वापर अधिककाळासाठी करतात, सोबतच इतर पारंपरिक इंधनांचाही वापर करतात. पण, शहरी भागात अनेकजण पूर्णपणे एलपीजीवर अवलंबून असल्याने त्यांचा वापर अधिक केला जातो.

दरडोई उत्पन्नाशीही सिलिंडर वापराचा संबंध

एलपीजी सिलिंडर वापराचा संबंध दरडोई उत्पन्नाशीही जोडला असल्याचे दिसते. श्रीमंत राज्यांमधील कुटुंब गरीब राज्यांच्या तुलनेत अधिक एलपीजी वापरतात. उत्तर प्रदेश राज्याचा एकूण वापर ३७७.४ ‘टीएमटी’सह देशात सर्वाधिक असला, तरी प्रति कुटुंब वापराच्या बाबतीत हे राज्य देशात २२ व्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांची स्थितीही अशीच आहे; या राज्यांचा एकूण वापर मोठा असला तरी प्रति कुटुंब सरासरी वापर मात्र देशात सर्वात कमी आहे.