LPG Biometric Authentication Process : एलपीजी ग्राहकांना रिफिल भरण्यासाठी आता आणखी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण नाही केली, तर अनुदानित दरात एलपीजी सिलिंडर मिळणार नसल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ पासून घरगुती एलपीजी (LPG) ग्राहकांना अनुदानित दरात सिलिंडरचा रिफिल घेण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या या नव्या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ही अतिरिक्त प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

पण, हे ऑथेंटिकेशन नेमकं कसं करायचं? मोबाईलवरून ते करता येतं का, कोणाला यात सवलत मिळणार आहे आणि ऑथेंटिकेशन केलं नाही, तर सिलिंडर मिळणार नाही का? जाणून घेऊया…

एलपीजी सिलिंडरसाठी नवा नियम काय?

घरातला गॅस सिलिंडर बुक करताना आता आधार ऑथेंटिकेशन पूर्ण आहे की नाही, हेही महत्त्वाचं ठरणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग आणि सबसिडीबाबत नवे नियम लागू करणार आहे.

या नियमानुसार, सरकारच्या सबसिडीसह नियंत्रित दरात एलपीजी सिलिंडरचा रिफिल घ्यायचा असेल, तर बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (BAA) पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजेच सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सोबतच सरकारनं सिलिंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमातही बदल केला आहे. आता शहर असो किंवा गाव, सर्व ग्राहकांना आधी सिलिंडर बुक केल्यानंतर २५ दिवसांनीच पुढचा सिलिंडर बुक करता येणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांचा तात्पुरता कालावधी निश्चित केला गेला होता; पण आता शहर आणि गावांसाठी समान नियम लागू करण्यात येत आहेत.

कोणाला पुन्हा ऑथेंटिकेशन करावं लागणार नाही?

सरकारने याआधी घेतलेल्या ई-केवायसी मोहिमेत सुमारे ८९.८ टक्के म्हणजेच २७.४३ कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांची पडताळणी आधीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे या ग्राहकांना आता पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणेच सिलिंडर बुकिंग सुरू राहणार आणि सबसिडीचा लाभ घेता येणार आहे.

मात्र, घरगुती ग्राहकांना ई-केवायसीमधून कायमची सूट देण्यात आलेली नाही. देशातील सर्व घरगुती एलपीजी जोडणीची पडताळणी करून बनावट किंवा दुबार कनेक्शन आणि व्यावसायिक सिलिंडरच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरण न केल्यास काय होणार?

बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तुमचे एलपीजी गॅस बुकिंग लगेच बंद होणार नाही. मात्र, तुमच्या खिशाला याचा फटका बसू शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने नमूद केले की, आधार प्रमाणीकरण न केलेल्या ग्राहकांना अनुदानित दरात सिलिंडर मिळणार नाही. अशा ग्राहकांना बाजारातील व्यावसायिक दरानेच गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.

त्याशिवाय आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या काही जोडण्यांवर तेल कंपन्या मर्यादा घालू शकतात. उदाहरणार्थ- नेहमीचा १४.२ किलोचा सिलिंडर बुक करण्याऐवजी फक्त पाच किंवा १० किलोचा सिलिंडर बुक करण्याची परवानगी मिळू शकते. त्यामुळे सबसिडीचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं असणार आहे. ज्या ग्राहकांना काही कारणामुळे आधार प्रमाणीकरण करणे शक्य झालं नाही, तर त्यासाठी वेब पोर्टल, मोबाईल अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट किंवा आयव्हीआरएस यांसारख्या माध्यमांचा वापर करता येणार आहे. मात्र, अशा ग्राहकांना सबसिडीचा लाभ मिळणार नाही. त्यांना उपलब्धतेनुसार पाच किंवा १० किलोचा एलपीजी सिलिंडर बाजारभावाने लागेल.

आधार प्रमाणीकरण कसं करायचं?

आधार प्रमाणीकरणासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. बायोमेट्रिक ई-केवायसी तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनही करू शकता किंवा गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना आणि गॅस एजन्सीत जाऊनही पूर्ण करू शकता.

दारात येणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यामार्फत : बुक केलेला सिलिंडर घरी आल्यानंतर डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याकडूनही तुम्ही आधार प्रमाणीकरण करून घेऊ शकता. त्यांच्याकडील डिव्हाइसवर तुमची फिंगरप्रिंट किंवा इतर आवश्यक बायोमेट्रिक तपशील भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

गॅस एजन्सीमार्फत : तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीत जाऊनही ही प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि आपली माहिती सोबत घेऊन जा. तिथे फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन (डोळ्यांचे स्कॅनिंग) करून प्रमाणीकरण पूर्ण केलं जाणार आहे.

घरबसल्या मोबाईलवर : तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर गॅस एजन्सीत जाण्याचीही गरज नाही. फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून मोबाईलवरून ई-केवायसी करता येणार आहे. त्यासाठी आधी प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरून Aadhaar FaceRD हे UIDAIचं अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल.

त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचं अ‍ॅप डाऊनलोड करा. इंडेनच्या ग्राहकांनी IndianOil ONE, भारत गॅसच्या ग्राहकांनी HelloBPCL आणि एचपीच्या ग्राहकांनी HP PAY अ‍ॅप वापरून बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करावे.

अ‍ॅपमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा. त्यानंतर ई-केवायसी किंवा आधार ऑथेंटिकेशन हा पर्याय निवडा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार चेहऱ्याचं स्कॅन पूर्ण करा. अशा प्रकारे घरबसल्या तुम्हाला ऑथेंटिकेशनची प्रक्रिया करता येणार आहे.