भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर संचलन पार पडले. भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत सहभागी लढाऊ विमानांचे सादरीकरण केले. त्यात हवाई दलाच्या सात विमानांचा सहभाग होता. दोन राफेल, दोन सुखोई-३०, दोन मिग -२९ आणि एका जॅग्वार लढाऊ विमानाने सादरीकरणात सहभाग घेतला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलाच प्रजासत्ताक दिवस भारतीय हवाई दलाने अनोख्या प्रकारे साजरा केला. तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात DRDO ने विकसित केलेल्या क्षेपणास्त्र व युद्ध सामग्रीचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. त्यात भारतीय नौदलासाठी विकसित करण्यात आलेल्या अश्म क्षेपणास्त्राचा पहिल्यांदाच जगाला परिचय करून देण्यात आला. अश्म क्षेपणास्त्र हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. अश्म क्षेपणास्त्रामुळे भारतीय नौदलाच्या शक्तीत भर पडणार आहे. सागरी किनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदल अश्म क्षेपणास्त्रासह सज्ज होणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञान तसेच साहित्यांचा वापर करून बनवण्यात आलेले अश्म क्षेपणास्त्र काय आहे ? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? ते जाणून घेऊयात.
LR-AShM : अश्म क्षेपणास्त्र काय आहे ?
अश्म क्षेपणास्त्र हे एक ‘हायपरसॉनिक ग्लाइड मिसाईल’ आहे. भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात DRDO ने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने समुद्रात दूरवर असलेल्या शत्रूच्या जहाजांना तसेच कोणत्याही प्रकारच्या युद्धनौकांना उद्ध्वस्त करता येणार आहे. भारताला मोठ्या प्रमाण सागरी किनारा लाभला आहे. या सागरी किनाऱ्यांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी DRDO कडून एलआर-अश्म म्हणजेच ‘लाँग रेंज अँटी-शिप हायपरसॉनिक मिसाईल’ हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाला मिळणार आहे.
अश्म क्षेपणास्त्राची ‘रेंज’ किती ?
समुद्रात १५०० किमी दूरवर असलेल्या शत्रूच्या युद्धनौकांना तसेच जहाजांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता अश्म क्षेपणास्त्रात आहे. कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात अश्म क्षेपणास्त्राचे लाँचरही दाखवण्यात आले. वेगवेगळ्या वजनाची स्फोटके (पेलोड) वाहून नेण्याची क्षमता अश्म क्षेपणास्त्रात विकसित केली जात आहे. हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा दहापट (माक १०, Mach 10) असतो. तसेच त्याचा सरासरी वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक आहे.
अश्म क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
अश्म क्षेपणास्त्रात खूप कमी उंचीवरून उडण्याची क्षमता आहे. तसेच त्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना टाळून हे क्षेपणास्त्र नियोजित ठिकाणी अचूकपणे मारा करते. शत्रूच्या जहाज, युद्धनौकांमध्ये असलेल्या रडार यंत्रणेला चकवा देणारे तंत्रज्ञान या क्षेपणास्त्रात आहे. त्याचा वेग प्रचंड असल्याने ते शत्रूच्या जहाजांमध्ये असलेल्या रडार यंत्रणेला चकवा देते. त्यामुळे अश्म क्षेपणास्त्राचा अंदाजच शत्रूच्या युद्धनौकांना येत नाही. अश्म क्षेपणास्त्र सुमारे १५०० किमीचे अंतर फक्त १५ मिनिटांत गाठू शकते. त्यामुळे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर फक्त १५ मिनिटांत शत्रू जहाज अथवा युद्धनौका भस्म होऊ शकते. अश्म क्षेपणास्त्राची क्षमता ३५०० किमीपर्यंत वाढवण्यासाठी DRDO चे शास्त्रज्ञ सध्या दिवसरात्र कष्ट करत आहेत. भारतीय हवाई दल, भूदल व नौदल या तिन्ही दलांना वापर करता येईल, अशा प्रकारे अश्म क्षेपणास्त्राला विकसित केले जात आहे.
“शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या युद्धनौकेला लक्ष्य करता येणार”
DRDO च्या एका शास्त्रज्ञाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली आहे. ते म्हणाले, “अश्म क्षेपणास्त्राने हिंदी महासागरात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मदत होणार आहे. भारतीय सैन्यदल, हवाईदल आणि नौदल या तिन्ही दलांसाठी या क्षेपणास्त्राला विकसित केले जात आहे. समुद्रातील दळणवळणावर तसेच शत्रूकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अडथळ्यांवर वचक ठेवण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जाईल. कोणत्याही प्रकारची युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे (ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक वेग – माक ५) असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताला या क्षेपणास्त्राने महत्वाचे स्थान मिळणार आहे.”
हायपरसॉनिक तंत्रज्ञान
अश्म क्षेपणास्त्राची ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम या बेटावरून १६ नोव्हेंबर २०२४ रोजी यशस्वीपणे चाचणी करण्यात आली होती. पुढील दोन ते तीन वर्षात हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु, त्याआधी या क्षेपणास्त्राला DRDO कडून आणखी विकसित केले जात आहे. त्यात सबमरीन बॅलेस्टिक मिसाईल सागरिका व ब्रह्मोस हायपरसॉनिक क्षेपणास्त्रासाठी वापरलेल्या काही घटकांचा समावेश केला जाणार आहेत. DRDO सध्या हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे. हायपरसॉनिक ग्लाइड आणि हायपरसॉनिक क्रूज या दोन प्रकारच्या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाला विकसित करण्यासाठी DRDO चे शास्त्रज्ञ मेहनत घेत आहेत. अश्म क्षेपणास्त्र हे हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रात भारतीय बनावटीचे साहित्य तसेच कंट्रोल सिस्टिम वापरण्यात आली आहे. हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांमध्ये स्क्रॅमजेट इंजिनचा वापर केला जातो. हे इंजिन क्षेपणास्त्राला गती तसेच त्यात येणाऱ्या अडथळ्यांना टाळण्याचे काम करते.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?
आवाजापेक्षा पाच पटींहून अधिक (माक-५) वेगाने क्षेपणास्त्रे शत्रूच्या दिशेने झेपावतात. मात्र, काही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे १५ ‘माक’हून अधिक वेगाने जातात. पारंपरिक शस्त्रांबरोबरच अण्वस्त्रेदेखील या क्षेपणास्त्रांमधून डागता येतात. हायपरसॉनिक शस्त्रप्रणालीचे दोन प्रकार आहेत. हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल (एचजीव्ही) आणि हायपरसॉनिक क्रूज मिसाइल्स (एचसीएम). ‘एचजीव्ही’ रॉकेटमधून, तर ‘एचसीएम’ हे अतिवेगाच्या इंजिनच्या किंवा ‘स्क्रॅमजेट’च्या सहाय्याने उडते.
