What Are REM Sleep and Lucid Dreaming?: स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी… सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी… जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या सुंदर गीतात नायिकेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेमात बुडालेल्या नायिकेला संपूर्ण जगच स्वप्नवत वाटत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात झोप खूप महत्त्वाची आहे आणि स्वप्न त्या झोपेचा अविभाज्य भाग आहे. खरंतर वरील गीतातील स्वप्न नायिका जागेपणी पाहत आहे. परंतु, झोपल्यावर पडणार्‍या स्वप्नांचे काय? विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर स्वप्न म्हणजे झोपेत आपल्या मनाने अनुभवलेलं एक आभासी जग. झोपेत, विशेषतः REM अवस्थेत, मेंदू आठवणी, भावना, विचार, भीती, इच्छा आणि दिवसभरातील अनुभव यांचे वेगवेगळे तुकडे एकत्र करून दृश्ये किंवा कथांसारखे अनुभव निर्माण करतो; त्यालाच आपण स्वप्न म्हणतो. याशिवाय,‘स्वप्न’ या शब्दाचा आणखी एक सुंदर अर्थ म्हणजे जागेपणी आपण भविष्याबद्दल पाहिलेली आशा, इच्छा किंवा ध्येय हेदेखील स्वप्नच. म्हणूनच स्वप्न हे एकाच वेळी झोपेत दिसणारे चित्र आणि जागेपणी भविष्याला दिलेला आकार होय.

परंतु, अनेकदा स्वप्नदेखील अनोळखी असतात. तुम्ही एखाद्या वेगळ्याच शहरात चालत असतात… रात्रीच्या गाढ झोपेत तुम्ही एखाद्या अनोळखी शहरातून चालत आहात. अचानक आकाशाचा रंग हिरवा होतो, इमारती हवेत तरंगू लागतात आणि काही क्षणांत तुम्ही स्वतःही उडू लागता. एखाद्या काल्पनिक चित्रपटात घडावं तसं काहीसं दृश्य. इतरवेळी जाग आली की, आपण स्वप्न पाहत होतो, याची जाणीव आपल्याला होते. परंतु, काहीवेळा अशा स्वरूपाची स्वप्न पाहत असतानाच, हे वास्तव नाही तर आपण स्वप्न पाहत आहोत याची जाणीव होते.

स्वप्न सुरू असतानाच आपण स्वप्नात असल्याची जाणीव होण्याच्या या अवस्थेला ‘सुस्पष्ट स्वप्न’ म्हणजेच ‘ल्युसिड ड्रीमिंग’ असे म्हणतात. काही व्यक्तींना या अवस्थेत स्वप्नातील प्रसंग बदलता येतात, स्वतःच्या हालचाली नियंत्रित करता येतात किंवा एखाद्या भीतीदायक स्वप्नाचा शेवट नव्याने लिहिता येतो. ही केवळ कल्पनारम्य किंवा गूढ घटना नसून झोपेशी संबंधित विज्ञानाने प्रयोगशाळेत नोंदवलेली वास्तविक मानसिक अवस्था आहे.

जागेपण आणि झोप यांच्यामधील अद्भुत अवस्था

बहुतांश जिवंत आणि नाट्यमय स्वप्ने ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ किंवा REM झोपेत पडतात. या अवस्थेत डोळे मिटलेले असूनही ते वेगाने हलतात. मेंदूची विद्युत क्रिया जागृत अवस्थेसारखी सक्रिय दिसते; परंतु शरीरातील बहुतांश स्नायू तात्पुरते शिथिल किंवा निष्क्रिय असतात. त्यामुळे स्वप्नात धावत असलो, तरी प्रत्यक्षात शरीर पलंगावरच स्थिर राहते. मेंदूतील तर्क, नियोजन आणि आत्मपरीक्षणाशी संबंधित भाग तुम्ही स्वप्नात असताना तुलनेने कमी सक्रिय असतात. म्हणूनच स्वप्नात घडणाऱ्या विसंगत गोष्टींवर आपण सहज विश्वास ठेवतो. एखादी व्यक्ती अचानक एखाद्या प्राण्यात परिवर्तीत झाली, घर समुद्रात तरंगू लागले किंवा मृत व्यक्ती आपल्याशी बोलू लागली, तरी ‘हे अशक्य आहे’ असा प्रश्न आपल्याला पडत नाही. मात्र सुस्पष्ट स्वप्नात परिस्थिती बदलते. संशोधनानुसार, आत्मजाणीव, निर्णयक्षमता आणि चिंतनाशी संबंधित ‘फ्रंटोपॅरिएटल मेंदूचे जाळे’, विशेषतः प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा काही भाग, पुन्हा सक्रिय होऊ लागतो. झोप पूर्णपणे तुटत नाही; पण स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या मानसिक अवस्थेची जाणीव होते. जणू झोपलेल्या मेंदूमध्ये जागेपणाचा एक छोटा दिवा तेवत असतो.

स्वप्नातील व्यक्तीने प्रयोगशाळेला दिलेला संकेत

स्वप्न पाहणारी व्यक्ती खरोखरच जागृत अवस्थेत आहे, हे शास्त्रज्ञांना कसे कळले? या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांच्या हालचालींमध्ये सापडते. सुस्पष्ट स्वप्नांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी सहभागींना झोपण्यापूर्वी एक सूचना दिली होती… त्यांनी सांगितले स्वप्नात असल्याची जाणीव झाल्यानंतर डोळे ठरावीक पद्धतीने डावीकडे आणि उजवीकडे हलवायचे. REM झोपेत शरीराचे बहुतांश स्नायू निष्क्रिय असले, तरी डोळ्यांच्या हालचाली बाहेरून नोंदवता येतात. त्यामुळे स्वप्नातील व्यक्तीने केलेला पूर्वनियोजित नेत्रसंकेत झोपेच्या प्रयोगशाळेतील उपकरणांवर स्पष्टपणे दिसला.

स्टीफन लाबर्ज आणि इतर संशोधकांनी केलेल्या प्रारंभिक प्रयोगांनी हे दाखवून दिले की, व्यक्ती REM झोपेत असतानाच स्वप्नात जागरूक राहू शकते. बाहेरील संशोधकांना ठरवून संकेत देऊ शकते. पुढील अभ्यासांनी या निष्कर्षांना अधिक बळ दिले. अलीकडील प्रयोगांत तर संशोधकांनी झोपलेल्या सुस्पष्ट स्वप्नदर्शींशी मर्यादित स्वरूपाचा संवाद साधला. स्वप्न पाहणाऱ्यांना आवाज किंवा प्रकाशाच्या संकेतांतून साधे प्रश्न विचारण्यात आले. काहींनी स्वप्न न मोडता डोळ्यांच्या ठरावीक हालचालींनी किंवा चेहऱ्याच्या स्नायूंच्या संकेतांनी योग्य उत्तरे दिली. त्यामुळे स्वप्नातील मेंदूचा संपर्क बाहेरील जगापासून पूर्णपणे तुटलेला नाही, हे स्पष्ट झाले.

स्वप्नात केलेली कृती मेंदूला खरी वाटते का?

मेंदू- प्रतिमांकनाच्या अभ्यासांत एक रोचक बाब आढळली. सुस्पष्ट स्वप्नात एखादी व्यक्ती हाताची हालचाल करण्याची कल्पना करते किंवा एखादे काम करते, तेव्हा जागेपणी तीच कृती करताना सक्रिय होणाऱ्या मेंदूच्या काही भागांत तत्सम हालचाल दिसते. याचा अर्थ स्वप्नातील कृती आणि वास्तवातील कृती पूर्णपणे समान असतात, असा नाही. तरीही मानसिक सरावासाठी सुस्पष्ट स्वप्नांचा उपयोग होऊ शकतो, अशी शक्यता संशोधकांनी मांडली आहे. काही लहान अभ्यासांमध्ये स्वप्नात बोटांच्या हालचालींचा किंवा नाणे फेकण्यासारख्या कार्याचा सराव केलेल्या व्यक्तींच्या जागेपणीच्या कामगिरीत सुधारणा दिसली. मात्र अशी उदाहरण कमी असल्याने खेळाडू किंवा संगीतकारांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निश्चितपणे प्रभावी आहे, असा ठाम निष्कर्ष अद्याप काढता येत नाही.

भयस्वप्नांवर नियंत्रण मिळू शकते का?

वारंवार पडणारी भयस्वप्ने व्यक्तीची झोप, मानसिक आरोग्य आणि दैनंदिन जीवन गंभीरपणे बिघडवू शकतात. विशेषतः आघातानंतरच्या तणाव विकारात भयस्वप्ने वारंवार दिसू शकतात. अशा वेळी स्वप्नातच ‘हे खरे नाही’ हे ओळखता आले, तर व्यक्ती प्रसंग बदलू शकते, हल्लेखोरापासून दूर जाऊ शकते किंवा स्वतःला जागे करू शकते.

काही उपचारात्मक अभ्यासांत ‘ल्युसिड ड्रीम थेरपी’मुळे भयस्वप्नांची तीव्रता किंवा वारंवारता कमी झाल्याचे आढळले आहे. परंतु या क्षेत्रातील पुरावे अजूनही मर्यादित आहेत. सुस्पष्ट स्वप्न पाहणे प्रत्येकाला सहज जमत नाही आणि केवळ हे तंत्र पारंपरिक मानसोपचारांचा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे गंभीर भयस्वप्ने किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

सुस्पष्ट स्वप्ने शिकता येतात का?

काही लोकांना सुस्पष्ट स्वप्ने नैसर्गिकपणे पडतात; इतरांना सरावाने त्यांची शक्यता वाढवता येते. दिवसभर अधूनमधून “मी आत्ता स्वप्नात आहे का?” असा प्रश्न विचारणे, जागे झाल्यानंतर स्वप्नांची नोंद करणे आणि झोपण्यापूर्वी “पुढच्या स्वप्नात मला स्वप्न असल्याचे आठवेल” असा संकल्प करणे, या पद्धती वापरल्या जातात.

‘म्नेमॉनिक इंडक्शन ऑफ ल्युसिड ड्रीम्स’ किंवा MILD नावाच्या पद्धतीला काही प्रयोगात्मक पाठबळ मिळाले आहे. रात्री काही तास झोपल्यानंतर थोड्या वेळासाठी जागे होऊन पुन्हा झोपणे आणि त्यावेळी स्वप्न-जागरूकतेचा संकल्प करणेही उपयोगी ठरू शकते. मात्र झोपेतून वारंवार उठल्यास थकवा वाढू शकतो. म्हणून अशा प्रयोगांत झोपेची गुणवत्ता बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी.