संदीप नलावडे

पंजाबमधील लुधियाना शहरातील ग्यासपुरा येथे विषारी वायूची गळती झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हायड्रोजन सल्फाइड वायूच्या गळतीमुळे ही दुर्घटना झाल्याचा संशय असून राष्ट्रीय आपत्ती मदतकार्य दल (एनडीआरएफ) याप्रकरणी तपास करत आहेत. या वायुगळतीच्या दुर्घटनेविषयी…

china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

लुधियानामध्ये नेमके काय घडले?

लुधियानातील ग्यासपुरा भागात भरवस्तीत रविवारी पहाटे विषारी वायूची गळती झाली. वायुगळतीमुळे अनेक जण चक्कर येऊन पडले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्यांनाही त्रास होऊ लागला. या दुर्घटनेमुळे ११ जणांना प्राण गमवावे लागले, तर अनेकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. वायुगळतीची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती मदतकार्य दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. प्राथमिक चौकशीनंतर रासायनिक प्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या वायूमुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. नाले-गटारांमधून वायुगळती झाली की नाही याची माहिती घेण्यासाठी सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले. या सांडपाण्याची तपासणी रासायनिक प्रयोगशाळेत करण्यात आल्यानंतर त्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड वायूचे अंश असल्याचे एनडीआरएफचे साहाय्यक कमांडंट डी. एल. जाखड यांनी सांगितले. मात्र तरीही गळतीमागील नेमके कारण तपासले जाणे आवश्यक आहे, असे जाखड म्हणाले.

लुधियानातील वायुगळती रोखण्यासाठी ‘एनडीआरएफ’ने काय केले?

लुधियानातील घटनास्थळी ‘एनडीआरएफ’चे पथक पोहोचले, त्यावेळी हायड्रोजन सल्फाइडच्या गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्यासपुरा भागात पोहोचलो, त्यावेळी या वायूचा स्तर २०० पेक्षा जास्त होता. हा वायू रासायनिक सांडपाणी वाहक नाल्यातून येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पालिका प्रशासनाच्या मदतीचे सांडपाणी वाहिन्यांवर काॅस्टिक सोडा टाकण्यात आला. ज्यामुळे वायूचा परिणाम कमी झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

माऊंट एव्हरेस्टवर रात्री येतो गूढ आवाज, नेमके कारण काय? शास्त्रज्ञांनी लावला शोध; जाणून घ्या…

हायड्रोजन सल्फाइड म्हणजे काय आणि ते किती हानिकारक आहे?

हायड्रोजन सल्फाइड एक रंगहीन वायू असून त्याला सडक्या अंड्याचा गंध येतो. हा एक विषारी वायू असून तो नैसर्गिक रूपात हवेत आढळतो. त्याशिवाय दलदल, सांडपाणी वाहक नाले आणि औद्याेगिक उत्पादनादरम्यान आढळतो. मानवी शरीरासाठी अत्यंत घातक हा वायू असल्याचे बंगळूरुतील फुप्फूस विकारतज्ज्ञ डॉ. सत्यनारायण म्हैसूर यांनी सांगितले. वातावरणातील हायड्रोजन सल्फाइडच्या संपर्कात आल्यास चिडचिड होऊ शकते आणि त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. श्वसनावाटे मोठ्या प्रमाणात तो शरीरात गेला तर मृत्यू येण्याचीही शक्यता असते. हा अत्यंत तीक्ष्ण वायू असून त्यामुळे अकाली दम्याचा झटका येऊ शकतो.

दीर्घकाळापर्यंत आणि सातत्याने या वायूच्या संपर्कात राहिल्यास कर्करोगही होऊ शकतो. हायड्रोजन सल्फाइड वायूचा श्वास घेतल्यास एखाद्याला डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, पोटदुखी, शुद्ध हरपणे अशा दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. जर द्रव प्रकारात वायू असेल तर एखाद्याला हिमबाधाही होऊ शकते, डोळ्यांना आणि श्वसनसंस्थेला त्रास होऊ शकतो. “हायड्रोजन सल्फाइडच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मज्जासंस्था आणि फुप्फुसांचे नुकसान यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. वायू असलेल्या परिसराच्या संपर्कात असताना अधिक सावध राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे डॉ. म्हैसूर यांनी सांगितले. संपर्क टाळण्यासाठी मुखपट्टी आणि गॉगलचा वापर करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

विश्लेषण : रेबीज लसींचा तुटवडा का जाणवतोय?

हायड्रोजन सल्फाइड तयार होण्यापासून रोखण्यासाठी काय करता येईल?

हायड्रोजन सल्फाइड तयार होण्यापासून रोखण्यासाठी सांडपाणी वाहक नाले, दलदलीच्या पाण्याचे नियतकालिक नमुने घेणे आवश्यक आहे. गरज नसलेल्या सांडपाण्याच्या जागा, दलदल यांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. तेलशुद्धीकरण, खनिज तेल व वायुशोधन, खनिकर्म, खाद्यप्रक्रिया, कागद प्रक्रिया अशा अनेक उद्योगांतूनही हा वायू निर्माण होतो. त्यामुळे आपत्तीजनक उद्रेक टाळण्यासाठी हायड्राेजन सल्फाइडचे औद्योगिक नियमन मजबूत करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. औद्योगिक पट्ट्यांमध्ये आणि दलदलीच्या क्षेत्राजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्याशिवाय स्थानिक आरोग्य अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी या ठिकाणांची निश्चित गणना करणे आवश्यक आहे.