Cancer Screeening Can Curb Death Risk : भारतात फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. देशात इतर कॅन्सरच्या प्रमाणात फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०२४ मध्ये या कॅन्सरमुळे ९८ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, कॅन्सरच्या निदानासाठी सरकारी पातळीवर नियमित स्क्रीनिंग केले जात नाही.

२०२४ मध्ये भारतात फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे ९८,६८७ मृत्यू झाले. २०२२ मध्ये या कॅन्सरमुळे ७५,०३१ मृत्यू झाले होते. त्यावेळी कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या क्रमवारीत फुप्फुसाचा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर होता.

फुप्फुसाचा कॅन्सर हा उपचारासाठी तुलनेने कठीण असलेल्या कॅन्सरपैकी एक आहे. मात्र, मृत्यूंचे प्रमाण वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. बहुतांश रुग्ण आजार बळावल्यानंतर रुग्णालयात पोहोचतात. तोपर्यंत कॅन्सर शेवटच्या टप्प्यात गेलेला असतो आणि उपचारानंतर जगण्याची शक्यताही लक्षणीयरीत्या कमी होते. अशा परिस्थितीत आजाराचे लवकर निदान करण्यासाठी स्क्रीनिंग महत्त्वाची ठरू शकते. मात्र, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रमात फुप्फुसाच्या कॅन्सरचा समावेश नाही. या कार्यक्रमात स्तन, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर यांची स्क्रीनिंग केली जाते.

मग फुप्फुसाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग का केली जात नाही? स्क्रीनिंग सुरू करण्यामध्ये नेमकी कोणती आव्हाने आहेत? फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान उशिरा होण्याचा प्रश्न आणि त्यामागची कारणे समजून घेऊया

फुप्फुसाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग का गरजेची आहे?

२०२२ ते २०२४ या काळात भारतात फुप्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ८१,७४८ वरून १.१२ लाखांपर्यंत वाढली. एकूण कॅन्सर रुग्णांमधील त्याचे प्रमाणही ५.८ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचले, त्यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर नव्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या काळात फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. २०२२ मध्ये कॅन्सरमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ८.२ टक्के मृत्यू फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे झाले होते. २०२४ मध्ये हे प्रमाण वाढून १०.९ टक्के झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) यांच्या ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीकडून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीवरून या कॅन्सरचे गांभीर्य लक्षात येऊ शकते, त्यामुळे प्राथमिक टप्प्यांमध्ये स्क्रीनिंग अतिमहत्त्वाची ठरते. फुप्फुसाच्या कॅन्सरचे लवकर निदान आणि वेळेत उपचार घेण्यासाठी नियमित स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे.

फुप्फुसाच्या कॅन्सरची वेळेवर स्क्रीनिंग न झाल्याने कॅन्सरचे निदान खूप उशिरा होते. परिणामी रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत कॅन्सर शरीरात बराच पसरलेला असू शकतो. डॉ. अभिषेक शंकर यांनी सांगितले की, सुमारे ९३ टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान प्रगत टप्प्यात होते. सप्टेंबरमध्ये IARC ने फुप्फुसाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगवर प्रसिद्ध केलेल्या लेखाच्या लेखकांपैकी ते एक आहेत.

याचा जगण्याच्या कालावधीवर थेट परिणाम होतो. फुप्फुसाच्या कॅन्सरचे शेवटच्या टप्प्यांत निदान झाल्यास रुग्ण कमी काळासाठी जगू शकतात. पाच वर्षे रुग्ण जिवंत राहण्याची शक्यता फक्त ७ ते १८ टक्के इतकीच असते. याउलट, आजार पहिल्याच टप्प्यात समोर आला तर जगण्याची शक्यता ८० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. यासाठी लो-डोस कॉम्प्युटेड टोमोग्राफी (LDCT)चा उपयोग होऊ शकतो. या तपासणीमुळे फुप्फुसातील कॅन्सर लवकर शोधता येतो आणि त्यावर सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार करता येतात. त्यामुळे कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे सरकारी रुग्णालयांसोबतच खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांनीही अशी स्क्रीनिंग उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे डॉ. शंकर यांनी नमूद केले.

भारतातील फुप्फुसाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसमोरील आव्हाने

स्क्रीनिंगचा खर्च : भारतासारख्या मर्यादित संसाधने असलेल्या देशात फुप्फुसाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग ही खर्चिक बाब आहे. सध्या स्तन, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ज्या तपासण्या केल्या जातात, त्या तुलनेने स्वस्त आणि सोप्या आहेत. स्तनाच्या कॅन्सरसाठी क्लिनिकल तपासणी, तोंडाच्या कॅन्सरसाठी तोंडाची दृश्य तपासणी, तर गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी अॅसिटिक अॅसिडच्या मदतीने तपासणी केली जाते. यामध्ये संशयास्पद काही आढळल्यास रुग्णाला पुढील तपासणीसाठी मोठ्या रुग्णालयात पाठवले जाते.

फुप्फुसाच्या कॅन्सरसाठी मात्र लो-डोस कॉम्प्युटेड टोमोग्राफी (LDCT) करावी लागते. ही तपासणी इतर तीन कॅन्सरच्या स्क्रीनिंगच्या तुलनेत खूप खर्चिक आहे, त्यामुळे सरकारी स्क्रीनिंग कार्यक्रमात एलडीसीटीचा समावेश करून मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू केल्यास सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. यामुळे फुप्फुसाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग सुरू करण्यापुढे खर्च हा महत्त्वाचा अडथळा आहे.

मात्र, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या एका अभ्यासानुसार, एलडीसीटीची तपासणी इतर पर्यायांच्या तुलनेत खर्चिक असली तरी तिच्यामुळे आरोग्याला होणारा फायदा अधिक आहे, त्यामुळे फुप्फुसाच्या कॅन्सरग्रस्तांसाठी एलडीसीटी तपासणी परिणामकारक ठरू शकते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे राष्ट्रीय कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रमात एलडीसीटीचा समावेश करण्याचा विचार करायला हवा असे संशोधकांनी म्हटले आहे.

एलडीसीटीची उपलब्धता : फुप्फुसाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसमोरील आणखी एक मोठे आव्हान म्हणजे सीटीस्कॅन मशीनची उपलब्धता. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही तपासणी करता येत नाही, त्यामुळे कोणतीही लक्षणे नसतानाही केवळ स्क्रीनिंगसाठी रुग्णांना मोठ्या आरोग्य केंद्रात जावे लागेल. शिवाय ज्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन मशीन उपलब्ध आहे, तिथेही एलडीसीटी स्क्रीनिंगचा सल्ला दिला जात नाही. डॉक्टरांना कॅन्सरचा संशय आल्यानंतरच ही तपासणी केली जाते.

जोखीम असलेल्या लोकांची ओळख : पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतातील फुप्फुसाच्या कॅन्सरचे चित्र काहीसे वेगळे आहे. भारतात धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुप्फुसाचा कॅन्सर आढळून येतो. सध्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या स्क्रीनिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ५० ते ८० वर्षे वयोगटातील आणि किमान २० वर्षे दररोज एक पाकीट सिगारेट ओढलेल्या व्यक्तींनाच एलडीसीटी स्क्रीनिंग करण्याची शिफारस केली जाते. भारतातील अनेक लोक या निकषांतून वगळले जातात.

भारतातील क्षयरोगाचे प्रमाण : भारतामध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याने एलडीसीटी स्क्रीनिंगमध्ये चुकीचे पॉझिटिव्ह निकाल येण्याचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे अनावश्यक तपासण्या कराव्या लागू शकतात. मात्र, २०२१ मध्ये मुंबईत झालेल्या एका प्रायोगिक अभ्यासात याचे वेगळे चित्र दिसून आले. क्षयरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या देशातही एलडीसीटीच्या मदतीने फुप्फुसातील कॅन्सरच्या गाठी लवकर शोधता येतात आणि त्यामुळे जीव वाचू शकतात, असे या अभ्यासात आढळले. एम्सच्या डॉक्टरांच्या अभ्यासातही क्षयरोगाचे जास्त प्रमाण असल्यास ते फुप्फुसाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगमध्ये अडथळा ठरत नसल्याचे दिसून आले.

केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांची कॅन्सरची स्क्रीनिंग करावी का? तर नाही. “भारतात कॅन्सरची जोखीम ठरवण्यासाठी हे पुरेसे ठरणार नाही. कारण वर नमूद केल्याप्रमाणे, भारतात धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही फुप्फुसाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो. तज्ज्ञांच्या मते, बीडीचे सेवन, इतरांच्या धूम्रपानामुळे होणारा धूर, बायोमास इंधन, धूर आणि घरातील प्रदूषणाच्या संपर्कात असलेल्या लोकांनाही फुप्फुसांचा कॅन्सर होतो, ते उच्च जोखीम गटात येऊ शकतात. यासोबतच, वातावरणातील वायुप्रदूषणही फुप्फुसाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे स्क्रीनिंगचे निकष केवळ धूम्रपानाच्या इतिहासावर आधारित असू शकत नाहीत,” असे डॉ. शंकर यांनी सांगितले.

भारतीय लोकसंख्येसाठी एलडीसीटी स्क्रीनिंग किती प्रभावी ठरू शकते, याचा भारतीय फुप्फुस कॅन्सर स्क्रीनिंग चाचणी (ILST) माध्यमातून अभ्यास केला जात आहे; तर वायुप्रदूषण आणि इतर पर्यावरणीय घटकांचा फुप्फुसाच्या कॅन्सरच्या जोखमीवर कसा परिणाम होतो हे AIRCARE या अभ्यासात तपासले जात आहे.