‘द केरला स्टोरी’ नामक चित्रपटाने सध्या भारतात वावटळ उठवली असतानाच पंजाबमधून महिलांच्या मानवी तस्करीसंबंधी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. या प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करण्यासाठी पंजाब पोलिसांच्या ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (BOI) विभागाने एक विशेष तपासपथक तयार केले आहे. ज्याचे प्रमुख आयपीएस रणधीर कुमार आहेत. पंजाबमधून बेकायदेशीररीत्या ज्या महिलांची मानवी तस्करी केली गेली, त्या प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. ट्रॅव्हल एंजटने एका महिलेला ओमानमध्ये ८० हजाराला विकले असल्याची बातमी मध्यंतरी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिली होती. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार होशियारपूर, जालंधर आणि अमृतसर येथे राहणाऱ्या अनेक महिलांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली असून आखाती देशांमध्ये त्या मोठ्या हलाखीचे जीवन जगत आहेत.

महिलांची तस्करी करण्याचे प्रकार कसे घडतात?

आखाती देशांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून या महिलांना टुरिस्ट व्हिजावर आखाती देशांमध्ये नेले जाते. तिथे गेल्यावर व्हिजा दोन वर्षांनी वाढवून दिला जाईल, असेही सांगितले जाते. या सर्व कामासाठी महिलांकडून ५० ते ७० हजारांची रक्कम लाटली जाते. ओमानची राजधानी मस्कत येथून काही दिवसांपूर्वी मुक्त केलेल्या बऱ्याच महिला या पंजाबमधील आहेत. घरगुती काम किंवा केअर टेकरची मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून या महिलांना ओमान येथे आणण्यात आले होते. मस्कतमध्ये पोहोचताच स्थानिक एजंट या महिलांकडून त्यांचे पासपोर्ट आणि मोबाइल फोन काढून घेतात. तसेच त्यांच्याकडून काही करारपत्रांवर बळजबरीने स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर या महिलांची ८० हजार ते दीड लाखांपर्यंत विक्री केली जाते.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

हे वाचा >> पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न

हे रॅकेट कसे काम करते?

पंजाब, नवी दिल्ली, मुंबई आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये बोगस ट्रॅव्हल एजंटनी आखाती देशांमध्ये काम करीत असल्याचा भास निर्माण करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये थाटली आहेत. आखाती देशांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या आणि सध्या भारतात परतलेल्या काही स्थानिक महिलांना हाताशी धरून हे रॅकेट चालवले जाते. या महिला किंवा पुरुष मध्यस्थाची भूमिका पार पाडतात. हे लोक गरीब आणि गरजू महिलांना हेरून त्यांना आखाती देशांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवितात आणि ट्रॅव्हल एजंटपर्यंत घेऊन येतात.

या लोकांकडून अशाच लोकांची निवड केली जाते, ज्यांना व्हिजा आणि परदेशातील नोकरीच्या प्रक्रियेबद्दल काहीही माहिती नाही. मध्यस्थ असणाऱ्या महिला गरीब कुटुंबातील महिलांना आखाती देशामध्ये मिळणारा गल्लेलठ्ठ पगार आणि एका चांगल्या जीवनाची खोटी खोटी स्वप्ने दाखवून भुलवतात. २० मे रोजी मस्कतहून परतलेल्या राणीने (बदललेले नाव) अशाच प्रकारे आपली कैफियत मांडली. तिच्या एका नातेवाईक महिलेने तिला मस्कतला पाठवले होते. राणीसोबत परतलेल्या ज्योतीचीही हीच कहाणी होती, तिनेही तिच्या नातेवाईकावर विश्वास ठेवून ओमानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही मुलींना ओमानमध्ये पाठविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांनी याआधी ओमानमध्ये काम केलेले होते. या मुलींना ओमानमध्ये पाठविल्यानंतर त्यांची विक्री केली जाणार आहे, हे त्यांना माहीत होते.

महिला आमिषांना बळी का पडतात?

अशा प्रकरणांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या महिला या पीडित तरुणींच्या ओळखीच्या असतात. एकाच गावात किंवा जिल्ह्यात राहत असल्यामुळे पीडित तरुणी अशा मध्यस्थी करणाऱ्या महिलांवर चटकन विश्वास ठेवतात. मध्यस्थी करणाऱ्या महिलांकडून पीडितांना व्हिजा, प्रवासाची कागदपत्रे अशा सर्व प्रकारच्या कामात सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात येते. पीडित तरुणी किंवा महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना आखाती देशांमध्ये अडकल्यानंतर काय करायचे? याची बिलकूल कल्पना नसते.

मस्कतमध्ये गेल्यानंतर काय होते?

मस्कतमध्ये गेल्यानंतर एजंटकडून या महिलांची एके ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांची विक्री होईपर्यंत या महिलांना याच ठिकाणी ठेवले जाते. पीडित महिलांचे पासपोर्ट आणि मोबाइल फोन एजंट ताब्यात घेतात. त्या ठिकाणी त्यांना इंग्रजीमध्ये असलेले करारपत्र स्वाक्षरी करण्यासाठी दिले जाते. पीडित अशिक्षित असल्यामुळे त्यांना यातील तरतुदी साहजिकच लक्षात येत नाहीत. अशिक्षित असलेल्या महिलांचा अंगठा घेऊन त्यांची करारपत्रावर हमी मिळवली जाते.

करारपत्रानुसार एका विशिष्ट ठिकाणी दोन वर्षांकरिता काम करण्यासाठी पीडित महिलांची संमती मिळवली जाते. त्या बदल्यात त्यांना दीड लाखांच्या जवळपासचा मोबदला दिला जातो. करारपत्रावर पीडित महिलेची स्वाक्षरी किंवा अंगठा मिळाल्यानंतर त्यांना कामाच्या ठिकाणी नेले जाते. तिथे गेल्यावर पीडित महिलांना अनेकदा घरकाम करण्यासोबतच वेश्याव्यवसायातही ढकलले जाते.

हे वाचा >> महाराष्ट्रातून २०२२ मध्ये बेपत्ता ५३५ महिला लव्ह जिहादचा प्रकार? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या

पीडित महिलांनी सदर काम करण्यास नकार दिला तर त्यांना मारझोड करण्यात येते आणि काही दिवस त्यांना उपाशी ठेवण्यात येते. माजी केंद्रीय मंत्री बलवंत सिंह रामुवालिया यांनी काही वर्षांपूर्वी एका पीडित मुलीची आखाती देशातून सुटका केली होती. या पीडित मुलीला अनेक आजारांनी ग्रासले असल्याचे लक्षात आले. भारतात परतल्यानंतर काही दिवसांतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती फक्त २६ वर्षांची होती. तिला बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. एका स्थानिक एजंटने दिलेल्या माहितीनुसार, या महिलांची एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे विक्री केली जाते. त्यांना घरच्यांशी संपर्क साधू दिला जात नाही. तसेच त्यांना अमानवीय परिस्थितीमध्ये राहण्यासाठी भाग पाडले जाते.

पीडित महिलांची सुटका कशी केली जाते?

काही पीडित महिला भारतातील कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात यशस्वी होतात. त्यांच्या नरकयातनांची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाकडून भारतीय उच्चाधिकाऱ्यांना याबाबत कळवले जाते. मस्कतमधील भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधून सदर पीडित महिलांचा शोध घेऊन त्यांची सुटका केली जाते. यासाठी बराच वेळ जातो.

दूतावासातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या निवारा केंद्रात जवळपास ३० ते ४० महिला भारतात परतण्याची वाट पाहत आहेत. रामुवालिया यांनी सांगितले की, भारत सरकारने या प्रकरणात लक्ष घालून काही ठोस पावले उचलायला हवीत. ओमानमध्ये महिलांचा बेकायदेशीर प्रवास थांबवायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. ओमान आणि इतर अरब देशांमध्ये घरगुती कामासाठी कामगारांची मागणी वाढत आहे. या मागणीचा फायदा घेऊन काही ट्रॅव्हल एजंट गरीब कुटुंबातील महिलांचा पुरवठा त्या देशात करतात. पण तिथून सुटका झालेल्या महिलांच्या धक्कादायक कथा आपल्यासमोर येत आहेत, असेही रामुवालिया यांनी सांगितले होते.