पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा मेक इन इंडियाचा उल्लेख करत असतात. अनेक भाषणांमधून त्यांनी मेक इन इंडियाच्या फायद्यांविषयी तसंच यशाबाबत सांगितले आहे. पण, ‘मेक इन इंडिया’प्रमाणेच चीनमध्येही ‘मेड इन चायना २०२५’ हा उपक्रम सुरू आहे हे तुम्हाला माहीत आहे का… अलीकडेच ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने भारतातील त्यांच्या आयफोन कारखान्यांमधून शेकडो चिनी इंजिनिअर आणि टेक्निशिअन्सना नारळ दिला आहे. परिणामी देशातील अॅपल इंक.च्या उत्पादन वाढीला मोठा धक्का बसला आहे.
अॅपलने भारताला आयफोन उत्पादनासाठी एक प्रमुख बाजारपेठ आणि चीनपासून दूर जाण्यासाठी त्यांच्या पुरवठादारांसाठी आधार म्हणून ओळखले. कंपनी सध्या भारतातील सर्व आयफोन उत्पादनांपैकी जवळपास १५ टक्के आयफोनचे उत्पादन करते. येत्या काही वर्षांत ते एक चतुर्थांशपर्यंत वाढवण्याची योजना आहे. भारतात कंपनीचे असेम्बली ऑपरेशन असणे ही सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण यशस्वी कहाणी आहे.
‘मेक इन इंडिया’चा उद्देश
मेक इन इंडिया उपक्रम सप्टेंबर २०१४ मध्ये सुरू करण्यात आला. भारताला उत्पादन, डिझाइन आणि नाविन्याचे केंद्र बनवणे हा याचा उद्देश होता. एका वर्षानंतर चीनने स्वत:ची मेड इन चायना २०२५ ही योजना सुरू केली. भारत सरकार नियमितपणे ज्या मेक इन इंडियाबद्दल बोलत असते, त्याचप्रमाणे मेड इन चायना २०२५ हे कुठेतरी चर्चेतून गायब झाले आहे. असं असताना जागतिक आर्थिक मंचाने अलीकडेच चीनच्या धोरणाचा आढावा घेतला आहे आणि त्यात भारताबाबत महत्त्वाचे मुद्देही आहेत.
मेड इन चायना २०२५ म्हणजे नेमकं काय, ते यशस्वी ठरले आहे का आणि चीनमधील लोक याबाबत का बोलत नाहीत याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
‘मेड इन चायना २०२५’ म्हणजे काय?
२०१५ मध्ये तयार करण्यात आलेला मेड इन चायना २०२५ हा पुढील १० वर्षांसाठी चीनच्या उत्पादन क्षेत्राचा आराखडा होता. या धोरणाचा उद्देश उत्पादने, तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम या बाबतील उच्च मूल्याच्या उत्पादनापर्यंत विस्तार करणे असा होता. २०१५ मध्ये थिंक टँक काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सने यासाठी १० महत्त्वाच्या क्षेत्रांची यादी दिली होती. त्यामध्ये इलेक्ट्रिक कार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माहिती तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, एरोस्पेस अभियांत्रिकी, नवीन कृत्रिम साहित्य, प्रगत विद्युत उपकरणे, उदयोन्मुख जैव औषधे, उच्च दर्जाच्या रेल्वे पायाभूत सुविधा आणि उच्च तंत्रज्ञान सागरी अभियांत्रिकी यांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यातील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात म्हटले आहे की, “२०१५ मध्ये पहिल्यांदा जाहीर झालेल्या मेड इन चायना २०२५ ने चीनच्या औद्योगिक महत्त्वाकांक्षांचा सूर आणि वेग निश्चित केला. त्याची रणनीती एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली औद्योगिक पाया असलेले एआय संवर्धित, ग्रीन एनर्जीवर चालणारे आणि स्वावलंबन केंद्रित परिवर्तन.”
चीनमध्ये याबाबत बोलले का जात नाही?
जानेवारीमध्ये प्रकाशित झालेल्या ‘द इकॉनॉमिस्ट’मधील एका लेखात असे स्पष्टपणे म्हटले आहे की, हॅरी पॉटरमधील लॉर्ड व्होल्डेमॉर्टप्रमाणे मेड इन चायना २०२५ हा एक उपक्रम आहे, तो परदेशात इतकी भीती आणि द्वेष निर्माण करतो की चिनी अधिकारी त्याचे नावही घेण्याचे धाडस करत नाहीत; कारण कागदावरील धोरणे चिनी कंपन्यांना चुकीचे फायदा देत असल्याचे आणि इतर राष्ट्रांच्या कंपन्यांसाठी खूप अडथळे निर्माण करणारे असल्याचे दिसून येते.
भांडवली खर्च, सहज उपलब्ध कर्ज, कर सवलत यासह चीन सरकार त्यांच्या देशातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतो, त्यामुळे त्यांना स्वस्त दरात वस्तूंचे उत्पादन करणे शक्य होते. बहुतेकदा आयातदार देशातील उद्योगांच्या किमतीप्रमाणेच चिनी वस्तू जगभर निर्यात करतात. स्वस्त चिनी वस्तूंनी भरलेल्या भारतातील बाजारपेठा हे त्याचे एक उदाहरण आहे. दुसरीकडे, चीन परदेशी कंपन्यांना तिथे व्यवसाय करण्यासाठी कडक अटी घालतो. अनेकदा कंपन्यांना तांत्रिक कौशल्य आणि ज्ञान असल्यावरच चीनमध्ये प्रवेश दिला जातो. जेव्हा मेड इन चायना २०२५ उपक्रम सुरू झाला, तेव्हा अनेक देशांनी प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांनी त्याच्या प्रस्तावित उपाययोजनांवर टीका केली. निर्बंध किंवा निर्यात निर्बंधांसारख्या प्रतिकूल कारवाईच्या भीतीने चीनने या उपक्रमाबाबत उल्लेख करणंच थांबवलं.
‘मेड इन चायना २०२५’ किती यशस्वी झाले?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, चीन आता ग्रीन टेक्नॉलॉजीवर वर्चस्व गाजवतो. लिथियम-आयन बॅटरीचे जागतिक पातळीवर जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन आहे. सोलार मॉड्यूल उत्पादनात जवळपास ८० टक्के आणि जगातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सिंहाचा वाटा. हाय-स्पीड रेल हे अभियांत्रिकी कौशल्य दाखवते. रोबोटिक्स आणि सेन्सर तंत्रज्ञानात जलदगतीने प्रगती केली आहे. इतर प्रमुख फायदे म्हणजे संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे आणि एकात्मिक पुरवठा साखळी तयार करणे.
प्रत्यक्षात काही प्रमुख क्षेत्रांपैकी सेमीकंडक्टर बनवणे आणि प्रवासी विमाने तयार करणे या दोन क्षेत्रांमध्येच चीन कमी पडला आहे. दुसरा तोटा असा होता की, उत्पादनावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे चीनने अर्थव्यवस्थेच्या बाजूकडे दुर्लक्ष केले आणि सेवा क्षेत्राचा पूर्ण क्षमतेने विकास त्यांना करता आला नाही. अशाप्रकारे मेड इन याचना या उपक्रमांतून भारताला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण भारताचे सेवा क्षेत्र उत्तम विकसित आहे; मात्र उत्पादन क्षेत्रात अजून बराच पल्ला गाठणं बाकी आहे.