मध्य प्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘त्रिशुल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-६७’ या वाघाने ‘टी-४०’ या वाघिणीच्या बछड्याला मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्या बछड्याला त्याने खाल्ले. ही घटना उपस्थितांमध्ये थरकाप उडवणारी ठरली, तरी ती तितकीशी दुर्मिळ नाही.
नेमकी घटना काय?
वाघाकडून स्वतःच्या प्रजातीच्या बछड्यांची शिकार करणे असाधारण असले तरी ती पूर्णपणे अभावाने घडणारी घटना नाही. मध्य प्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली. या व्याघ्र प्रकल्पात ‘टी-६७’ या वाघाने तीन महिन्यांच्या वाघाच्या बछड्यावर हल्ला करून त्याची शिकार केली. एवढेच नाही तर मारलेल्या बछड्याला खाल्ले. हा बछडा ‘टी-४०’ या वाघिणीचा असल्याचे मानले जाते.
सफारीसाठी आलेल्या पर्यटकांसमोरच हा प्रकार घडला. पर्यटकांनी वाघाला बछड्याला खाताना पाहिले. मार्गदर्शक व चालकांनी ही माहिती वनविभागाला दिली. ‘टी-४०’ ही वाघीण तिच्या तीन बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलात सतत ठिकाण बदलत होती. मात्र, यादरम्यान एका बछड्यावर ‘टी-६७’ या वाघाने हल्ला केला.
पर्यटकांनी नेमके काय पाहिले?
संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीदरम्यान पर्यटकांनी जे पाहिले ते भयंकर होते. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना ‘टी-४०’ ही वाघीण तीन बछडे घेऊन जात असताना दिसली. यादरम्यान अचानक ‘टी-६७’ हा वाघ त्याठिकाणी आला. या वाघाने त्यांतील सुमारे तीन महिन्यांच्या एका बछड्याची शिकार केली. बछड्याची शिकार करून हा वाघ थांबला नाही तर त्याने त्या बछड्याला जबड्यात घेतले आणि सहजतेने खाल्ले. वाघिणीने तिच्या बछड्याला वाचवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण ती अयशस्वी झाली. आता तिच्या उर्वरित दोन लहान बछड्यांसाठी धोका वाढला आहे. पर्यटकांच्या डोळ्यासमोरच हा प्रकार घडल्याने ते घाबरले.
तज्ज्ञ काय सांगतात?
नर वाघ बहुतेकदा इतर नरांपासून जन्मलेल्या पिल्लांना मारतात. आपली जनुकीय वारसरेषा मजबूत करण्यासाठी आणि लवकर प्रजनन संधी मिळविण्यासाठी हे केले जाते. वाघिणी तिचे बछडे मोठे होईपर्यंत दुसऱ्या वाघासोबत मीलनाला तयार नसते. त्यामुळे वाघ तिच्या बछड्यांना मारतो, जेणेकरून वाघीण त्याच्यासोबत मीलनाला तयार होऊ शकेल. याच कारणामुळे राखीव क्षेत्रात वाघांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाते. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते हे वर्तन कितीही क्रूर वाटले तरी, वाघांच्या जीवनाचा तो एक भाग आहे. त्यांच्या प्रदेशावर वर्चस्व राखण्यासाठी मोठे नर वाघ प्रतिस्पर्ध्यांना किंवा त्यांच्या पिल्लांना संपवण्याचा प्रयत्न करतात. वाघिणी त्यांचे मोठे पिल्लू प्रौढ होईपर्यंत नवीन पिल्लांना जन्म देत नाहीत. जंगलात बहुतेक पिल्लांचे मृत्यू प्रादेशिक संघर्षांमुळे होतात. लोकसंख्या संतुलन राखण्याचा हा निसर्गाचा मार्ग आहे.
वाघ आक्रमक होता का?
व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार ‘टी-६७’ हा वाघ अत्यंत आक्रमक आणि प्रभावी वाघ मानला जातो. तो स्वतःचा प्रदेश निर्माण करण्यासाठी सतत इतर नर वाघांशी संघर्ष करताना दिसतो. ३१ डिसेंबर २०२५ला ‘टी-६७’ या वाघाने ‘टी-५६’ या वाघाशी लढाई केली. त्यांच्यात भीषण संघर्ष झाला होता. त्या लढाईत दोन्ही वाघ गंभीर जखमी झाले होते. ‘टी-६७’ या वाघाने यापूर्वीही दोन बछड्यांचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या बछड्याला या वाघाने मारले तो ‘टी-४०’ ही वाघीण व ‘टी-२६’ या वाघाचा बछडा होता. या वाघिणीला मीलनासाठी तयार करण्यासाठी त्याने दुसऱ्या नर वाघाकडून जन्मलेल्या पिल्लांना मारले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘टी-४०’ ही वाघीण सुमारे १५ दिवसांपासून व्याघ्र प्रकल्पातील बघेला हेरिटेज हॉटेल परिसरात तिच्या तीन पिल्लांसह दिसत होती. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तिला हत्तींच्या मदतीने पुन्हा जंगलात हलवले होते.
व्यवस्थापनाने काय निर्णय घेतला?
या घटनेनंतर संजय डुबरी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने तात्काळ खबरदारीचे उपाय केले. संजय-दुबरी व्याघ्र प्रकल्पातील मांडोला परिसरात पर्यटकांची हालचाल आणि सफारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवस या परिसरात कोणत्याही पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. या काळात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ‘टी-६७’ या नावाने ओळखला जाणारा वाघ तसेच ज्या ‘टी-४०’ वाघिणीचा बछडा त्याने मारला त्या वाघिणीवर आणि तिच्या उर्वरित बछड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
rakhi.chavhan@expressindia.com
