दुबईत राहून भारतात ‘महादेव बुक’ आणि ‘स्काय एक्स्चेंज’ ॲप चालविणारा सौरभ चंद्राकार हा छत्तीसगडमधील एका शहारातील साधा फळ रस विक्रेता होता. मात्र बेकायदा सट्टेबाजीतून त्याने कोट्यवधी रुपये कमावले. हा काळा पैसा व्यावसायिक विकास गर्ग याने बनावट कंपन्यांमार्फत पांढरा करण्याचा प्रयत्न केला. या पैशातून त्याने चक्क अमेरिकन कंपनी खरेदी केली. बेकायदा सट्टेबाजीत इतकी करोडो रुपयांची उलाढाल होते? देशात सट्टेबाजीला का प्रतिबंध? याबाबत कायदे कोणते आहेत? याचा हा आढावा.

महादेव बेटिंग ॲप काय?

छत्तीसगडमधील भिलाई शहरातील सौरभ चंद्राकार आणि रवी उप्पल यांनी २०१८ मध्ये ‘महादेव ऑनलाईन बुक’ या बेटिंग ॲपची निर्मिती केली. सुरुवातीला ते भिलाईपुरते नंतर छत्तीसगड आणि नंतर देशभरात या बेकायदा ॲपला प्रतिसाद मिळू लागला. त्यावेळी म्हणे या ॲपचा दिवसाचा धंदा २०० कोटींच्या घरात होता. सक्तवसुली संचालनालयाने अलीकडच्या आपल्या तपासात पहिल्यांदा अधिकृत आकडा दिला आहे. त्यानुसार या ॲपमधून महिन्याला ४५० कोटी रुपये चंद्राकार कमावत होता, असे स्पष्ट झाले.

तीन पत्ती, पोकर, चान्स गेम, बॅडमिंटन, टेनिस आदी खेळांसाठी ऑनलाईन सट्टा खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘ॲप’ची जाहिरात करण्यासाठी बॉलिवूडमधील बडे सेलिब्रिटी पुढे आले. प्रामुख्याने करोनाकाळात हे ॲप भरभराटीला आले. चंद्राकर याच्या शाही लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली, काहींनी कलाविष्कारही सादर केले.

या लग्नसोहळ्यामुळे बॉलिवूड, महादेव ॲप आणि हवालामार्फत कोट्यवधींचा झालेला व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आला. त्यामुळे चंद्राकार आणि त्याचे साथीदार अडचणीत आले. उप्पल हा तुरुंगात आहे तर चंद्राकार ओमान पोलिसांच्या ताब्यात आहे. भारताने त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पण प्रक्रिया सुरु केली आहे.

ॲपची निर्मिती कशी?

छत्तीसगडमधील भिलाई शहरात चंद्राकार हा फळांचा रस विकत होता तर उप्पलचे टायर विक्रीते दुकान होते. या दोघांना झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळे ते ऑनलाईन सट्टेबाजीच्या नादाला लागले आणि त्यात त्यांना प्रचंड नुकसान झाले. अशातच ते दुबईला गेले. तेथे त्यांची भेट एक स्थानिक शेख तसेच एका पाकिस्तानी नागरिकाशी झाली. त्यानंतरच ॲपची निर्मिती झाली, अशी माहिती आतापर्यंत तपासात उघड झाली आहे. भारतीय व युरोपिअन कोडर्सच्या मदतीने या दोघांनी ॲपची निर्मिती केली.

चंद्राकार याचे ‘महादेव’ या नावाने ज्यूस सेंटर होते. त्यामुळे त्याच नावाने ॲप तयार करण्यात आले. चार ते पाच हजार स्थानिक ऑपरेटर्सच्या मदतीने या ॲपचे केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश येथे जाळे होते. देशभरात चार ते पाच हजार पॅनेल ॲापरेटर्स होते. त्यांना ३० टक्के कमिशन दिले जात होते. याशिवाय वेगवेगळ्या शहरात ३० कॅाल सेंटर्सची निर्मिती करण्यात आली होती.

करोडोंची उलाढाल का?

देशात सट्टेबाजी अधिकृत नसली तरी मोठ्या प्रमाणात आजही सुरू असते. या बेकायदा सट्टेबाजीला केवळ पोलीसच नव्हे तर संबंधित राजकारण्यांचाही आशीर्वाद आहे. प्रचंड रोखीचा व्यवहार दडलेला असल्यामुळेच चंद्राकार आणि त्याचे साथीदार भिलाईसारख्या छोट्या गावातून हा सट्टा देशभरात चालवू शकले. ‘महादेव बेटिंग ॲप’कडून ग्राहकांना वेबसाइटवर किंवा व्हॉट्सॲपवरून खेळाच्या लिंक दिल्या जात होत्या. त्या ‘लिंक’वर क्लिक केल्यानंतर कंपनीकडून यूजर आयडी देण्यात येत होते. यूजर आयडी तयार झाल्यावर ग्राहकाला त्याच्या वॉलेटमध्ये पैसे भरावे लागत होते. या वॉलेटमधून सट्ट्यावर पैसे लावता येत होते. जिंकल्यावर ग्राहकाला ठरल्यानुसार पैसे मिळत होते.

सुरुवातीला ग्राहक याला जिंकू दिले जात होते. एकदा हाव वाढल्यानंतर तो ग्राहक आपसूकच जाळ्यात अडकत होता. ग्राहकांनी कंपनीच्या खात्यात दिलेले पैसे, हेच उत्पन्न असल्याचे सांगण्यात येत होते. सट्टेबाजातून ग्राहकाला पैसे मिळत होते. मात्र, ज्या खात्यातून हे पैसे मिळत होते, ती खाती बनावट होती. वेगवेगळ्या प्रकारची शेकडो बँक खाती ॲपला जोडण्यात आली होती. त्यातून सर्व आर्थिक व्यवहार केला जात होता. करोना काळात ज्या वेळी ‘आयपीएल’चे सामने प्रेक्षकांविना खेळविले गेले, त्या वेळी महादेव ॲपने सट्टेबाजीत सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल केल्याचा अंदाज आहे.

घोटाळा कसा उघड?

प्राप्तिकर विभागाने २०२० मध्ये छत्तीसगडमधील व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले तेव्हा चौकशीत ‘महादेव ॲप’चे नाव पुढे आले. सक्तवसुली संचालनालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये छत्तीसगडचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दमानी आणि सुनील दमानी यांना अटक केल्यानंतर पहिल्यांदा महादेव ॲपबाबत माहिती जाहीर झाली. कोलकाता, भोपाळ, मुंबईसह सुमारे ३९ शहरांमध्ये छापासत्र राबवले गेले. त्यावेळी सुमारे ४१७ कोटींची मालमता हस्तगत केली गेली. या प्रकरणी तपास अद्याप सुरू आहे. व्यावसायिक विकास गर्ग याच्या अटकेनंतर या घोटाळ्यातील काळा पैसा कसा पांढरा केला जात होता, याबाबत आता संचालनालयानेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

विकास गर्ग याचा संबंध…

या प्रकरणात आता व्यावसायिक विकास गर्गला अटक झाली आहे. २०२५ मध्येच त्याचा संबंध असल्याचे उघड झाले होते. पंरतु आवश्यक ते पुरावे हाती लागण्याची संचालनालय वाट पाहत होते. अखेरीस गर्ग यानेच सट्टेबाजीतून मिळालेला चंद्राकार याचा पैसा अकोमोडेशन एन्ट्री तसेच दुबई, मॉरिशस व ब्रिटनमधील परदेशी कंपन्यात केलेली गुंतवणूक या द्वारे स्वत:च्या मालकीच्या सूचिबद्ध आणि असूचिबद्ध कंपन्यांमध्ये वळविला. गर्ग याने ‘एराया लाईफस्पेस’च्या माध्यमातून अमेरिकन फिनटेक कंपनी ‘एबिक्स कॅश’ मधील ६४ टक्के भागीदारी (१,१७५ कोटी) खरेदी करण्यासाठी हा काळा पैसा वापरला, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर संचालनालयाने गर्ग आणि कुटुंबीयांच्या मालकीची ९४०.७७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

ॲानलाईन बेटिंगवर का बंदी?

ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा, २०२५ अन्वये सर्व ऑनलाइन बेटिंग वा इतर पैशाशी संबंधित खेळांवर बंदी आहे. फँटसी स्पोर्ट्स, रमी, पोकर, कॅज्युअल बेटिंग आणि ऑनलाइन कॅसिनोच्या सशुल्क प्रकार यांना या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. विनामूल्य खेळता येणारे सोशल गेम्स (ज्यात कोणतीही आर्थिक पैज नसते), मान्यताप्राप्त ई-स्पोर्ट्स, अधिकृत ऑफलाइन राज्य लॉटरी आणि परवानाधारक प्रत्यक्ष कॅसिनो (केवळ गोवा, दमण आणि सिक्कीमपुरते मर्यादित) यांनाच परवानगी आहे.

बेकायदा बेटिंग ॲप वापरणाऱ्यांनाही दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. या ॲपचालकाला तीन वर्षांपर्यंत कारावास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. जाहिरातदार आणि इन्फ्लुएन्सर्स यांनाही दोन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
nishant.sarvankar@expressindia.com