Mahakhumbh Monalisa Missing Farman Khan Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे २०२५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात मोनालिसा भोसले नामक तरुणीची बरीच चर्चा झाली होती. समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झालेल्या तिच्या चित्रफितींनी सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. काही महिन्यांपूर्वी एका मुस्लीम तरुणाशी लग्नगाठ बांधल्यानंतर मोनालिसा पुन्हा चर्चेत आली. मात्र तिला समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याचवेळी मोनालिसा अल्पवयीन असल्याचे सांगून पोलिसांनी तिचा पती फरमान खानला अटक केली होती. यादरम्यान हे आंतरधर्मीय जोडपे अचानक बेपत्ता झाल्याची वावटळ समाजमाध्यमांवर उठली आहे. मोनालिसा आणि तिचा पती नेमका गेला तरी कुठे? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत, त्याविषयी…

मोनालिसा आणि फरमान नेमके कुठे गेले?

गेल्या तीन महिन्यांपासून मोनालिसा आणि फरमान हे दोघेही भीतीच्या छायेत जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. आंतरधर्मीय विवाहाच्या वादानंतर हे जोडपे केरळमधील एका शहरातून दुसऱ्या शहरात आश्रयासाठी फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच फरमान खान याला केरळ उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन या महिन्याच्या सुरुवातीला संपुष्टात आल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील पोलिसांचे एक पथक त्याची शोधाशोध घेत असून सध्या ते केरळमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात केरळ उच्च न्यायालयाने या जोडप्याला दिलेले पोलील संरक्षणही रद्द केले आहे. पोलिसांना हे जोडपे सापडत नसल्याने संरक्षणाचा आदेश मागे घेण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या जोडप्याला मदत करणारे चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक धनम कन्नन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मोनालिसा आणि फरमानने न्यायालयात माझ्या घराचा पत्ता दिला होता. मात्र, पोलिसांच्या भीतीपोटी ते इथे आलेच नाहीत. सध्या हे जोडपे नेमके कुठे आहेत, याची आम्हालाही माहिती नाही. त्यामुळेच न्यायालयाने त्यांचा पोलीस संरक्षणाचा आदेश रद्द केला आहे.

मोनालिसाने न्यायालयात काय सांगितले?

मोनालिसाचा पती फरमान खानवर मध्य प्रदेश पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फरमानने आपल्या मुलीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने निकाह केल्याचा आरोप मोनालिसाच्या वडिलांनी केला आहे. तसेच ती अल्पवयीन असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. मात्र, मोनालिसाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण १८ वयाची वर्षे पूर्ण केल्यानंतरच फरमानशी स्वखुशीने लग्न केले असल्याचे न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांत नमूद केले आहे. दरम्यान, संबंधित तरुणी अनुसूचित जमाती (आदिवासी) समाजातील असल्याने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडूनही (NCST) या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जात आहे. केरळ उच्च न्यायालयात पोलीस संरक्षणासाठी दाखल केलेल्या याचिकेत मोनालिसा आणि फरमानने गंभीर आरोप केले आहेत. याचिकेनुसार, काही व्यक्ती तिला फोन करून महाकुंभामुळे तू स्टार झालीस, पण आता तू पाकिस्तानीशी लग्न केले आहेस, असे म्हणत मोनालिसाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे.

फरमान आणि मोनालिसाची ओळख कशी झाली?

मोनालिसाला मदत करणारे धनम कन्नन यांनी सांगितले की, मध्य प्रदेश पोलिसांकडून फरमान खानचा शोध सुरू असतानाच केरळमधील काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनीही त्याच्याविरोधात भूमिका घेतली आहे. मी आणि माझे सहकारी या जोडप्याला मदत करण्यास तयार आहोत, पण सध्या ते नेमके कुठे आहेत याचा आम्हाला अजिबात कल्पना नाही. मोनालिसा आणि फरमान यांनी मोबाइल फोनचा वापरही बंद केला आहे. केरळमधील काही संघटना आपल्याला मध्य प्रदेशातील तत्सम गटांच्या ताब्यात देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे. मोनालिसाचे महाकुंभमेळ्यातील फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तिला काही चित्रपटांच्या ऑफरही आल्या होत्या. त्या निमित्ताने ती मार्च महिन्यात केरळमध्ये आली आणि तिची ओळख २६ वर्षीय फरमानशी झाली. त्यानंतर दोघांनीही एका मंदिरात जाऊन लग्न केले. त्या संदर्भातील फोटो व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाच्या वडिलांनी थेट पोलिसांत धाव घेऊन तिचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, मध्य प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांची शोधाशोध सुरू केली. काही दिवसानंतर मोनालिसा आणि फरमान तिरुवनंतपुरममधील एका पोलीस ठाण्यात गेले. तिथे तिने वडिलांसोबत जाण्यास नकार दिला आणि विवाहासाठी चित्रपट क्षेत्रातील काही सहकाऱ्यांनी मदत केल्याचे सांगितले.

mahakhumbh-monalisa-missing-husband-farman-khan-case-news
मोनालिसा आणि फरमान खान (छायाचित्र पीटीआय)

लग्नासाठी दोघांकडूनही बनावट कागदपत्रांचा वापर?

मध्य प्रदेश पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोनालिसा आणि तिच्या पतीने लग्नासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आम्हाला संशय आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून दोषी आढळल्यास फरमानवर आणखी एक गुन्हा दाखल केला जाईल. तपासादरम्यान विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे. दरम्यान, मोनालिसाच्या पालकांनी तिच्या जन्मतारखेबाबत सादर करण्यात आलेल्या जन्मदाखल्यावरही आक्षेप घेतला आहे. तिने सादर केलेल्या जन्मदाखल्यात १ जानेवारी २००८ ही जन्मतारीख नमूद असून त्यानुसार ती १८ वर्षांपेक्षा मोठी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तिच्या पालकांच्या मते ही नोंद कारकूनाच्या चुकीमुळे झाली आहे. मोनालिसाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करून रुग्णालयातील मूळ नोंदींनुसार मुलीची योग्य जन्मतारीख नमूद असलेला सुधारित जन्मदाखला जारी करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने (NCST) केलेल्या प्राथमिक तपासात संबंधित मोनालिसा अल्पवयीन असल्याचे आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फरमान खानवर गंभीर गुन्हा दाखल होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, मोनालिसाच्या जन्म ज्या रुग्णालयात झाला तेथील नोंदीनुसार तिची जन्मतारीख ३० डिसेंबर २००९ आहे. त्यामुळे ११ मार्च रोजी विवाह झाला तेव्हा तिचे वय १६ वर्षे, दोन महिने आणि १२ दिवस होते, असा निष्कर्ष आयोगाने काढल्याला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगातील एका पथकाने मोनालिसा आणि फरमानने लग्न केलेल्या मंदिरालाही भेट दिली. विवाहावेळी सादर करण्यात आलेली आधार कार्डांमध्ये दोघेही सज्ञान असून स्वतःच्या इच्छेने विवाह करत असल्याचे प्रतिज्ञापत्र, तसेच इतर संबंधित कागदपत्रे दिली आहेत. तपासानंतर एनसीएसटीने मोनालिसाचा पती फरमान याच्याविरोधात कठोर कारवाईची शिफारस केल्याचेही वृत्त आहे. त्यामध्ये विवाहासाठी अपहरण करणे, फसवणूक करून विवाह करणे, बलात्कार, खोट्या सबबीखाली सहजीवन ठेवणे, तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत विविध कलमे, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र, या संदर्भातील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली असून, संबंधित प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.