गेली काही वर्षे राज्यात पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम निर्मितीचे काम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) करण्यात येत होत होते. मात्र, आता इयत्ता नववी ते बारावी या इयत्तांचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी पुन्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (राज्य मंडळ) सोपविण्यात आली आहे. या निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे, त्याचे काय परिणाम होतील या अनुषंगाने घेतलेला वेध…

आतापर्यंत अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निर्मितीची प्रक्रिया कशी होती?

पूर्वीपासून पहिली ते आठवी या इयत्तांच्या अभ्यासक्रमाची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थेद्वारे केली जात होती, तर ‘बालभारती’कडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि छपाई केली जात असे. सन २०१६पर्यंत इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळ तयार करत होते. मात्र, २०१६मध्येच त्यात बदल होऊन राज्य सरकारने सर्व इयत्तांच्या अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी ‘एससीईआरटी’कडे, तर पाठ्यपुस्तकांचे काम ‘बालभारती’कडे दिले.

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’नुसार अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके बदलण्याची प्रक्रिया कशी आहे?

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’नुसार राज्य मंडळाशी संलग्न शाळांसाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके बदलण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये इयत्ता पहिली, तर २०२६-२७मध्ये दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांना नवी पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. त्यासाठी अभ्यासक्रमनिर्मिती ‘एससीईआरटी’तर्फे करण्यात आली, तर पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि छपाई ‘बालभारती’ने केली. शैक्षणिक वर्ष २०२७-२८मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार इयत्तांना नवा अभ्यासक्रम, नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२८-२९मध्ये इयत्ता आठवी, दहावी आणि बारावीला नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके लागू केली जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, अभ्यासक्रम निर्मिती, पाठ्यपुस्तकांच्या निर्मिती जबाबदारी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे (एनसीईआरटी) देण्यात आली आहे, तर राज्य स्तरावरील गरजा, संदर्भांचा विचार करून राज्य अभ्यासक्रम आराखडा, अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी ‘एससीईआरटी’कडे देण्यात आली आहे.

नववी ते बारावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाला का देण्यात आले?

‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५’नुसार, संपूर्ण माध्यमिक शिक्षणक्रमासाठी पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम ठरविण्याचे अधिकार राज्य मंडळाला आहेत. त्यानुसार २०१६पर्यंत नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती राज्य मंडळाकडून केली जात होती. नव्या निर्णयाबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कायद्यानुसार राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाकडे देण्याबाबत करण्यात येत असलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता नववी ते बारावीचा नवीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके करण्याचे काम राज्य मंडळाने सुरू केले आहे. त्यासाठी विषयनिहाय अभ्यास मंडळे तयार करण्यात आली आहेत. विषय तज्ज्ञांमार्फत अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. इयत्ता नववी, अकरावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके राज्य मंडळाकडून तयार करून पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम ‘बालभारती’कडे देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली.

नववी ते बारावीचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाकडे देण्याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे काय?

‘राज्य मंडळाचा अभ्यासक्रम ‘सीबीएसई’च्या धर्तीवर तयार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाकडे देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे,’ असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले. राज्याचे माजी शिक्षण संचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, ‘सन २०१६मध्ये केलेला बदल चुकीच्या पद्धतीने करण्यात आला होता. आता रचना पूर्ववत केली, ही चांगली बाब आहे. मात्र, पूर्वी नववी ते बारावीचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी राज्य मंडळाकडे तज्ज्ञता असलेले मनुष्यबळ बरेच होते. आता तशी स्थिती राहिलेली असेल असे नाही. आताच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. नव्या जबाबदारीचे आव्हान राज्य मंडळाने पेलण्यासाठी राज्य मंडळाने जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी.’

chinmay.patankar@expressindia.com