ॲप आधारित खासगी टॅक्सी कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढणे, प्रवाशांना सुरक्षित पर्याय देणे आणि चालकांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने लवकर राज्यात ‘छावा राइड’ ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतुकीला पर्याय आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कटकटीपासून सुटका मिळावी यासाठी ओला, उबर, रॅपिडो, चलो व इतर ॲप आधारित ॲग्रीगेटर कंपन्यांची टॅक्सी सेवा सुरू झाली. परंतु, प्रवाशांची आर्थिक पिळवणूक आणि चालकांना मिळणाऱ्या कमी मोबादल्यामुळे दोघांची परवड होत होती. त्यामुळे राज्यात एसटी महामंडळाद्वारे निर्मित केलेले ‘छावा राइड’ ॲप प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होईल.
देशात भारत टॅक्सी ॲप
देशातील पहिल्या सहकार तत्त्वावर आधारित राइड-हेलिंग प्लॅटफाॅर्मवर भारत टॅक्सी सुरू करण्यात आले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी रोजी भारत टॅक्सीचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे ओला आणि उबरसारख्या जागतिक कंपन्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. भारत टॅक्सीमध्ये टॅक्सीचालक हेच मालक असतील. ही एक सहकारी संस्था असून ती चालकांनी चालकांसाठी सुरू केली आहे.
राज्यात ‘छावा राइड’ ॲप
ओला आणि उबरसारख्या खासगी ॲप आधारित कंपन्यांकडून जादा प्रवासी भाडे, चालकांना कमी मोबादला, प्रवाशांना योग्य सुविधा पुरवली जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ओला-उबर सारख्या कंपन्यांमध्ये चालकाला प्रत्येक फेरीवर १५ ते ३० टक्के मोबदला कंपनीला द्यावा लागतो. परिणामी, प्रवासी आणि चालक वर्ग या ॲपबाबत नाखुश आहे. गेल्या काही महिन्यांपासून ओला, उबरसारख्या खासगी ॲप विरोधात चालक आंदोलन करीत आहेत. चालकाला सन्मानपूर्वक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे, चालकांच्या हितासाठी राज्य शासन अधिकृत ॲप तयार करीत आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने राज्य परिवहन (एसटी) महामंडळ ‘छावा राइड’ ॲप तयार करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) अधीन राहून हे ॲप तयार करण्यात येत आहे.
‘छावा राइड’ नाव कसे मिळाले?
राज्य परिवहन (एसटी) महामंडळ हे ॲप तयार करीत आहे. या ॲपला ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राइड’, ‘महा – यात्री’, ‘महा – गो’, ‘छावा राइड’ यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर या ॲपला ‘छावा राइड’ ॲप हे नाव द्यावे, असे सर्वानुमते ठरले. हे नाव छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून प्रेरित आहे.
‘छावा राइड’ ॲपमुळे चालकांना कसा फायदा?
‘छावा राइड’ ॲपवरील प्रत्येक वाहन फेरीद्वारे गोळा केलेल्या भाड्याच्या किमान ८० टक्के रक्कम चालकांना दिली जाईल. तर, उर्वरित २० टक्के रक्कम एसटी महामंडळाकडे वळती केली जाईल. त्यामुळे चालकांचा मालकी हक्क आणि नफ्यात जादा फायदा होईल.
‘छावा राइड’ ॲपकडे प्रवासी कसे वळणार?
‘छावा राइड’ हे ओला, उबर आणि रॅपिडोच्या ॲपसारखे असेल. परंतु, ते एसटी महामंडळाचे अधिकृत, सुरक्षित आणि स्वस्त शासकीय ॲप असेल. राज्यात एसटीवर विश्वास असलेला प्रवासी वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे ‘छावा राइड’ ॲपकडे प्रवासी आणि चालक वर्ग वळेल. या ॲपद्वारे प्रवासी रिक्षा, टॅक्सी, बस, ई-वाहने आरक्षित करू शकतील. तसेच रिक्षा आणि कॅब यासाठी आरटीओ विभागाने निश्चित केलेले दर लागू होतील. तसेच गर्दीच्या, सणासुदीच्या वेळी जादा भाडेवाढ केली जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट बंद होईल. महिला प्रवाशांसाठी पॅनिक बटन, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि विमा संरक्षण यासारख्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांचे पैसे वाचवणारे ‘छावा राइड’ ॲप प्रवाशांच्या पसंतीस पडेल, असा दावा करण्यात येत आहे.
‘छावा राइड’ ॲप सर्वप्रथम कुठे?
‘छावा राइड’ ॲप पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरू होईल. सर्वप्रथम मुंबई महानगरात हे ॲप कार्यान्वित करण्यात येईल. त्यानंतर नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, कोल्हापूर व इतर शहरांमध्ये हे ॲप उपलब्ध होईल.
एसटीला उत्पन्न, मराठी तरुण-तरुणींना रोजगार
भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करण्याच उद्देशाने एसटी महामंडळ शासकीय ॲप सेवा उपलब्ध करणार आहे. या ॲपद्वारे राज्यातील मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
‘छावा राइड’ ॲप कधी?
‘छावा राइड’ ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी समिती नेमली असून, समितीचा अहवाल या महिन्यात प्राप्त होईल. त्यानंतर साधारण मार्च किंवा एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. सध्या ओला, उबर, रॅपिडो यासारखी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू आहेत. या कंपन्यांची मक्तेदारी आहे. भविष्यात मुंबईसह राज्यात भारत टॅक्सी आणि ‘छावा राइड’ ॲप सुरू झाल्यास प्रवाशांना फायदा होईल. तसेच सध्या कार्यरत कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
