‘निर्यातसज्जता’ म्हणजे काय?

निती आयोगाने राज्यांमधून होणार्‍या निर्यातीचा आढावा घेत निर्यातसज्जता अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला. यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा आवर्जून उल्लेख राज्यपालांनी अभिभाषणात, तर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केला. या निर्देशांकासाठी, प्रत्यक्ष होणार्‍या निर्यातीच्या आकडेवारीखेरीज राज्यांकडून निर्यातील प्रोत्साहन देण्यासाठी कोणते उपाय योजण्यात येतात याचे निकष लावून त्यानुसार राज्यांची क्रमवारी जाहीर केली जाते. महाराष्ट्राने २०२४ या वर्षात या निकषांवर देशात पहिला क्रमांक पटकावला. दुसर्‍या क्रमांकावर तमिळनाडू असून, नंतर गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांचा क्रम आला आहे. अहवाल वर्षात महाराष्ट्रातून ५ लाख ६३ हजार कोटींची निर्यात झाली आहे.

प्रत्यक्ष निर्यातीत वाटा किती?

देशात सर्वाधिक निर्यात ही गुजरातमधून होते. अहवाल वर्षात गुजरातमधून ११ लाख, २४ हजार कोटींची एकूण निर्यात झाली. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून होणारी निर्यात ही तब्बल दुप्पट आहे. गुजरातमध्ये तेलशुुद्धीकरण प्रकल्प असल्याने या राज्यातून होणार्‍या निर्यातीचे प्रमाण अधिक आहे. गुजरातमधून केवळ इंधनाची पाच लाख कोटींची निर्यात झाली होती. निर्यातीत २०१९-२० पर्यंत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक होता. त्या वर्षात महाराष्ट्राचा वाटा २०.७१ टक्के; तर गुजरातचा वाटा २०.२५ टक्के होता. त्यानंतर दरवर्षी गुजरातने आघाडी घेतली. तेलशुद्धीकरण प्रकल्पांमुळे (तसेच रशियन तेलाची युरोपीय मागणी जामनगरहून पूर्ण होत असल्याने) गुजरातचा फायदा झाला. अहवाल वर्षात देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा  १५.४ टक्के होता. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये हेच प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा अधिक होते. गुजरातमधून होणार्‍या निर्यातीचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तमिळनाडूचा वाटा १० टक्के असला तरी या राज्याने निर्यातीत अधिक प्रगती केल्याचे अहवाल सांगतो.

पीछेहाटीची कारणे काय?

कोविडोत्तर काळातही महाराष्ट्रातून होणार्‍या निर्यातीने सुधारणा दाखवली आणि २०२३ मध्ये सहा लाख कोटींपेक्षा अधिक रकमेच्या वस्तुमालाची निर्यात झाली. पण २०२४ या अहवाल वर्षात ही निर्यात ५.६३ कोटींवर घटली. ही घट ७.३ टक्के असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत घट झाल्यानेच महाराष्ट्राला त्याचा फटका बसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. अहवाल वर्षाच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत दागिने व हिर्‍यांची निर्यात जवळपास ३१ हजार कोटींनी घटली. उद्योगांसाठी जमिनीचे वाढीव दर, मालाची ने- आण करण्यासाठी होणारा जास्तीचा खर्च आणि उद्योगांचे वाढीव वीजदर या तीन मुख्य बाबींमुळेच राज्यातील उद्योगांसाठी तेवढे पोषक वातावरण राहिलेले नाही. त्याचा मुख्यत्वे फटका महाराष्ट्राला बसल्याचा निष्कर्ष निती आयोगाने काढला आहे.

उद्योगांचे वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी चारच दिवसांपूर्वी जाहीर केले असले, तरी अन्य राज्यांच्या स्पर्धेत हे दर जास्तच असल्याचे उद्योजक संघटनांचे म्हणणे आहे. राज्यातून निर्यातीसाठी जवाहरलाल नेहरू बंदर व मुंबई बंदर ही दोनच बंदरे आहेत. त्यापैकी उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून सर्वाधिक निर्यात होते. पण या बंदरात मालाची चढ – उतार करण्याकरिता जास्त वेळ लागतो, अशी निर्यातदारांची तक्रार आहे. याउलट गुजरातमध्ये मुंद्रा, कांडला, पिपाव्ह या मोठ्या बंदरांसह ४२ छोटी-मोठी बंदरे आहेत. हिरे व दागिन्यांचा व्यापार गुजरातमध्ये वाढला आहे. डहाणूजवळील वाढवण बंदर सुरू झाल्यावर राज्यातील निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.

मुंबई, पुण्यातच विकास का रखडला?

मुंबई शहर व उपनगर, ठाणे आणि पुणे या चार जिल्ह्यांचा राज्याच्या निर्यातीत ७४ टक्के वाटा आहे. तरीही राज्य सरकारने २०३० पर्यंत राज्यातील निर्यातीचे प्रमाण सध्याच्या १५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर अधिकचा भर दिला आहे. व्यापारसुलभता, मालाची ने-आण करण्याकरिता अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच निर्यातदारांना प्रोत्साहन हे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आखले आहे. औद्योगिक उत्पादन तसेच मोटारी आणि दुचाकी क्षेत्रांत वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. दिल्ली- मुंबई आर्थिक कॉरिडॉरमुळे राज्याच्या विकासात भर पडेल. तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये उद्योगांना चालना देण्याच्या धोरणांचे येत्या दोन – तीन वर्षांत दृश्य परिणाम दिसतील, असे राज्य शासनाचे म्हणणे आहे.