वणव्यांची धग नेमकी कुठे कुठे?

महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत वणव्यांची संख्या अधिक आहे. ओडिशात ७ हजार ९००, तेलंगणात ७ हजार, आंध्र प्रदेशात ६ हजार ९५० व मध्य प्रदेशात ६ हजार ९०० वणव्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. ही सर्व राज्ये तेंदूपत्ता आणि मोहफुले संकलन करणारी राज्ये आहेत. तेंदूपत्ता संकलन हंगाम अजून सुरू व्हायचा आहे, पण राज्यात वणव्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. राज्यात आणि प्रामुख्याने विदर्भात वणव्याची धग अधिक असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांतील प्रमाण जास्त आहे. यातही गडचिरोली जिल्ह्यात वणवा मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भानंतर नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या नागरीकरण होत असलेल्या जिल्ह्यांतही वणव्याच्या घटना वाढत आहेत. तेंदूपत्ता संकलनाशी संबंधित आगींमुळे राज्यातील सुमारे एकतृतीयांश वनक्षेत्र प्रभावित झाले आहे.

तेंदूपत्ता आणि वणवे… संबंध काय?

राज्यात सुमारे २५ टक्के वनक्षेत्रात तेंदूची झाडे आहेत. विदर्भात मोह आणि तेंदू सर्वाधिक असल्यामुळे वणव्याच्या घटनाही अधिक आहेत. १ मेनंतर तेंदू संकलनाचा हंगाम सुरू होत असला तरीही त्याच्या ३० ते ४० दिवस आधी आगी लावण्यास सुरुवात होते. आगीनंतर चांगली पालवी फुटते आणि चांगल्या प्रतीचा तेंदू मिळतो, असा गावकर्‍यांमध्ये समज आहे. त्यासाठी हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी ते जंगलाला आग लावतात.

मानवनिर्मित आगीच अधिक कशाने?

अलीकडच्या काही वर्षांत नैसर्गिक वणवे कमी पण मानवनिर्मित वणव्यांत अधिक वाढ झाली आहे. प्रामुख्याने विदर्भात तेंदुपत्ता, मोह अधिक आणि चांगला मिळावा या कारणासाठी जंगलाला आग लावली जाते. तर विदर्भाबाहेर कुरणासाठी या आगी लावल्या जातात. बर्‍याचदा मानव-वन्यजीव संघर्षातूनदेखील जंगलाला आग लावली जाते. वाघाने माणसाला मारले, जनावरे मारली किंवा वन्यप्राण्यांमुळे शेताचे नुकसान झाले तर अशा वेळी बदल्याच्या भावनेतून मुद्दाम जंगल पेटवले जाते.

वन खात्याचे दुर्लक्ष कितपत कारणीभूत?

वणव्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असताना या वर्षीदेखील ते अधिक आहे. बर्‍याच ठिकाणी निधीअभावी जाळरेषांची कामे झालेली नाहीत. अग्नी निरीक्षक नाहीत. आग विझवण्यासाठी लागणारे ‘ब्लोअर’ पुरेसे नाहीत. अग्नी निरीक्षकांना सुरक्षा कवच नाहीत. त्यांना पुरेसे प्रशिक्षण नाही. या परिस्थितीत ते १० ते १२ किलोचे ‘ब्लोअर’ पाठीवर घेऊन हे कर्मचारी आग विझवण्यासाठी जातात. सुमारे दोन वर्षांपूर्वी हे ‘ब्लोअर’ पाठीवर फुटल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कोसमतोंडी येथे चार अग्नी निरीक्षकांचा मृत्यू झाला होता. तर या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात आग विझवताना एका अग्नी निरीक्षकाचा मृत्यू झाला. बायोमास आणि बांबू लवकर आग पकडतात आणि आगीच्या ज्वाळा १२ ते १५ फुटांपर्यंत असतात. त्यामुळे या परिस्थितीत ते लवकर आगीच्या ज्वाळांमध्ये सापडतात. वन खाते अत्याधुनिक झाले असे वाटत असले तरीही वणव्याच्या या घटना खाते अजूनही मागेच असल्याचे दाखवून देतात.

जनजागृतीत कमतरता आहे का?

वणवा लागण्यामागे आणि आगी लावण्यामागे बरेच गैरसमज आहेत. तेंदू चांगला मिळवण्याच्या आशेने आगीचे प्रकार वाढू नयेत, यासाठी परिसरातील काही संस्था विविध व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रात तरी कार्यशाळा आयोजित करतात. बफर क्षेत्र, प्रादेशिक वन विभाग तसेच वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात आगीचे प्रमाण अधिक आहे. जाळरेषा फक्त मुख्य रस्त्याच्या कडेला काढल्या जातात. मात्र, वणव्यात वन्यप्राण्याची होणारी होरपळ पाहता त्या आतदेखील काढणे आवश्यक आहे, त्यासाठी खात्यातील कर्मचार्‍यांतही जनजागृती केली जाते. वन विभागाच्या वतीनेही गावकर्‍यांना या गोष्टी
समजावून सांगितल्या जातात. जनजागृती केली जाते. तरीही वणवा लागण्याचे प्रमाण, वणव्याची धग कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे जनजागृतीत वन विभाग आणि स्वयंसेवी संस्था कमी पडतात का, असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो.