scorecardresearch

विश्लेषण : रितेश-जिनीलियाच्या कंपनीची होणार चौकशी; मविआ सरकारदरम्यान लागले गैरव्यवहाराचे आरोप, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी याबद्दल माहिती दिली

विश्लेषण : रितेश-जिनीलियाच्या कंपनीची होणार चौकशी; मविआ सरकारदरम्यान लागले गैरव्यवहाराचे आरोप, नेमकं प्रकरण काय?
रितेश आणि जिनीलिया देशमुख कंपनी चौकशी (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनीलिया देशमुख हे सध्या त्यांच्या आगामी ‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहेत. रितेश देशमुख हा चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, शिवाय या चित्रपटात रितेश आणि जिनीलिया दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच हे दोघे आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे, ते कारण म्हणजे त्यांच्या कृषी प्रक्रिया कंपनीबाबत होणारी चौकशी.

महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी याबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनीलिया देशमुख यांच्या मालकीच्या कृषी-प्रक्रिया कंपनीच्या जमीन आणि कर्ज मिळवण्याबाबत अनियमितता आढळून आल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी नेमकी का करण्यात येत आहे तसेच हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

आणखी वाचा : ‘दृश्यम २’च्या सक्सेस पार्टीत अनुपम खेर यांनी लावली हजेरी; ट्वीट करत म्हणाले “चांगले चित्रपट…”

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘आरटीआय’च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने हा दावा केला की, देशमुख दाम्पत्याला जमीन विकत घेण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने विशेष अधिकारांचा वापर केला आहे. लातूर शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात हा कृषी प्रक्रिया युनिटचा भूखंड असल्याने यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीला जमीन देण्यात आली, ज्यामध्ये रितेश आणि जिनीलिया देशमुख समान भागीदार आहेत. कंपनीच्या स्थापनेच्या तीन आठवड्यांच्या आत प्रति चौरस मीटर ६०५ रुपये अशा सवलतीच्या दरात ज्या जमिनीचे वाटप करण्यात आले. इतकंच नव्हे तर जमिनीच्या अर्जावर १० दिवसांत विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आले.

भाजपाने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला आणि बँकेने २७ ऑक्टोबर रोजी त्याला मंजुरीही दिली. त्यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला आणि त्याच दिवशी ६१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.लातूरमधील भाजप नेत्यांनी असा दावा केला आहे की, पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) सरकारच्या काळात, ज्यामध्ये काँग्रेसचे नेतेसुद्धा होते, त्या काळात अशाच प्रकारचे जमीन वाटप अगदी सर्रास झाले आहेत. ‘देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने मात्र हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं स्पष्ट करत फेटाळून लावले आहेत.

आणखी वाचा : वेटर, फोटोग्राफर ते बॉलिवूड स्टार; ४२ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या बोमन इराणी यांचा थक्क करणारा प्रवास

रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. त्याचा मोठा भाऊ अमित हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होता आणि त्याचा धाकटा भाऊ धीरज हा लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहे. यामुळेच त्या काळातील सरकारकडून रितेश आणि जिनीलियाच्या कंपनीला जमीन आणि कर्ज बिनदिक्कत मिळाल्याचा आरोप झाल्याने याबाबत सध्याच्या सरकारकडून याविषयी चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:12 IST

संबंधित बातम्या